सिन्हा, सुरजीतचंद्र (Sinha, Surajit Chandra) : (१ ऑगस्ट १९२६ – २७ फेब्रुवारी २००२). प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बंगालमधील नेत्रोकोना जिल्ह्यातील दुर्गापूर (सध्याचा बांग्लादेश) येथे राजेशाही कुटुंबात झाला. सुरजीतचंद्र हे सुसांगचे महाराजा भूपेंद्रचंद्र सिन्हा यांचे थोरले पुत्र होते. सुरजीतचंद्र यांचे सुरुवातीचे शिक्षण बल्लीगंज विद्यालय, कलकत्ता (कोलकाता) येथे झाले. नंतर त्यांनी प्रेसिडेंसी कॉलेज, कलकत्ता येथे भौतिकशास्त्र या विषयाचे शिक्षण घेण्यास प्रवेश घेतला; परंतु पुढे विषय बदलून त्यांनी भूरचनाशास्त्र हा विषय घेतला. त्यांनी निर्मल कुमार बोस यांच्या सूचनेवरून भूरचनाशास्त्र हाही विषय सोडून मानवशास्त्र या विषयाचा अभ्यास केला आणि त्यात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इ. स. १९४९ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९५३ मध्ये सामाजिक मानवस्त्रातील व्याख्याता म्हणून काम केले. सुरजीतचंद्र यांच्या दक्षिण आशियातील कार्यावर शिकागो येथील मानवशास्त्रातील विचारवंतांची खोलवर छाप पडली. यातून आदिवासींची संस्कृती व सभ्यता यांबद्दलचे त्यांचे अध्ययन सतत चालू होते. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, इलिनॉय येथे ‘दी अकल्चरेशन ऑफ दी भूमीज ऑफ मानभूमी : ए स्टडी इन सोशल क्लासफॉर्मेशन अँड इथ्निक इन्टिग्रेशन’ हा शोधनिबंध सादर करून १९५६ मध्ये त्यांनी मानवशास्त्र या विषयाची पीएच. डी. ही पदवी संपादन केली. सुरजीतचंद्र यांचा विवाह भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि संगीतशास्त्री पूर्णिमा सिन्हा यांच्याशी झाला. त्या प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि बंगाली साहित्यिक नरेश्चंद्र सेनगुप्त यांच्या कन्या होत.

सुरजीतचंद्र हे एक तेजस्वी (फुलब्राइट) अभ्यासक म्हणून अमेरिकेच्या दौर्‍याव्यतिरिक्त ते जगातील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यागत साहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापक होते. त्यांनी नॉर्वे, लंडन, स्वीडन, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, बँकॉक, कॅनडा इत्यादी ठिकाणी परिषद आणि चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. ते १९६१-६२ मध्ये शिकागो विद्यापीठासोबतच ड्यूक विद्यापीठातही मानवशास्त्र विषयाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. १९६३-६४ मध्ये ते कॅलिफोर्नियातील स्टँनफोर्डमधील सेंटर फॉर ॲडव्हॉन्स्ड स्टडी इन दी बिहेविअरल सायन्सेस या संशोधन केंद्रात अभ्यागत संशोधक होते. मायदेशी परतल्यानंतर १९६४-६५ मध्ये ते बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कृषी आणि सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, नंतर १९६५-६६ मध्ये विश्व भारती, शांतिनिकेतन येथे कुलगुरू झाले. नंतर ते कलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सामाजिक मानवशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९६९ ते १९७२ या काळात कलकत्ता येथील अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे ते सहसंचालक आणि १९७२ ते १९७५ या काळात ते संचालक म्हणून प्रशासकीय पद सांभाळले. या काळात ते भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सल्लागार मानले जात. त्यांनी १९६२ मधील कटक येथील एकोणपन्नासाव्या सत्राच्या भारतीय विज्ञान महासभेच्या मानवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र या विभागांचे अध्यक्ष पद भूषविले. सेवानिवृत्तीनंतर कलकत्त्यामधील सामाजिक विज्ञान अध्ययन केंद्राच्या वतीने दी इंडियन कौंसिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्च या संशोधन केंद्राचे ते संचालक म्हणून नियुक्त झाले.

सुरजीतचंद्र यांना मानवशास्त्र या विषयाबद्दल त्यांचे गुरू निर्मल कुमार बोस आणि तारकचंद्र दास यांनी सखोल मार्गदर्शन केले. पारंपरिक मानवशास्त्रात प्रत्येक लोकसमूहाला एक स्वतंत्र समाज म्हणून अभ्यासण्याची प्रथा होती. रॉबर्ट रेडफील्ड यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यात आलेल्या अनुभवातून या परंपरेला छेद देणारा विचार मांडला. प्रत्येक गाव, खेडे व त्यांतून वसलेला समाज हा विनिमयाच्या प्रेरणेतून इतर समूहांच्या विशेषतः शहरी संस्कृतीच्या संपर्कात येत असतो आणि त्यातून शहरी आचार, विचार, चाली, रिती, यांचा प्रभाव खेड्यांतील लोकसमूहांवर पडतो आणि ही नागरी संस्कृती ग्रामीण जनतेकडून स्वीकारली जाते. त्यामुळे असे लोकसमूह स्वतंत्र रीत्या अभ्यासणे सयुक्तिक ठरणार नाही, असा विचार त्यांनी मांडला. भारतीय समाजामधील हे ग्राम संस्कृतीचे नागरी संस्कृतीकडे होणारे वहन किंवा संक्रमण अभ्यासण्याचे श्रेय सुरजीतचंद्र यांच्याकडे जाते. निर्मल कुमार बोस यांनी मांडलेल्या उच्च वर्गीय हिंदू समाजाच्या सानिध्यात येणारा आदिवासी समाज कालांतराने आपले अस्तित्व हरवून हिंदू समाज पद्धतीतील निम्नस्तरीय घटक म्हणून वागवले जातात, या  सिद्धांतावर नकारात्मकता दर्शवून सुरजीतचंद्र यांनी त्यावर अजून सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ही बाब त्यांच्या विचाराच्या सामर्थ्याबद्दल एक महत्त्वपूर्ण मानली जाते.

सभ्यतात्मक दृष्टिकोणाची मांडणी : सभ्यतात्मक दृष्टिकोण म्हणजे एखाद्या समाजाला त्याच्या सभ्यतेतून समजणे होय. एक सभ्य समाज असा असतो की, ज्याचे फक्त अस्तित्वासाठीच्या संघर्षापासून सापेक्ष स्वातंत्र्य ते संस्कृती व संरचनेत अधिक जटील बनण्यास सक्षम करते. बोस आणि सुरजीतचंद्र यांनी भारतीय समाज आणि संस्कृती यांच्या अध्ययनासाठी सभ्यतात्मक दृष्टिकोण विकसित केला; परंतु बोस यांनी ‘जमात-हिंदू सातत्य प्रतिकृती’ (ट्राइब-हिंदू कंटिन्युम मॉडेल) चे अनुसरण केले, तर सुरजीतचंद्र यांनी रेडफील्ड आणि मिल्टन सिंगर यांचे ‘जमात-जात-कृषक सातत्य प्रतिकृती’ (ट्राइब-कास्ट-पिझंट कंटिन्युम मॉडेल) घेऊन पुढे गेले. अर्थात, हा दृष्टिकोण सर्वप्रथम शिकागो विद्यापीठाचे रेडफील्ड यांनी मेक्सिकन ग्राम समुदायाच्या अध्ययनातून विकसित केला. सुरजीतचंद्र यांनी या सिद्धांताचे भारतीयकरण करताना आदिवासी समुदायाचे अध्ययन सभ्यतात्मक दृष्टिकोणाच्या आधारावर केले.

सुरजीतचंद्र यांनी छोटा नागपूर या प्रदेशातील मुंडा जमात आणि छत्तीसगढ या प्रदेशातील गोंड जमात यांच्याविषयी अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, ब्रिटिशांनी मुंडा आणि गोंड जमातींचा प्रदेश ताब्यात घेण्यापूर्वी या दोन्ही आदिवासी प्रदेशांमध्ये स्तरीकरण आणि राज्य निर्मितीची समान प्रक्रिया दिसून आली. त्यामुळे मुंडा राज कुटुंबियांनी नागवंशी राजपूत दर्जाचा दावा केला; तर गडमंडला, देवगड, खेरला व चांदा ही गोंडवनातील राज्ये तेराव्या शतकात विकसित झाली. तेथे ४०० वर्षे राजवट चालली आणि सतराव्या शतकात मराठा संघात विलीन झाली. त्यांनी जमात-जात सातत्य आणि जमात-कृषक सातत्य यांची संकल्पना भारताच्या पारंपरिक सभ्यतेशी जोडली आहे. या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी बस्तर जिल्ह्यातील हिल माडिया गोंड आणि बराभूममधील (बंगाल) भूमिज या दोन समूहांची तुलनात्मक चर्चा केली आहे. बराभूमचे मूळनिवासी भूमिज आहेत, असे ते म्हणतात. भूमिज जमातीच्या पूर्वजांनी जंगल साफ करून शेतीयोग्य जमीन तयार केली. खारिया आणि पहिरा या जमाती सोडून भूमिजसाठी बाकी सर्व वांशिक समुदाय हे बाहेरचे आहेत. भूमिज जमातीकडे अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणे आहेत, जी त्यास इतर वांशिक समूहांपासून वेगळे करते, असे त्यांचे मत होते.

सुरजीतचंद्र यांनी माडिया गोंड आणि भूमिज यांच्यात फरक केला आहे. त्यांच्या मते, ‘जमात’ ध्रुवापासून ‘कृषक’ आणि ‘जात’ ध्रुवाजवळ जाताना एक तीव्र आंदोलित बदल (ए शार्प स्विंग) सामील आहे. यात फरक असला, तरी एका परिस्थितीतून दुसर्‍या परिस्थितीत जाताना स्थित्यंतर देखील आहे. माडिया गोंड आणि भूमिज या दोन्ही ध्रुवांमध्ये मानववंशविषयक विभिन्नता, त्यातून निर्माण होणारी जटिलता, विभिन्न धार्मिक समूहांमधील आंतरक्रिया यांमुळे अधिक तफावत निर्माण होते. नांगरशेती, क्षेत्रीय कारागीर, बाजार संघटन व जमिनीचे संघटन इत्यादींमध्ये तफावत होती. दोन्ही आदिवासी समूहांत भूमिज समूह बाजारी व्यवस्थेत पुढे गेला आणि हिंदू धर्माच्या बृहत परंपरेशी अधिक जोडला गेला. जातीचा बहुखंडीय आणि जटील श्रेणीबद्ध समूह हा हिंदू सभ्यतेच्या संघटनेतील केंद्रीय सिद्धांत आहे. अशा प्रकारे भारतीय सभ्यतेची संरचना आणि मध्य भारतातील आदिवासी समुदायांमधील स्थित्यंतराचे अध्ययन सुरजीतचंद्र यांनी केले आहे.

सुरजीतचंद्र यांनी आदिवासींच्या चळवळींचे अध्ययन, जातिव्यवस्था, धर्माचे समाजशास्त्र, स्थानिक समुदाय, क्षेत्रीय अध्ययने आणि वांशिक समूह यांच्या अभ्यासामध्येही योगदान दिले आहे. त्यांनी भूमिज आदिवासीच्या हिंदू जातिव्यवस्थेमधून एकात्मिकरणावर काम करत आदिवासींच्या स्थित्यंतराचे अध्ययन केले. त्यांनी ओरिसा, पश्चिम बंगाल व बिहार (अविभाजित) या राज्यांतील काही जिल्ह्यांत व्यापकपणे काम केले. त्यांनी भारतीय सभ्यता आणि त्याच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे मानवशास्त्रीय अध्ययन केले. पश्चिम बंगालमधील रार प्रदेशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरावरही त्यांनी काम केले. विशेषत: भारताच्या द्विपकल्पीय क्षेत्रातील कमी प्रभावित आदिवासी संस्कृतीतील स्थित्यंतराला त्यांनी जवळून पाहिले आहे.

सुरजीतचंद्र हे अमेरिकन मानवशास्त्रीय संघटन, भारतीय मानवशास्त्रीय समाज व संघटन, सांप्रत मानवशास्त्र आणि एशियाटिक सोसायटी यांसारख्या शैक्षणिक संघटनेचे सदस्य होते. एस. सी. रॉय यांनी इ. स. १९२१ मध्ये सुरू केलेल्या मॅन इन इंडिया या प्रसिद्ध मानवशास्त्रीय पत्रिकेचे ते १९७३ पासून ते १९८० पर्यंत संपादक होते. काही काळ ते जर्नल ऑफ दी इंडियन ॲन्थ्रोपोलॉंजिकल सोसायटीचे संपादकही होते. ते बंगाली, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेतील अस्खलित जाणकार होते.

सुरजीतचंद्र यांनी मध्य भारतातील बंगाल आणि बिहारमधील भूमिज जमातीबाबत व्यापक संशोधन कार्य केले. त्यांच्या हितसंबंधामध्ये भारतीय सभ्यतेची संरचना आणि मध्य भारतामधील आदिवासींचे स्थित्यंतर समाविष्ट होते. त्यांचे जीवन मार्क्सवादी, गांधीवादी, टागोरवादी आणि सभ्यतावादी अशा अनेक वैचारिक मूल्य दृष्टिकोणांनी प्रभावित राहिले.

सुरजीतचंद्र यांचे निधन शांतिनिकेतन येथे झाले.

संदर्भ :

  • सहारे पद्माकर, भारतीय समाजविषयक दृष्टिकोण, औरंगाबाद, २०१५.
  • Baidyanath, Saraswati, Tribal Thought and Culture : Essays in Honour of Shri Surajit Chadra Sinha, New Delhi, 1991.
  • Diamond, Stanley, Anthropology : Ancestors and Heirs, New York, 1980.
  • Kulke, Hermann, The State in India 1000-1700, Delhi, 1995.
  • Nagla, B. K., Indian Sociological Thought, Jaipur, 2008.
  • Singh, Suresh K., The Tribal Situation in India, Delhi, 1986.

समीक्षक : संजय सावळे