मिल्स, सी. राईट (Mills, C. Wright) : (२८ ऑगस्ट १९१६ – २० मार्च १९६२). प्रसिद्ध अमेरिकी समाजशास्त्रज्ञ आणि जहाल राजकीय विचारवंत मिल्स यांचा जन्म टेक्सास येथे मध्यमवर्गीय इंग्लिश-आयरिश कुटुंबामध्ये झाला. त्यांनी इ. स. १९३९ मध्ये टेक्सास विद्यापीठामधून सामाजशास्त्र विषयाची बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर इ. स. १९४१ मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पिएच. डी. ही पदवी संपादन केली. त्यांच्या पीएच. डी.च्या संशोधन प्रबंधाचा विषय ‘अ सोशलॉजिकल अकाउंट ऑफ प्राग्मॅटिझ्म: ॲन एसे ऑन दी सोशलॉजी ऑफ नॉलेज’ हा होता. त्यांनी आपल्या प्रबंधात प्रामुख्याने उच्च शिक्षणातील व्यावसायिक संस्थिकरणाच्या प्रक्रीयेमागील अमेरिकी व्यवहार्यतेची (अमेरिकन प्राग्मॅटिझ्म) भूमिका विषद करण्याचा प्रयत्न केला. मिल्स यांनी इ. स. १९४६ पासून ते १९६२ पर्यंत प्रामुख्याने कोलंबिया विद्यापीठामध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून काम केले. तत्पूर्वी त्यांनी अमेरिका तसेच यूरोपमधील अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापन व संशोधन केले होते.
मिल्स यांची यूरोपातील अभिजात तसेच समकालीन सिद्धांत परंपरेवर चांगलीच पकड होती. त्यांच्या संपूर्ण मांडणीवर कार्ल मॅनहेम यांच्या ‘ज्ञानाचे समाजशास्त्र’ आणि जी. एच. मिड यांच्या स्व आणि सामाजिक या संकल्पनांचा मोठा प्रभाव होता. अमेरिकेतील मार्क्सवादी समाजशास्त्र घडविण्यामध्ये मिल्स यांचा मोलाचा वाटा होता. मिल्स हे ‘कोलंबिया बरो ऑफ अप्लाइड सोशल रिसर्च’ (बेस) येथे संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी शीतयुद्ध सुरू होण्याच्या काळातील अमेरिकेमधील ५०० महत्त्वाच्या ट्रेड युनियन चळवळी व चळवळीतील नेत्यांमधील क्रांतिकारी क्षमतांचा अभ्यास केला आणि त्या मर्यादित असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांचा हा अभ्यास प्रामुख्याने संख्यात्मक अभ्यास पद्धतीवर आधारित होता.
मिल्स यांनी अमेरिकेतील कामगार वर्ग, समाज आणि सत्ता संरचना यांचाही सखोल अभ्यास केला. त्यांनी अमेरिकेत उदयास आलेल्या नव्या मध्यम वर्गाला ‘परावलंबी नोकरदार वर्ग’ असे म्हटले आहे. छोट्या व्यावसायीकांनी बनलेला जुना मध्यम वर्ग व नव्याने उदयाला आलेल्या पांढरपेश्या नोकरदारांचा नवा मध्यम वर्ग यांच्या तुलनात्मक अभ्यासातून मिल्स यांनी हे दाखवून दिले की, नव्याने उदयाला आलेला हा मध्यम वर्ग एकीकडे ट्रेड युनियन, तर दुसरीकडे मोठे व्यावसायिक अशा दुहेरी कात्रीत सापडलेला आहे. हा मध्यम वर्ग राजकीय दृष्ट्या परावलंबी तर आहेच, पण दिशाहीन आणि स्वतःच्या नव्याने आत्मसात झालेल्या दर्जाने एकप्रकारे प्रभावित आहे, असे मिल यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांनी मध्यम वर्गावर केलेला अभ्यास समाजातील स्तरीकरणाच्या संदर्भात केलेल्या अभ्यासाचाच एक प्रकारे विस्तार होता, असे म्हटले जाते.
मिल्स यांनी प्रामुख्याने अमेरिकी समाजातील सत्ता संरचनेच्या बहुआयामी व पारंपरिक मार्क्सवादी विश्लेषण पद्धतीला नकार देत संस्थात्मक विश्लेषण पद्धतीचा पुरस्कार केला आहे. यातून त्यांनी हे दाखवून दिले की, अमेरिकी समाजात मोठ्या कंपन्या, राज्यसंस्थेतील विविध कार्यकारी शाखा आणि सैन्य दलातील उच्चपदी बसलेल्या अभिजन अधिकाऱ्यांच्या हाती सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. त्यांस ‘सत्ताधारी अभिजन’ असे त्यांनी संबोधिले आहे. मिल्स यांच्या मते, हे सर्व सत्ताधारी अभिजन बरेचदा एके काळचे शाळेतील जुने मित्र असतात. त्यांचे अनेक वेळा सामाजिक जाळे सारखे असते, ज्यामुळे त्यांचे अनुभव आणि हितसंबंध सारखे असतात. तसेच एकूणच व्यवस्थेची घडी बिघडू नये ही आकांक्षा आणि त्यासाठीच्या हितसंबंधांच्या बाबतींतदेखील त्यांच्यात साधर्म्य असते. अमेरिकेतील महत्त्वाचे निर्णय (उदा., अमेरिकेने युद्धात सहभागी व्हायचे किंवा नाही) हे सत्ताधारी अभिजन घेतात. संख्येने कमी असणाऱ्या या मुठभर अभिजानांकडे सत्तेचे केंद्रीकरण झालेले असते. अशा विविध अमेरिकी समाजातील स्तरीकरणाच्या व्यवस्थेचे सखोल विश्लेषण त्यांनी केले आहे.
मिल्स हे समाजशास्त्राच्या अभ्यासकाबरोबरच एक जहाल राजकीय विश्लेषक आणि भाष्यकारसुद्धा होते. १९५० च्या सुमारास त्यांची मार्क्सवादी विचारधारेमधील आणि एकूणच तिसऱ्या जगातील प्रश्नांबाबतची रुची अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसते. मिल्स यांनी क्युबामधील वास्तव्यात असताना फिडेल कॅस्ट्रो, चे गेव्हारा यांच्यासारख्या साम्यवादी नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन तेथील समाजव्यवस्थेची पाहणी केली. त्या वेळी ते तेथील शिक्षण व आरोग्य व्यवस्थांमुळे प्रभावित झाले, ज्याचे वर्णन त्यांनी ‘स्वतंत्र समाजवाद’ असे केले. त्यांनी क्युबामधील साम्यवादी क्रांतिकारकांच्या दृष्टिकोणासह तेथील परिस्थिती, तसेच क्युबा आणि अमेरिका यांच्यातील तत्कालीन संबंधांबाबत आपले मत व्यक्त केले. अमेरिकेने क्युबामधील साम्यवादी क्रांती दडपण्यापासून परावृत्त करू नये, मिल्स यांच्या या मतामुळे, तसेच त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या क्रांती समर्थक आणि राजकीय जहाल भूमिकांमुळे ते अमेरिकी समाजशास्त्रात नेहमीच परीघावर राहिले. त्या वेळी त्यांना केवळ टीकेला सामोरे जावे लागले नाही, तर ते कित्येक वर्षे अमेरिकी सरकारी गुप्तहेर यंत्रणेच्या निगराणी खाली होते; परंतु या सर्वांची परवा न करता त्यांनी कायम मुख्यप्रवाही समाजशास्त्राची चिकित्सा केली.
मिल्स यांना समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून कार्यरत असताना मार्क्सवादी विचारपरंपरेची दखल घेण्याची गरज नेहमीच वाटत राहिली. यामुळेच त्यांनी ‘स्वतःला अतिकुशल समजणाऱ्या मार्क्सवाद्यांची’ चिकित्सा करून त्याद्वारे मार्क्सवादाने आपल्या अयशस्वी अथवा निष्फळ ठरलेल्या प्रारूपाची आंधळेपणाने पाठराखण केल्याबद्दल त्यांना प्रश्नांकित केले. याउलट, त्यांनी स्वतःला ‘साधा मार्क्सवादी’ असे संबोधिले व मार्क्सवादाचे सूत्र आणि पद्धतीशास्त्र अवलंबून तत्कालीन ऐतिहासिक वास्तवाचे विश्लेषण करता येईल अशी अभ्यास पद्धती विकसित केली.
मिल्स यांनी टॉलकॉट पार्सन्स यांच्या समाजशास्त्राची आणि त्यांनी मांडलेल्या बृहद सिद्धांताची कठोर चिकित्सा केली आहे. त्या वेळी अमेरिकी समाजशास्त्र म्हणजे टॉलकॉट पार्सन्स यांचे समाजशास्त्र असे समीकरण मांडले जात होते; तरीसुद्धा मिल्स यांनी पार्सन्स यांच्या समाजशास्त्राची धाडसी चिकित्सा केली. ते ज्या काळात लिखाण करत होते, त्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकी समाज अत्यंत पुरातनवादी व जहाल राजकीय विचारधारांच्या बाबतींत अत्यंत संशयास्पद वृत्ती बाळगून होता. अमेरिकी समाजशास्त्रज्ञदेखील या वातावरणाने प्रभावित होते. याच काळात पार्सन्स हे पुरातनवादी वातावरणाने प्रभावित असलेल्या तत्कालीन समाजशास्त्राचे महत्त्वाचे पुरस्कर्ते होते.
मिल्स यांनी ‘व्यक्तिगत प्रश्न’ आणि ‘सामाजिक समस्या’ यांच्यातील सहसंबंधांवरही प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, ऐतिहासिकता आणि माणसाचे व्यक्तिगत चरित्र हे एकमेकांना घडवित असतात. म्हणजेच माणसाच्या व्यक्तिगत अथवा खाजगी आयुष्याचा अर्थ व्यापक ऐतिहासिक संदर्भातच समजू शकतो. त्याच बरोबर इतिहासाचे योग्य आकलन हे व्यक्तीच्या खाजगी आयुष्याच्या संदर्भातच शक्य होते. खाजगी आणि सार्वजनिक जगाच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणे आणि त्याद्वारे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे विश्लेषण करणे, हा समाजशास्त्राचा मुख्य उद्देश आहे, असे मिल्स यांचे मत होते. या परस्परसंबंधांचे योग्य आकलन होण्यासाठी सामाजशास्त्रज्ञांकडे विशिष्ट वैचारिक कौशल्य असण्याची गरज आहे. त्या कौशल्याचे वर्णन मिल्स यांनी ‘समाजशास्त्रीय कल्पकता’ असे केले आहे. ही ‘समाजशास्त्रीय कल्पकता’ व्यापक ऐतिहासिक घटकांचा व्यक्तीच्या खाजगी जीवनातील घडामोडींशी असलेला सहसंबंध उलगडून दाखवते आणि यामधूनच समाजाचे अधिकृतपणे आकलन करता येते, असे मिल्स यांनी म्हटले. त्यांची हीच मांडणी समाजशास्त्रात पद्धतीशास्त्राच्या पातळीवर महत्त्वाचे योगदान देणारी ठरली.
मिल्स यांनी मुख्यप्रवाही समाजशास्त्राची चिकित्सा आरंभल्यामुळे त्यांना ‘जहाल समाजशास्त्राचे जनक’ म्हणून संबोधिले जाते. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या जहाल राजकीय भूमिकांमुळे त्यांचे अनेक वैचारिक शत्रू निर्माण झाले. यामुळे त्यांचे आयुष्य हे कायमच तणावपूर्ण राहिले व त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा त्रास निर्माण झाला. अमेरिकेतील मुख्यप्रवाही समाजशास्त्रज्ञांनी दुर्लक्षिलेल्या मार्क्सवादी परंपरेला समाजशास्त्रीय सिद्धांतात जिवंत ठेवण्यामध्ये मिल्स यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
मिल्स यांनी आपले बहुतांश लिखाण शीतयुद्धादरम्यानच्या कालावधीमध्ये आणि नंतरही केले. त्यांनी पुढील ग्रंथ लिहिली. दी न्यू मेन ऑफ पॉवर : अमेरिकाज लेबर लिडर, १९४८; व्हाइट कॉलर : दी अमेरिकन मिडल क्लास, १९५१; कॅरेक्टर अँड सोशल स्ट्रक्चर, १९५३; मास सोसायटी अँड लिबरल एज्युकेशन, १९५४; दी पॉवर इलाइट, १९५६; दी पॉलिटिक्स ऑफ ट्रुथ, १९५८; सोशलॉजिकल इमॅजिनेशन, १९५९; लिसन यान्की : दी रिव्होल्युशन इन क्युबा, १९६०; दी मार्क्सिस्ट, १९६३ इत्यादी.
मिल्स यांचे वेस्ट निॲक (न्यू यॉर्क) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
संदर्भ :
- Ritzer, Goerge, Sociological Theory, 2008.
- Scott, John (ed), fifty Key Sociologists : The Contemporary Theorists, Oxfordshire, 2007.
समीक्षक : वैशाली दिवाकर