नलावडे, सुलोचना श्रीधर : (३० सप्टेंबर १९४५). महाराष्ट्र तमाशासृष्टीत नृत्य, अभिनय आणि गायन या तीनही कलाप्रकारातील नामवंत कलाकार. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडं या छोट्याशा गावातील बळवंतराव आणि केशरबाई खेडकर या कलावंत दांपत्यापोटी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. बळवंतराव खेडकर यांचा दशावतारापेक्षा तमाशा कलेकडे जास्त ओढा होता. वडिलांच्या तमाशा सादरीकरणावेळी तमाशातील नामवंत कलावंताचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लहानपणीच मिळाले होते. दत्ता महाडिक या तमाशा कलावंताने सुलोचना यांना प्रारंभी नृत्याचे धडे दिले. दत्ता महाडिक यांच्या नृत्य शिकवणूकीने त्या नृत्यात पारंगत झाल्या आणि वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी त्यांना कलामंचावर कला सादर करायला सुरुवात केली. कसदार अभिनय हा अंगभूत गुण आणि गायनाची आवड यामुळे मुंबईत नुकत्याच स्थापन झालेल्या कलाकुंज या नाट्यसंस्थेच्या श्रीधर नलावडे या नाट्यनिर्मात्याच्या चाळांचा नाद या तमाशाप्रधान नाटकात त्यांना काम करायची संधी मिळाली. कलाकुंज या नाट्यसंस्थेकडून मुंबई, पुणेसारख्या शहरांतून नाटकाचे प्रयोग होत राहिले. चाळांचा नाद या नाटकापाठोपाठ माझ्या जाळ्यात घालवायचं मासा, हरबाची पारू, नथीतून मारला तीर, राहूने गिळली चंद्रकोर अशी दर्जेदार नाट्यकृती सादर केल्या.
दरम्यान १९६२ मध्ये सुलोचना आणि श्रीधर हे दोघे वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. कालांतराने सुलोचना यांनी तमाशा क्षेत्र सोडले; मात्र नंतर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या कलावंतांसोबत त्यांनी नाटकांमधून लोकप्रिय भूमिका वठविल्या. दादा कोंडके यांच्याबरोबर विच्छा माझी पुरी करा, मधु कांबीकर यांच्यासोबत बाईचा चटका उडवला पटका, दादू इंदुरीकर यांच्यासोबत गाढवाचं लग्न आणि वसंत सबनीस यांचे कुणाचा कुणाला मेळ नाही अशा लोकप्रिय नाट्यकृतीत त्यांनी अतुलनीय अभिनय केला. दादा कोंडके आणि सुलोचना यांनी स्वतः गाऊन सादर केलेली एका तासाची ‘मुंबईची लावणी’ फार लोकप्रिय झाली होती. त्यांनी गाढवाचं लग्न यामध्ये साकारलेले ‘गंगी’ हे पात्र त्यांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी देऊन गेले. पुढे श्रीधर नलावडे यांनी शिवनेर लोकनाट्य मंडळ स्थापन केले आणि आणि त्यातूनच श्रीधरराव धोलवडकरसह सुलोचना नलावडे हा तमाशाफड सुरू केला (१९७२). अल्पावधीतच हा तमाशाफड खेडोपाडी लोकप्रिय झाला. किसन खंडागळे या पट्टीच्या ढोलकीपटूच्या जबरदस्त ढोलकी वादनावर सुलोचना यांनी सादर केलेला अप्रतिम मुजरा हे या तमाशाचे बलस्थान होते.
पतीचे निधन झाल्यावरही (१९८६) त्यांनी तमाशात गायन आणि अभिनय करणे चालू ठेवले होते. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशाफडातून पुढे त्यांनी अभिनय आणि गायन केले. २०१४ मध्ये मात्र तमाशा कलेची प्रदीर्घ सेवा करून त्यांनी कलेचे कार्य थांबविले. तमाशा कलाक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार (२००७) हा पुरस्कार प्रदान केला आहे. लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार (२००३), संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सन्मान पत्र (२०१६) इत्यादी पुरस्कारही त्यांना लाभले आहेत.
संदर्भ :
- क्षेत्रसंशोधन