जेव्हन्झ, विल्यम स्टॅन्ली (Jevons, William Stanley) : (१ सप्टेंबर १८३५ – १३ ऑगस्ट १८८२). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रवेत्ता. जेव्हन्स यांचा जन्म इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे एका लोखंड व्यापाराच्या घरी झाला. त्यांनी लंडन विद्यापीठातून एम. ए. ही पदवी मिळविली. इ. स. १८५३ मध्ये त्यांची ऑस्ट्रेलियात सिडनी येथे स्थापना झालेल्या नव्या टाकसाळीवर चांगल्या पगाराच्या जागी नेमणूक झाली. तेथे ते इ. स. १८५९ पर्यंत होते. नंतर ते इंग्लंडला परतले. तर्कशास्त्र आणि मानस व नैतिक तत्त्वज्ञान यांचा प्राध्यापक तसेच इ. स. १८६६ ते १८७६ या काळात मँचेस्टर येथे अर्थशास्त्राचे ‘कॉब्डेन प्राध्यापक’ म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते इ. स. १८७६ ते १८८० या काळात युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.

जेव्हन्झ यांच्या इ. स. १८५१ ते १८७१ या काळातील अर्थशास्त्रीय लेखनात प्रथम मांडलेला मूल्यसिद्धांत, मौद्रिक सांख्यिकीवरील काही निबंध आणि शासकीय नीतीसंबंधीचे लेखन यांचा समावेश होतो. ‘ऑन दी स्टडी ऑफ पिरिऑडिक कमर्शिअल फ्लक्च्युएशन्स’ (१८६२) आणि ‘ए सीरियस फॉल इन दी व्हॅल्यू ऑफ गोल्ड ॲसर्टेंड अँड इट्स सोशल इफेक्ट्स सेट् फोर्थ’ (१८६३) या निबंधांतून जेव्हन्झ यांनी प्रथमच कालिक बदलांचे विश्लेषण केले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास कॅलिफोर्निया व ऑस्ट्रेलिया येथे लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे किंमत पातळीवर संभवणाऱ्या परिणामांची चर्चा चालू होती. जेव्हन्झ यांनी आपल्या उपर्युक्त निबंधांद्वारा इ. स. १८४८ ते १८६० या काळात सुवर्णमूल्यात नऊ टक्के घट झाल्याचे दाखवून दिले. तसेच किंमत निर्देशांक काढण्याचे हे तंत्र शोधून काढण्यात त्यांनी भर घातली. सूर्यावरील नियतकालिक डागांमुळे पिके खराब येतात आणि परिणामी आर्थिक मंदी येते, असा आर्थिक अरिष्टांसंबंधीचा सिद्धांत जेव्हन्झ यांनी मांडला. त्यांनी आर्थिक विषयावर जे लिखाण केले, ते इ. स. १८७१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात प्रसिद्ध आहेत.

जेव्हन्झ यांचा इ. स. १८६५ मध्ये लिहिलेला द कोल क्वेश्चन हा पहिला मोठा ग्रंथ होय. ब्रिटनमधील सर्व कोळशाचे साठे संपण्यास जरी दीर्घकाळ लागला, तरीही खाणींच्या खोलवरच्या थरांतून कोळसा काढताना येणारा खर्च हा अन्य यूरोपीय देश व अमेरिका यांच्या खर्चाच्या तुलनेने अधिक आहे. असा इशारा त्यांनी या ग्रंथात दिला; तथापि जेव्हन्झ यांनी कोळशाव्यतिरिक्त अन्य शक्तिसाधनांच्या विकासाची अवस्था लक्षात घेतली नव्हती. हा ग्रंथ म्हणजे अनुप्रयुक्त अर्थशास्त्रामधील एक उत्कृष्ट लघुप्रबंधच मानला जातो. या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर कोळशाच्या पुरवठ्याबाबत चौकशी करण्यासाठी इंग्लंडच्या संसदेने एक शाही आयोगही नेमला होता. त्यानंतर जेव्हन्झ यांना दी थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८७१) हा ग्रंथ लिहिण्याची कल्पना इ. स. १८७० मध्ये प्रकाशित झालेल्या फ्लीमिंग जेकिन्स यांच्या दी ग्रॅफिक रिप्रेझेंटेशन ऑफ दी लॉज ऑफ सप्लाय अँड डिमांड या ग्रंथावरून सुचल्याचे दिसते. या ग्रंथाने आर्थिक विचारांच्या इतिहासात एक नवीनच वैचारिक दालन उघडले आणि जेव्हन्झ यांची अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली कीर्ती सुप्रतिष्ठित झाली.

सिद्धांत व पद्धती :

  • गणितीय पद्धतीचा वापर : जेव्हन्स यांच्या मते, अर्थशास्त्र हे शास्त्र असून त्याला निश्चित स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून गणितीय पद्धतीचा वापर केला पाहिजे. अर्थशास्त्राचा संबंध सुख आणि दु:ख यांचे मापन करण्यासाठी होत असल्याने आर्थिक विश्लेषणासाठी गणितीय पद्धतीचा (आकडे, सूत्रे, आकृत्या, कोष्टके इत्यादी साधनांचा) वापर अनिवार्य आहे.
  • उत्पादन : जेव्हन्स यांच्या मते, उत्पादन केलेल्या वस्तूंच्या उपयोगामुळे उपभोक्त्याला समाधान मिळत असेल, तरी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या घटकांना (उदा., कामगार) असमाधान सहन करावा लागतो; परंतु पुढे सुख प्राप्त होईल या आशेने ते त्रास सहन करण्यासाठी तयार होतात.
  • व्यापार चक्र : व्यापार चक्राचे विश्लेषण करताना जेव्हन्स यांनी सूर्यावरील डागांचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, सूर्यावर अधूनमधून डाग येत असतात. ज्यामुळे हवेतील उष्णता कमी-जास्त होते आणि हवा बदलली जाते. याचे परिणामस्वरूप हवामान उत्कृष्ट किंवा खराब होते. खराब हवामानामुळे शेतकऱ्यांची पिके बुडतात आणि त्याची खरेदीशक्ती घटते. यामुळे बाजारात विविध वस्तूंची मागणी घटून अर्थव्यवस्थेत मंदी येते. याउलट, उत्तम हवामानामुळे भरघोस पिकांची उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांची खरेदीशक्ती वाढते व अर्थव्यवस्थेत तेजी येते.
  • उपयोगिता आणि मूल्य : जेव्हन्झ यांचा उपयोगिता आणि मूल्य सिद्धांत हा मौलिक (आद्य) समजला जातो. जेव्हन्झ यांनी इ. स. १८७० च्या सुमारासच सीमांत उपयोगिता सिद्धांत मांडला. त्यानंतर त्यांच्या प्रमाणेच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कार्ल मेंगर या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांनी व्हिएन्नामध्ये इ. स. १८७१ मध्ये, तर लेआँ व्हालरा या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांनी स्वित्झर्लंडमध्ये इ. स. १८७४ मध्ये तो सिद्धांत प्रसिद्ध केला. जवळजवळ अशाच प्रकारचा सिद्धांत हेरमान गॉसेन या जर्मन अर्थशास्त्रज्ञानी इ. स. १८५४ मध्ये मांडला होता. जॉन स्ट्यूअर्ट मिल यांच्या आर्थिक सिद्धांतांच्या प्रतिपादनाचा जेव्हन्झ यांनी सीमांत उपयोगिता सिद्धांत मांडून विकास केला. जेव्हन्झ यांच्या मतानुसार एखाद्या वस्तूचे मूल्य हे मिल यांच्या मताप्रमाणे उत्पादन परिव्ययावर नव्हे, तर तिच्या उपयोगितेवर अवलंबून असते. इ. स. १८७९ मध्ये जेव्हन्झ यांनी आपल्या दी थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत सीमांत विश्लेषण व उपयोगिता सिद्धांत यांची ऐतिहासिक मीमांसा केली आहे. जेव्हन्झ यांचा दी थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ उपभोक्ता सिद्धांत या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अर्ध्या भागावरच प्रकाश टाकतो. जेव्हन्झ यांनी उत्पादनसंस्थेचा सिद्धांत मांडला नाही; तथापि त्याचे श्रम व भांडवलविषयक सिद्धांत महत्त्वाचे आहेत.

जेव्हन्स यांच्या मते, वस्तूची मागणी वस्तूमध्ये असलेल्या मनुष्याची गरज पूर्ण करण्याच्या शक्तीवर अवलंबून असते. या शक्तीला त्यांनी ‘उपयोगिता’ असे नाव दिले. उपयोगिता ही व्यक्तीनिष्ठ असल्यामुळे एकाच वस्तूची उपयोगिता निरनिराळ्या व्यक्तींच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. त्याच प्रमाणे प्रत्येक वस्तूच्या निरनिराळ्या नगांची उपयोगितासुद्धा परिस्थितीनुसार बदलत जाते. जेव्हन्स यांनी वस्तूची एकूण उपयोगिता आणि प्रत्येक नगाची उपयोगिता यांमध्ये फरक केला आहे. त्यांनी असेही सूचविले की, वस्तूची एकूण उपयोगिता आणि प्रत्येक नगाची उपयोगिता यांमध्ये असणारे फरक लक्षात न घेतल्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांचा घोटाळा झाला. त्यांच्या मते, वस्तूचा जो शेवटचा नग उपभोगला असेल, त्याची उपयोगिता म्हणजे अंतिम किंवा शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता होय. याला मार्शल यांनी सीमांत उपयोगिता असे संबोधिले. वस्तूच्या अंतिम उपभोगीतेवरून वस्तूचे मूल्य ठरते. वस्तूची संख्या घटल्यास शेवटच्या नगाची उपयोगिता वाढते.

  • घटता सीमांत उपयोगिता : जेव्हन्स यांनी कोष्टके व कोष्टकावरून काढलेल्या आकृतीवरून असे दाखवून दिले की, व्यक्तीजवळ वस्तूचा साठा जसजसा वाढत जातो, तसतशी प्रत्येक नगाची उपयोगिता ही त्या वस्तूच्या पूर्वीच्या नगापेक्षा घटत जाते. या प्रकारे प्रत्येक नगाची उपयोगिता त्यापूर्वीच्या नगाच्या उपयोगितेपेक्षा कमी असते. अशा प्रकारे जेव्हन्स यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडला.
  • सम-सीमांत उपयोगिता : जेव्हन्स यांच्या मते, व्यक्ती अनेक वस्तूंचा उपभोग घेत असते. त्यामुळे अशा अनेक वस्तूंचा उपभोग घेताना त्यातील प्रत्येक वस्तूच्या शेवटच्या नगाची उपयोगिता समान राहील, असा व्यक्ती प्रयत्न करते. असा अप्रत्यक्ष रीत्या सम-सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जेव्हन्स यांनी मांडला.
  • विनिमय : जेव्हन्स यांनी विनिमयाबाबतही आपले विचार मांडले आहे. त्यांच्या मते, दोन वस्तूंमधील विनिमय दर म्हणजेच दोन वस्तूंच्या देवाण-घेवाणीचा दर होय. तो दर त्या दोन वस्तूंच्या अंतिम उपयोगितेच्या प्रमाणात ठरतो. जेव्हन्स यांनी समाजाकडून विनिमय कशा प्रकारे केला जातो, याचे स्पष्टीकरण देताना तटस्थता किवा समवृत्तीचा नियम आणि देवघेव करणारा घटक अशा दोन कल्पना मांडल्या.

मूल्यमापन :

  • गणित पद्धतीचा उपयोग करून जेव्हन्स यांनी अर्थशास्त्राला शास्त्रशुद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
  • जेव्हन्स यांनी मूल्य सिद्धांताची चर्चा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोण ठेवून केली.
  • त्यांनी सीमांत कल्पनेचा प्रत्यक्ष उपयोग केल्याचे दिसून येते.
  • जेव्हन्स यांनी पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांचे उपयोगीतेविषयक विखुरलेले तुटक तुटक विचार एकत्रित करून त्यांतून अत्यंत महत्त्वाचे मूल्य, विनिमय आणि विभाजन यांविषयी सिद्धांत मांडले.
  • व्यक्तिनिष्ठ भूमिका स्वीकारली असताही देवघेव करणारा गट, खुली स्पर्धा, खुला व्यापार इत्यादी तत्त्वांचा जेव्हन्स यांनी पुरस्कार केला.
  • जेव्हन्स यांच्या विचारसरणीवर टीका करणाऱ्यांकडून असे मत व्यक्त केले जाते की, त्यांनी बाजार किंमतबाबत व्यक्त केलेले विचार अपुरे होते.
  • व्यक्तिनिष्ठ मूल्यसिद्धांताची मांडणी करताना श्रम या घटकाचा प्रभाव मूल्यावर पडतो, असे जेव्हन्स यांनी प्रत्यक्ष रीतीने स्वीकारले नव्हते.
  • जेव्हन्स यांनी व्यक्तिनिष्ठ भूमिका आणि सीमांत उपयोगिता या संकल्पनेचा उपयोग मूल्याचे विवेचन करण्याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत कुठेही केलेला दिसून येत नाही.

पैसा, किंमत व आर्थिक चढउतार यांसंबंधीचे सांख्यिकीय विश्लेषण करणारे जेव्हन्झ यांचे लेख त्यांच्या मृत्यूनंतर ‘इन्व्हेस्टिगेशन्स इन करन्सी अँड फिनान्स’ या शीर्षकाने ग्रंथबद्ध झाले. या लेखांवरून आर्थिक व वित्तीय सांख्यिकीचे आलेखीय विवरण करण्याचे आद्य कार्य जेव्हन्झ यांनी केल्याचे आढळते. चलन व्यवहारांतील होणाऱ्या नियतकालिक आंदोलनांसंबंधीचे त्यांनी केलेले विवरण व विश्लेषण हे पुढील संशोधकांना आदर्शवत ठरले. जेव्हन्झ यांनी निर्देशांकांची रचना आणि त्यांसंबंधीच्या सर्व प्रश्नांचे निरसन या ग्रंथांत केले आहे. सामाजिक व सर्वसाधारण आर्थिक समस्यांवर जेव्हन्झ यांनी उपयुक्ततावाद्यांच्या दृष्टिकोणातून आपले लेखन केले. खुला व्यापार तत्त्वाचा ते कट्टर पुरस्कर्ते होते. सहकार तत्त्व व कामगारांच्या सहभागिता योजनांविषयी त्याचे अनुकूल मत होते. मार्शल यांनी जेव्हन्स यांच्या विचारांना महत्त्व दिले. त्यांनी प्रतिपादन केले की, ‘मी जेव्हन्सपासून जेवढे शिकलो, तेवढे अन्य कोणत्याही अर्थशास्त्रज्ञांकडून शिकलो नाही’.

जेव्हन्झ यांची तर्कशास्त्रवेत्ता म्हणूनही ख्याती होती. त्यांनी आकारिक तर्कशास्त्रामध्ये विशेष महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी तर्कशास्त्रासंबंधी प्यूअर लॉजिक (१८६४); दी सब्स्टिट्यूशन ऑफ सिमिलर्स (१८६९); एलीमेंटरी लेसन्स इन लॉजिक (१८७०); प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स (१८७४) इत्यादी ग्रंथांचे लेखन केले आहे.

जेव्हन्झ यांचे सुसेक्स परगण्यातील बेक्सहील येथे पाण्यात बुडून निधन झाले.

संदर्भ : The New Palgrave : A Dictionary of Economics, V. 2, 1987.

समीक्षक : दि. व्यं. जहागीरदार