हॅरॉड, सर रॉय फोर्ब्स (Harrod, Sir Roy Forbes) : (१३ फेब्रुवारी १९०० – ८ मार्च १९८७). विसाव्या शतकातील नवअभिजात अर्थशास्त्राला दीर्घकालीन योगदान देणारे एक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ. हॅरॉड यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव हेन्री होते. त्यांचे शालेय शिक्षण सेंट पॉल आणि वेस्टमिन्स्टर शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी न्यू कॉलेज, ऑक्सफर्ड येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. समग्रलक्षी अर्थशास्त्राला अनन्यसाधारण योगदान देणारे हॅरॉड हे त्यांच्या सुरुवातीच्या विद्यार्थीदशेत अर्थशास्त्राचे विद्यार्थी नव्हते. त्यांनी इ. स. १९१८ ते १९२१ मध्ये अभिजात साहित्य, प्राचीन इतिहास या विषयांत पारंगतता प्राप्त केली. पुढे त्यांनी शैक्षणिक तत्त्वज्ञान हा मुख्य विषय निवडला; परंतु त्यांच्या पर्यवेक्षकाने त्यांच्या निबंधावर खोचक टिप्पणी केल्यामुळे त्यांनी तत्त्वज्ञान विषय सोडून अर्थशास्त्र विषयाकडे आपले लक्ष वळविले. अशा प्रकारे अपघाताने अर्थशास्त्राकडे वळलेल्या हॅरॉड यांनी अर्थशास्त्राला दीर्घकाळ आपले योगदान दिले.

हॅरॉड यांची गणना नेहमीच हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत झाली. त्यांनी आपले सर्व शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण केले. इ. स. १९२२ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील किंग्ज कॉलेजमध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या हाताखाली त्यांनी अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनास सुरुवात केली. तेथेच ते केन्स यांच्या विचारांनी प्रभावीत झाले आणि त्यांची एकमेकांशी घनिष्ट मैत्री झाली. इ. स. १९२३ मध्ये ते ख्रिस्त चर्च कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले; परंतु त्यांची मैत्री अधिकच वृद्धींगत झाली आणि ती पुढे आयुष्यभर (केन्स यांच्या मृत्यूपर्यंत – इ. स. १९४६) टिकली. केन्स यांच्या मृत्यूनंतर हॅरॉड यांनी केन्स यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधून केन्स यांच्याबद्दल अधिकृत माहिती प्राप्त केली आणि १९५१ मध्ये केन्स यांचे दी लाइफ ऑफ जॉन मेनॉर्ड केन्स हे अधिकृत चरित्र प्रकाशित केले.

हॅरॉड यांनी ख्रिस्त चर्च कॉलेजमधून आपले अध्यापनाचे काम सुरू केले. तेथेच त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी आपले ‘सिमांत उत्पन्न वक्र’ या संकल्पनेवरील काम सुरू केले. इ. स. १९२९ मध्ये त्यांनी आपल्या प्रथितयश ‘पुरवठ्यावरील नोंदी’ (नोट्स ऑन सप्लाय) मध्ये पहिला ‘सिमांत प्राप्ती वक्र’ हा शोधनिबंध लिहिला; परंतु केन्स हे संपादक असणाऱ्या इकॉनॉमिक जर्नल (खंड ४०, अंक १५८) मध्ये प्रस्तुत लेख इ. स. १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. परिणामी प्रकाशन विलंबामुळे हॅरॉड यांना सिमांत वक्र संशोधनाचा शोधकर्ता म्हणून मान मिळू शकला नाही. तदनंतर हॅरॉड यांनी अनेक अल्पकालीन सरासरी खर्च वक्रांना कवेत घेणारा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र वेष्टनावर आधारित आपले ‘अपूर्ण स्पर्धेविषयीचे संशोधन’ आरंभले. प्रस्तुत शोधनिबंध इ. स. १९३१ मध्ये आणि ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा शोधनिबंध इ. स. १९३३ मध्ये प्रकाशित झाले; परंतु याही शोधनिबंधांच्या प्रकाशनास विलंब झाल्याने प्रस्तुत संशोधनाला मान्यता मिळू शकली नाही; तथापि हॅरॉड यांनी आपले संशोधन व प्रकाशनाचे कार्य अविरत सुरू ठेवले. ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा शोधनिबंधानंतर त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘अपूर्ण स्पर्धा’ या संशोधनाने अर्थशास्त्राच्या शैक्षणिक व सैद्धांतिक क्षेत्रात आश्चर्याची लाट निर्माण केली. प्रस्तुत प्रकाशनामुळे हॅरॉड हे निर्विवाद प्रकाशझोतात आले. इ. स. १९३६ मध्ये डॅरॉड यांनी आपले ‘व्यापारचक्रा’वरील संशोधन प्रकाशित केले. या संशोधनात त्यांनी प्रभावी मागणी अधोरेखित करणारे काही बिंदू/घटक निदर्शनास आणून दिले. त्यानंतर इ. स. १९३९ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘ॲन एसे इन डायनामिक थिअरी’मध्ये त्यांनी आश्वासक वृद्धी, नैसर्गिक वृद्धी आणि वास्तव वृद्धी या तीन संकल्पना उद्धृत केल्या. यालाच पुढे हॅरॉड-डोमार प्रतिमान असे संबोधले गेले. हॅरॉड यांच्या मते, आश्वासक वृद्धी तेव्हा शक्य आहे, जेव्हा सर्व बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत होते. नैसर्गिक वृद्धी अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार स्थिती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असते. टूवर्ड्स अ डायनामिक इकॉनामिक्स या ग्रंथामध्ये या प्रमेयास मान्यता प्राप्त झाली.

इसवी सन १९३९ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धामुळे हॅरॉड यांच्या अर्थशास्त्रीय संशोधन, लिखाण व प्रकाशन कामात व्यत्यय आला. त्यांनी इ. स. १९४० ते १९४२ दरम्यान सर विन्स्टन चर्चिल यांचा सल्लागार फ्रेडरिक लिंडमन यांच्या हाताखाली एच-बॅच नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लष्करी सांख्यिकी विभागात काम केले. तत्पूर्वी त्यांनी ब्रिटिश सैन्यात इंग्लंडच्या वतीने पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. हॅरॉड यांनी युद्ध कार्यभागातून मुक्त झाल्यानंतर आपले अर्थशास्त्रीय संशोधन पुनश्च सुरू केले. युद्धानंतरचा त्यांचा आर्थिक वृद्धी व अपूर्ण स्पर्धेच्या अर्थशास्त्रावरील योगदानाचा कालखंड अधिक प्रभावी ठरला. युद्धोपरांत दोन दशकांच्या कालखंडात हॅरॉड यांनी गतीशील वृद्धी संकल्पनेच्या योगदानावर अधिक भर दिला. हे करत असताना त्यांनी समतोल वृद्धीदराच्या घटकांवर अधिक लक्षपूर्वक विवेचन केले. परिणामी त्यांनी आपल्या याच कामावर आधारित इ. स. १९४८ मध्ये आपले टूवर्ड्स अ डायनामिक इकॉनामिक्स हे प्रकाशन जगापुढे आणले.

हॅरॉड यांनी आपल्या कार्यकाळात विविध क्षेत्रांत कामे केले. त्यांनी विसाव्या शतकातील अर्थतज्ज्ञांचे लक्ष आर्थिक वृद्धीविषयक चिंतनाकडे वळविण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. केन्स यांच्या उत्पन्न विभाजन सिद्धांतास हॅरॉड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हॅरॉडने आपल्या कारकिर्दीत अर्थशास्त्रावर मूलभूत संशोधन करून अनेक ग्रंथ व शोधनिंबध प्रकाशित केले; तथापि त्यांची अनेक संशोधने इतरांपेक्षा अगोदरची असूनही प्रकाशन विलंबामुळे हॅरॉड यांना प्रथमकर्त्याचा मान मिळाला नाही. अर्थशास्त्राचे अध्यापन व संशोधन यांव्यतिरिक्त हॅरॉड यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ख्रिस्त चर्च कॉलेजमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडल्या. तसेच इ. स. १९३८ ते १९४७ आणि १९५४ ते १९५८ या कार्यकाळात हॅरॉड हे नफिल्ड कॉलेजचे अधिछात्र म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ख्रिस्त चर्च कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासहित इंग्लंडमधील पूर्व अँगलीया, नॉरफॉल्कमधील डाल्ट येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले काम पूर्ववत सुरू करून आणखी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सर जॉन रिचर्ड हिक्स आणि जेम्स एडवर्ड मीड यांच्यासह हॅरॉड हे नेहमीच केन्स यांच्या वैचारिक सानिध्यात राहिल्याचे दिसून येते. हर्बट अँडरसन आणि इतरांबरोबर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स रिसर्च ग्रुपच्या स्थापनेत हॅरॉड हे सुरुवातीपासून सहभागी होते. त्यांनी अर्थशास्त्राला दिलेले गतीशीलताविषयक योगदान नंतरच्या काळात ऑक्सफर्ड योगदान म्हणून संबोधले गेले. पुढे या योगदानास केंब्रिज अर्थतज्ज्ञांचीही मान्यता मिळाली. हॅरॉड यांनी अभिजात अर्थशास्त्राला प्रदीर्घ योगदान देऊन अर्थशास्त्रीय विवेचनाच्या या शाखेस अधिक विकसित केले.

हॅरॉड यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. त्यामध्ये दी ट्रड सायकल (१९३६); अ पेज ऑफ ब्रिटिश फोली (१९४६); आर देज हार्डशिप नेसेसरी (१९४७); टूवर्ड्स अ डायनामिक इकॉनामिक्स (१९४७); दी लाइफ ऑफ जॉन मेनॉर्ड केन्स (१९५१); इकॉनॉमिक एसेज (१९५२); दी पाउंड स्टर्लिंग (१९५२); फाउंडेशन्स ऑफ इंडक्टिव्ह लॉजिक (१९५६); पॉलिसी अगेन्स्ट इन्फ्लेशन (१९५८); दी प्रोफेसर : अ पर्सनल मेमोएर ऑफ लॉर्ड केरवेल (१९५९); दी डॉलर (१९६३); दी ब्रिटिश इकॉनॉमी (१९६३); रिफॉर्मिग द वर्ल्ड्स मनी (१९६५); दी इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (१९६६); टुवर्डस अ न्यू इकॉनॉमिक पॉलिसी (१९६७); मनी (१९६९); इन्डक्शन, ग्रोथ अँड ट्रेड (१९७०); सोशलॉजी मॉरल अंड मिस्टरी (१९७१); इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (१९७३) इत्यादी ग्रंथ आहेत.

हॅरॉड यांचे इंग्लंडमधील डाल्ट येथे निधन झाले.

समीक्षक : राजस परचुरे