क्रिटिऑस, संगमरवर.

ग्रीकमधील सुवर्णकाळात अभिजात कलेची निर्मिती झाली, म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या या काळाला अभिजात काळ अशा नावाने ओळखतात. ग्रीक कलेच्या इतिहासातील कला आणि सर्वोत्तम शिल्पाकृतींच्या निर्मितीसाठी या काळाकडे एक महत्त्वाचा परिवर्तन बिंदू म्हणून बघितले जाते. या काळात (इ.स.पू. ४८० ते इ.स.पू. ३२३) ग्रीक शिल्पकारांनी आधीच्या रूढी-परंपरा सोडून या कामात अतुलनीय यश प्राप्त केल्याचे आढळते. त्यांनी वास्तविक उंचीएवढ्या, वास्तविक उंचीपेक्षा लहान तसेच कितीतरी विशाल आकाराच्या शिल्पांची निर्मिती केली. या काळामध्ये मनुष्य, प्रामुख्याने नग्न पुरुषप्रतिमांना श्रेष्ठत्व दिले गेले. अभिजात काळाच्या सुरुवातीच्या काळातली क्रिटिऑस (Kritios) या मुलाची संगमरवरातील जीवनमानापेक्षा थोड्या लहान आकारातील प्रतिमा विशेष आहे. यात मुलाच्या चेहऱ्यावर आर्ष काळाचे ठराविक स्मित दाखवलेले आहे. मूर्तीचा उजवा पाय पुढे केलेला असून डाव्या पायावर संपूर्ण शरीराचा भार सांभाळलेला दिसतो. ह्या प्रतिमेमधून ग्रीक शिल्पकारांना मानवी शरीराच्या विविध अंगांची प्रमाणबद्धता व संतुलन समजून आल्याचे दिसून येते.

थाळी फेकणारा खेळाडू, रोमन प्रतिकृती

अभिजात काळात संगमरवराचे महत्त्व अधिक वाढले. त्याचे रूपांतर एका अतिशय सुंदर माध्यमात होऊन या माध्यमात सर्वच शिल्पकारांनी शिल्प घडविण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. काही कालावधीतच ग्रीक शिल्पकारांनी संगमरवर ह्या माध्यमावर प्रभुत्व मिळविले आणि मानवाचे स्वतंत्र अस्तित्व समजून घेत उल्हसित मुक्त हालचाली आणि भावमुद्रा शिल्पातून दाखविल्याचे आढळते. या काळातील मुक्त हालचाल दाखविणारे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मिरोन (Myron, इ.स.पू. ४८०-४४०) या शिल्पकाराच्या मूळच्या कांस्यामधील The Discus Thrower (म. शी. ‘थाळी फेकणारा खेळाडू’ – इ.स.पू. ४६०-४५०) या त्रिमित शिल्पाची संगमरवरातील रोमन प्रतिकृती. या शिल्पात कार्यरत खेळाडूच्या स्नायूंची गतीमान स्थिती एखाद्या छायाचित्रात पकडल्याप्रमाणे दाखवली आहे. थाळी फेकणाऱ्या या खेळाडूच्या शरीराला पडलेला पीळ अचूक दाखवलेला असून त्याच्या स्नायूंचे आकुंचन व प्रसरण यांचा शिल्पात अप्रतिम संयोग दिसतो.

अभिजात काळात प्रथमच शिल्प प्रतिमांमध्ये मानवी शरीरशास्त्राप्रमाणे चित्रण करणे योग्य मानले जाऊ लागले. परिणामी दगड आणि कांस्यामध्ये घडविलेली या काळातील शिल्पे चिरस्थायी ठरली. मानवाकृतींमधील ताठर आणि गतिहीन अवस्था जाऊन त्यांची जागा अधिक स्वतंत्र व त्रिमितीय गतिमान हालचालींनी जागा घेतलेली दिसते. ज्यामुळे शिल्पे बघणारा त्याच्या सौंदर्याच्या मूल्यांकनासाठी मानवी शरीराशी तुलना करत असे. या काळात मानवी शरीर हे प्रथमच अभ्यासाचा विषय बनून त्याकडे देवाप्रमाणे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झाल्याचे दिसून येते. अभिजात काळात जेव्हा ‘मानवांस या ग्रहावरील एक सजीव म्हणून योग्य महत्त्व प्राप्त झाले आणि संगमरवर व कांस्य अशा माध्यमांतून देवतांना मूर्त स्वरूप आले’, तेव्हा एक दीर्घ बौद्धिक उत्क्रांती होऊन ती त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचली. तेथील लोकशाही आणि तत्त्वज्ञानाच्या झालेल्या या नवीन उदयामुळे कलेचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला.

शिल्पाचा एखादा विशिष्ट भाग कोरताना वापरलेल्या तंत्रात छिन्नी बाहेरून आत नेण्याऐवजी आतून बाहेर आणत सफाईने कोरीव काम केलेले दिसते. शिल्पप्रतिमा कामुक दिसत असून त्यांच्या हालचालींमध्ये क्षणिक स्तब्धता आलेली दिसते. चेहऱ्यांवर अधिक हावभाव आढळतात. पूर्ण प्रतिमा एखाद्या विशिष्ट भावस्थितीत असल्याचे जाणवते. वस्त्रांचे रेखाटनही अधिक सूक्ष्म होऊन वाऱ्यावर उडालेले अथवा भिजलेले वस्त्र दाखवताना ते शरीराला ज्या ठिकाणी चिकटलेले आहे, त्याच्या आतील भागांवरील बारकावेही शिल्पांत आलेले दिसतात. या काळातील शिल्पाकृती फक्त शिल्प न राहता जीवनातील उत्साहाने भरलेली होती.

झ्यूस, फिडियसच्या मूळ शिल्पाची रोमन प्रतिकृती, इ. स. १ शतक संगमरवर व कांस्य

अभिजात काळातील महत्त्वाच्या उल्लेखनीय कलाकृतींमध्ये प्रामुख्याने शिल्पकार फिडीयसने (इ.स.पू. ४९०-४३०) बनविलेल्या पार्थनॉन मंदिरामधील संगमरवरातील अथीना पार्थनॉस आणि ऑलिंपिया येथील झ्यूस या देवतांच्या प्रतिमा यांचा समावेश होतो. अथीना पार्थनॉसची मूळ मूर्ती (इ.स.पू. ४३८) ३८ फूट उंचीची सोने आणि हस्तिदंत यांचा वापर करून बनविण्यात आली होती. लांब झगा घातलेल्या अथीनाच्या उजव्या हातात विजयाची देवता ‘नायकी’ उभी आहे, तर पायाजवळ साप दाखवलेला असून डाव्या हातात तिने ढाल पकडलेली दाखवली होती. आता हे मूळ शिल्प जरी नष्ट झालेले असले, तरी यासारखीच अथीनाची मिश्र माध्यमातील ४१ फूट १० इंच उंचीची आधुनिक प्रतिकृती अमेरिकेतील नॅशव्हिल येथे उभारण्यात आली आहे.

फिडीयसने इ.स.पू. सु. ४३५ मध्ये पूर्ण केलेली ऑलिंपिया मंदिरातील झ्यूसचे शिल्प ही त्याची सर्वोत्तम कलाकृती मानली जाते. हे झ्यूसचे मूळ शिल्प इ.स.पाचव्या शतकात नष्ट झाले. तरीही प्राचीन ग्रीक व रोमन पुराणांमधून तसेच तत्कालीन प्रवाशांच्या ग्रंथांमधून व त्याच्या छोट्या रोमन प्रतिकृतीवरून झ्यूसच्या मूळ प्रतिमेची कल्पना येते. त्यावरूनच नंतरच्या काळात झ्यूसच्या या प्रतिमेच्या कितीतरी प्रतिकृती बनवण्यात आल्या. मूळ शिल्प मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग व्यापेल इतके विराट होते. त्याची साधारण उंची जवळपास १२.२५ मीटर इतकी होती. या मोठ्या प्रतिमेचा जगातील पुरातनकालीन सात आश्चर्यांमध्ये समावेश केला जात असे. फिडीयसच्या मूळ शिल्पामध्ये झ्यूस सिंहासनाधिष्ठित असून त्याच्या उजव्या हातात विजयाची देवता ‘नायकी’ उभी आहे, तर डाव्या हातात राजदंड धरलेला दाखविला होता. मूलतः लाकडाचा गाभा असलेल्या झ्यूसच्या या प्रतिमेवरही अथीना प्रमाणेच वरचे आवरण हस्तिदंती तर वस्त्रे सोन्याची केलेली होती. पॅनीनोस (Panaenos) या चित्रकाराने ही प्रतिमा, वस्त्र आणि सिंहासन यांवर सुबक नक्षीकाम करून रंगवली होती.

भालाधारी युवक, रोमन प्रतिकृती.

अभिजात काळात संगमरवराप्रमाणे कांस्यामध्ये कितीतरी शिल्पनिर्मिती झाली; परंतु हे माध्यम वितळवून परत वापरता येत असल्याने या काळातील फार कमी कांस्यशिल्पे टिकली आहेत. अभिजात काळातील काही कांस्यशिल्पांच्या नंतरच्या प्रसिद्ध रोमन कलाकारांनी संगमरवरात हुबेहूब प्रतिकृती केलेल्या असल्याने मूळ कलाकृतींचे महत्त्व समजून येते. उदा., इ.स.पू. सु. ४४० मधील डोरिफोरोस (Doryphoros, म. शी. भालाधारी युवक) ही कलाकृती अभिजात काळातील दुसरा महान शिल्पकार पॉलिक्लिटस (Polykleitos, इ.स.पू. ४५० – ४१५) याने केलेली होती. पॉलिक्लिटस याने खेळाडू व वीरपुरुषांच्या कांस्यामधील अभिजात प्रतिमा तयार करून पुरुषशिल्पांची आदर्श प्रमाणे व नियम सिद्ध केले. त्याच्या या पुरुषाकृतीच्या प्रमाणबद्धतेच्या नियमाला ‘कॅनन’ (Canon) अशा नावाने ओळखतात. याचा प्रत्यय दृश्यमान व प्रमस्तिष्क आदर्श अभिव्यक्ती असलेल्या त्याच्या ‘भालाधारी युवक’ या शिल्पातून लक्षात येतो. अंदाजे साडेसहा फूट उंचीच्या मूळ कांस्यशिल्पाप्रमाणेच या रोमन प्रतिकृतीमध्येही युवकाच्या शरीराचे वजन पूर्णपणे त्याच्या उजव्या पायावर टाकलेले असून डावा पाय थोडा मागे उचललेला आहे. उजवा हात सरळ खाली सोडलेला असून डावा हात उचललेला आहे आणि त्यात भाला पकडलेला असावा. त्यामुळे डावा खांदा उजव्या खांद्यापेक्षा थोडा वरती दाखवलेला आहे. युवक उजवीकडे खाली बघत असल्याने मान व डोके खाली झुकलेले दाखवलेले दिसते. पॉलिक्लिटसने शिल्पात युवकाला विरोधात्मक स्थितीमध्ये दाखवले असले, तरी त्यात युवकाचे शरीर योग्य समतोल स्थितीत आणलेले दिसते.

द ॲफ्रोडाइटी ऑफ नाइडस, संगमरवरातील रोमन प्रतिकृती

इ.स.पू. ३७० ते ३३० या कालावधीत अथेन्सचा शिल्पकार प्रॅक्सीटेलीझ (Praxiteles) याने अनेक सुप्रसिद्ध शिल्पांची निर्मिती केली. ऑलिंपियाच्या हेरा (hera) मंदिरातील उत्खननात (१८७७) प्रॅक्सीटेलीझने बनवलेले पारीन (इजीअन समुद्रातील पारोस बेटावरील अर्धपारदर्शक सफेद संगमरवर) संगमरवरातील हर्मीझ विथ द इन्फंट डायोनायसस हे उल्लेखनीय शिल्प सापडले. प्रॅक्सीटेलीझचे दुसरे उल्लेखनीय शिल्प म्हणजे द ॲफ्रोडाइटी ऑफ नाइडस. प्राचीन ग्रीक कलेमध्ये नग्न स्त्रियांच्या शिल्पांची निर्मिती अपवादानेच झालेली दिसते. अभिजात काळात प्रथमच या वास्तव आकारातील वास्तववादी नग्न स्त्रीशिल्पाची निर्मिती प्रॅक्सीटेलीझने केली. या वेळेपर्यंत ग्रीक शिल्पांमध्ये अनावृत्त पुरुषाकृतींनीच आपले वर्चस्व राखले होते. प्रॅक्सीटेलीझने शिल्पात अफ्रोडाइटी दैनंदिन जीवनातील कृतींमध्ये व्यस्त दाखवलेली आहे. डावीकडे बघत असलेल्या अफ्रोडाइटीने तिचे जघनास्थी स्वाभाविकपणे उजव्या हाताने ढालीसारखे झाकलेले असून स्नानाची तयारी करत असताना तिच्या डाव्या हातातील वस्त्र पाण्याच्या सुरईवरती तिने धरलेले आहे. हे मूळ ग्रीक शिल्प नष्ट झाले असले, तरी त्याच्या रोमन प्रतिकृती अस्तित्वात आहेत.

ॲपॉक्सिओमिनॉस, संगमरवरातील रोमन प्रतिकृती

उत्तर अभिजात काळातील उल्लेखनीय शिल्पकारांमध्ये प्रामुख्याने लायसिपस (Lysippus) व स्कोपस (Scopas) यांचा समावेश होतो. लायसिपस हा अलेक्झांडरच्या दरबारातील शिल्पकार होता. त्याने अलेक्झांडरच्या अनेक शिल्पप्रतिमा बनविण्याचे काम केले. १८४९ मध्ये रोममधील ट्रास्टइव्हरी (Trastevere) येथील उत्खननात ६ फूट ९ इंचाची लायसिपस याने केलेल्या ॲपॉक्सिओमिनॉस या खेळाडूच्या या कांस्यशिल्पाची संगमरवरातील रोमन प्रतिकृती मिळाली. या शिल्पाला व्हेटिकन अपॉक्सीमिनॉस म्हणूनही ओळखले जाते. या शिल्पाचे छोटे शीर, लांबट हातपाय आणि धड अशी काल्पनिक पण सुंदर आणि  वास्तविकतेपेक्षा मोठी १:८ प्रमाणातील आकृती हे वैशिष्ट्य आहे. लायसिपसची ही खऱ्या अर्थाने विरोधात्मक स्थितीतील शिल्पप्रतिमा असून, त्यात खेळाडूने हातांची हालचाल करण्याच्या भावनेने हात समोर केलेले असून शरीराचा पूर्ण भार डाव्या पायावर दिलेला आढळतो. त्याने खेळाडूच्या शरीराची सडपातळ प्रमाणबद्धता व केशरचनेचे सूक्ष्म तपशीलवार चित्रण केलेले दिसते.

संदर्भ :

  • Boardman, J., Greek Sculpture : The Classical Period, London, 2005.
  • Stewart, Andrew,  Art, Desire, and the Body in Ancient Greece, Cambridge, 1997.
  • Stewart, Andrew, Classical Greece and the Birth of Western Art, Cambridge, 2008.
  • Whitley, James, The Archeology of Ancient Greece, United Kingdom, 2001.

समीक्षक : नितीन हडप