भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील ग्रीक पद्धती. ग्रीक चित्रकलेमध्ये भित्तिचित्रांची परंपरा ही मिनोअन व मायसिनीअन कांस्य (ब्राँझ) युगापर्यंत मागे जाते. नॉसस, टायरिन्झ आणि मायसीनी येथील भित्तिलेपचित्रण हे याचेच उदाहरण आहे; परंतु ह्या पूर्ववर्ती आणि नंतरच्या ग्रीक भित्तिचित्रांमध्ये कोणतेही सातत्य असल्याचे स्पष्ट होत नाही. फलक चित्रांपेक्षा सार्वजनिक इमारती, घरे आणि थडग्यांमधील भित्तिलेपचित्रण कमी प्रतिष्ठेचे होते, तरी पॉझनियसने त्याच्या लिखाणात भित्तिचित्रांचे वारंवार वर्णन केलेले आढळते. त्यांतील कितीतरी भित्तिचित्रे प्रामुख्याने अभिजात व ग्रीकांश (हेलेनिस्टिक) काळातील असल्याचे आढळते. सगळीच काळाच्या ओघात टिकाव धरू शकलेली नसली, तरीही काही महत्त्वाच्या भित्तिचित्ररचनांमध्ये कालापोडी (Kalapodi) येथील मंदिरातील तसेच पेस्तुम येथील ‘पाण्यात उडी मारणारा’ (Tomb of diver from Paestum) या नावाने प्रसिद्ध असणारे चित्र असलेल्या थडग्यातील आणि वेरजीना येथील शाही थडग्यांमधील (Royal tombs of Vergina) चित्रांचा समावेश होतो.

थीब्झ (Thebes) जवळील कालापोडी येथील मंदिरात इ.स.पू. सु. सातव्या शतकातील सशस्त्र पायदळ सैनिकांमध्ये झालेल्या लढ्यातील दृश्यांचे चित्रण केलेले आढळते. शुष्क भित्तिलेपचित्रण तंत्रात केलेल्या ‘थीब्झ येथील पवित्र पट्टी’ (Sacred Band of Thebes) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रात साधारण १५० समलिंगी पुरुषांच्या जोड्या आपापल्या जोडीदाराला वाचविण्यासाठी लढा देत असतानाची दृश्ये चित्रित केलेली दिसतात. ग्रीक चित्रकलेतील हा एक महत्त्वाचा शोध मानला जातो. तत्कालीन व नंतरच्या काळातील मृत्पात्री चित्रकार ह्या चित्रांवरून प्रभावित असल्याचे मानले जाते.

पाण्यात उडी मारणारा भित्तिलेपचित्र, पेस्तुम, इटली

थडग्यांच्या सजावटीसाठी केलेल्या भित्तिचित्रांतील आजही अस्तित्वात असलेल्या मोठ्या प्रमाणातील व सर्वोत्तम चित्रांमध्ये इ.स.पू. सु. ४८०-४७० मधील दक्षिण इटलीतील पेस्तुम येथील ‘पाण्यात उडी मारणारा’ या थडग्यातील चित्राचा समावेश होतो. हे थडगे ७.१ × ३. ३ × २. ६ फूट इतके असून पाच चुनखडीच्या फरशांनी बांधलेले आहे. मृत्यूनंतरचे जीवन दाखविणाऱ्या ह्या थडग्याच्या आंतरपार्श्वभागावर सार्द्र भित्तिलेपचित्रण तंत्रामध्ये चित्रण केलेले आढळते. ज्यावरून ह्या थडग्यास नाव देण्यात आले. ते एका नग्न तरुण युवकाचे पाण्याच्या प्रवाहात उडी मारतानाचे दृश्य छतासाठी वापरलेल्या फरशीवर चित्रित केलेले दिसते. मृत्यूच्या क्षणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या चित्रात मृत व्यक्तीचा आत्मा जीवनातून अनंतकाळाच्या सागरात प्रवेश करतानाचे दृश्य दर्शविलेले दिसते. थडग्याच्या दोन्ही बाजूंच्या लांब फरशीवरील चित्रांमध्ये जेवणानंतरच्या मद्यपान समारंभाची उत्कृष्ट दृश्ये चित्रित केलेली दिसतात. यामध्ये समलिंगी पुरुष युगुलांव्यतिरिक्त इतर व्यक्ती मद्यपान करताना, बासरी वाजवताना, सारंगी वाजवताना, प्रेमपूर्वक एकमेकांस न्याहाळताना दाखवलेली आढळतात. बाकीच्या छोट्या दोन फरशांवर एकावर पांढरे कपडे परिधान केलेल्या स्त्रीची छोटी आकृती बासरी वाजवताना दाखवलेली दिसते. तिच्या मागे अनावृत्त खेळाडू व हातात काठी घेतलेली वयस्कर व्यक्ती जाताना दाखवलेल्या दिसतात. तर दुसऱ्या फरशीवर एक युवक मद्यपात्र हातात घेतलेला दाखवलेला असून त्याच्यामागे मोठा मद्यकुंभ ठेवलेला दिसतो. ह्या भित्तिलेपचित्रांत गिलाव्याचा एकच थर दिलेला असून त्यांवर चित्र रेखाटनासाठी प्रथम लाकडी कोरणीने कोरून घेऊन नंतर तांबड्या रंगाने रेखाटन केलेले दिसते. येथील चित्रांत काळा, तांबडा, निळा, हिरवा आणि पांढरा असे रंग वापरलेले दिसतात.

पेस्तुम येथे सापडलेली इतर थडगी इ.स.पू. सु. चौथ्या ते तिसऱ्या शतकातील म्हणजे लुकॅनिअन (Lucanian) कालावधीतील असावीत. ह्या कालावधीतील पेस्तुमच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भित्तिचित्रांसह थडगी आढळतात. त्यातील काही उत्तम कलाकृती पेस्तुमच्या संग्रहालयात जतन केलेल्या आहेत. या कलाकृतींमध्ये ‘सिंहाची शिकार’, ‘दोन सारथी’ अशा चित्रांचा समावेश होतो.

राजा फिलिप दुसरा याच्या थडग्यावरील शिकारीचे दृश्य, भित्तिलेपचित्र, वेरजीना; खाली चित्राचे प्रतिरूपण

मॅसिडोनियाची पहिली राजधानी असलेल्या वेरजीनामधील शाही थडग्यांमध्ये मिळालेल्या राजा फिलिप दुसरा (इ.स.पू. ३३६) तसेच राणी यूरीडिझ (Eurydice) यांच्या व सोबतच्या इतर थडग्यांमधून भित्तिलेपचित्रण केलेले आढळते. राजा फिलिप दुसरा याच्या संगमरवरातील थडग्याच्या डोरीक मंदिरांप्रमाणे केलेल्या प्रवेशद्वारावरील भिंतीवर ५.६० मीटर लांबीचे भित्तिलेपचित्रण केलेले दिसते. चित्रणात शिकारीच्या दृश्यात तीन घोडेस्वार आणि सात पुरुष सिंह, रानडुकर व हरणाची शिकार करताना दाखविलेले असून, त्यातील वयस्कर व दाढी असलेली व्यक्ती फिलिप व काळ्या घोड्यावर अलेक्झांडर आपले लक्ष्य साधताना दाखवल्याचे दिसते. हे चित्र तत्कालीन इरेट्रीयाचा कलाकार फिलॉक्सिनोस (Philoxenos) याने केलेले असल्याचे मानले जाते.

हेडीझ पर्सेफोनीचे अपहरण करताना, भित्तिलेपचित्र, वेरजीना.

या शाही थडग्यांमधील एका थडग्यात उत्तरेकडील भिंतीवर शुष्क भित्तिलेपचित्रण तंत्रात ग्रीक पुराणकथेतील ‘हेडीझ पर्सेफोनीचे अपहरण करताना’चे (Hades abducting Persephone) दृश्य चित्रित केलेले आढळते. मृतात्म्यांचा देव हेडीझ हा झ्यूस आणि डीमीटरची मुलगी पर्सेफोनी हिचे अपहरण करून रथातून तिला घेऊन जात असताना, तो एका हाताने रथ चालवत असून दुसऱ्या हाताने त्याने पर्सेफोनीला धरून ठेवलेले आहे असे दृश्य दाखविलेले दिसते. थडग्यातील पूर्वेकडील भिंतीवर डीमीटर व दक्षिणेकडील भिंतीवर इतर तीन आकृत्या दाखवलेल्या आहेत. थडग्यात मिळालेल्या सोबतच्या मृत्पात्रांवरून हे चित्र इ.स.पू. ३४० ते ३६६ मध्ये ग्रीक चित्रकार निकोमॅकोस (Nikomachos) याने काढले असल्याचे मानले जाते.

मेजवानीचे दृश्य, भित्तिलेपचित्र, थेसालोनायकी.

मॅसिडोनिया तेथे मिळालेली थडगी आणि त्यातील चित्रमय सजावटीसाठी श्रीमंत आहे. मॅसिडोनियातील थेसालोनायकी येथील इ.स.पू. चौथ्या शतकातील एगियोस एथेनेसिस (Agios Athanasios) ह्या थडग्यात कितीतरी उच्च प्रतीची भित्तिलेपचित्रे आढळतात. येथील प्रवेशाद्वाराच्या वरील भिंतीवर केलेल्या चित्रणातील फक्त पुरुषांसाठी असलेल्या मेजवानीच्या दृश्यात अनेक रंगांचा वापर केल्याचे आढळते. या चित्रात दाखवलेल्या सर्व व्यक्ती आपल्या समोरील अन्न व मद्याचा आस्वाद घेताना दिसतात. तर त्यांच्या मनोरंजनासाठी असलेल्या स्त्रिया गिटार आणि बासरी वाजवताना दाखवलेल्या आहेत. दुसऱ्या चित्रपट्टीत पायी चालत जाणाऱ्या तरुण पुरुषांची मिरवणूक दाखवलेली असून त्या मिरवणुकीतून दोन घोडेस्वार आपला मार्ग काढत जात आहेत, तर भाला व ढाल घेतलेले मॅसिडोनियन सैनिक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत, तसेच प्रवेशद्वारावर दोन ग्रीक पोशाख घातलेले रक्षक उभे आहेत, असे दृश्य दाखवलेले दिसते.

आर्ष काळातील भित्तिचित्रकारांमध्ये क्लीओने येथील चिमोन (Cimon of Cleonae) या चित्रकाराव्यतिरिक्त इतर फार चित्रकारांची माहिती उपलब्ध नसली तरी अभिजात काळातील अशा अनेक चित्रकारांची माहिती उपलब्ध असल्याचे दिसते. पाचव्या शतकातील महत्त्वाच्या अभिजात चित्रकारांमध्ये प्राथमिक स्वरूपाच्या छायाप्रकाशाचे कलात्मक चित्रण करणारा अपोलोडोरस (Apollodorus), हेराक्लीझचा झुक्सिस (Zeuxis of Heraclea), मोठ्या प्रमाणातील रेखीव यथार्थचित्रण करणारा अगाथार्कस (Agatharchos), पऱ्हासिअस (Parrhasius) आणि डायना देवीचे इफिसस येथील फलक चित्रण करणारी स्त्री-चित्रकार तिमरेत (Timarete) यांचा समावेश होतो. चौथ्या शतकातील उल्लेखनीय चित्रकारांमध्ये उत्तर अभिजात काळात प्रामुख्याने राजा फिलिप दुसरा याच्या दरबारातील जास्त प्रकाशमय तसेच सावलीचा भाग रंगविण्याची नवीन पद्धत शोधणारा कोस येथील चित्रकार अपेल्लेस (Apelles) याचा समावेश होतो.

संदर्भ :

  • Betancourt, Philip P., Introduction to Aegean Art, Philadelphia, 2007.
  • Holloway, R., The Tomb of the Diver, American Journal of Archaeology, 2006.
  • Hornblower, Simon; Antony Spawforth, The Oxford Classical Dictionary, New York, eds. 1996.

समीक्षक : नितीन हडप