दाढा माशाचा समावेश अस्थिमस्त्य वर्गातील ॲक्टीनोप्टेरीजी (Actinopterygii) या उपवर्गाच्या पर्सिफॉर्मीस (Perciformes) गणातील पॉलिनीमिडी (Polynemidae) कुलात होतो. याला इंग्रजीत इंडियन थ्रेडफिन (Indian threadfin) असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव लेप्टोमेलॅनोसोमा इंडिकम (Leptomelanosoma indicum) असून हा मासा पूर्वी पॉलिडॅक्टिलस इंडिकस (Polydactylus indicus) ह्या नावाने ओळखला जात असे. याचा आढळ दक्षिण-पूर्व आशिया तसेच पापुआ न्यू गिनी येथील किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत आहे. हे मासे उथळ पाण्यात राहणे पसंत करीत असल्याने भूखंडमंचाच्या प्रदेशांत (Continental shelf) यांचा वावर असतो.
दाढा माशाचे शरीर लांबट आणि चपटे असते. डोके लांब असून मुस्कटावर (Snout) डोळे असतात. शरीराचा रंग काळपट तपकिरी असून शरीराची लांबी १.४२ मीटरपर्यंत नोंदली गेली आहे. सर्वसाधारणपणे शरीराची लांबी सु. ८० सेंमी. असते. काळसर रंगाचे दोन पृष्ठपर असून त्याच्या कडा दाट काळ्या असतात. पहिल्या पृष्ठपरामध्ये आठ कंटिका (Spine), तर दुसऱ्या पृष्ठपरामध्ये एक कंटिका असून १२ किंवा १३ मऊ अर (Soft rays) असतात. गुदपराला (Anal fin) तीन कंटिका व १०-११ अर असतात. अंसपराला (Pectoral fin) १२–१४ अर असतात. अंसपराच्या खाली दोऱ्यासारखे वाढलेले लांब पिवळसर ५ तंतुपर असतात. त्यातील पहिला तंतु हा सर्वांत तोकडा असतो, तर पाचवा तंतु सर्वांत लांब असून श्रोणिपराच्या टोकाच्या पलीकडे पोहोचतो. श्रोणिपर (Pelvic fin) पिवळट रंगाचा असून बुडाशी काळपट असतो. गुदपर हा दुसऱ्या पृष्ठपरापेक्षा कमी रुंदीचा असून त्यात तीन कंटिका व १०-११ मऊ अर असतात. पार्श्वरेखा (Lateral line) ६९–७२ छिद्रयुक्त खवल्यांची असते. पुच्छपराचे (Caudal fin) विभाजन दोन समान भागांत झालेले असते व त्याची टोके दोऱ्याप्रमाणे लांब व निमुळती असतात. हे मासे साधारणपणे तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतात. दाढा माशाचे आयुर्मान सु. १५ वर्षांचे असते.
हे मासे मांसाहारी असून खेकडे, झिंगे व अस्थिमत्स्य माशांची पिले खातात. या माशात उभयलिंगत्व आढळते. इंडियन थ्रेडफिन ही आशियाई देशांमध्ये मत्स्यपालनाकरिता उपयोगात आणली जाणारी अतिशय महत्त्वाची जाती आहे. त्यामुळे व्यापारीदृष्ट्या याला फार महत्त्व आहे.
दाढा माशाचे मांस अत्यंत चविष्ट असते. तसेच त्याच्या वायुकोशांनाही (Alveolus) चांगली किंमत मिळते. वायुकोशापासून जिलेटीन मिळते, त्याचा उपयोग मद्य नितळीकरण प्रक्रियेत होतो. तसेच त्यातील कोलॅजेनचा वापर नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी तसेच शस्त्रक्रियेदरम्यान टाके घालण्यासाठी व औषध निर्मितीसाठी केला जातो.
संदर्भ :
- https://www.idosi.org/wasj/wasj30(2)14/21.pdf
- https://en.wikipedia.org/wiki/Indian_threadfin
- http://en.bdfish.org/2011/07/indian-threadfin-leptomelanosoma-indicum-shaw-1804/
- https://fishbase.org/popdyn/KeyfactsSummary_1.php?ID=4469&GenusName=Leptomelanosoma&SpeciesName=indicum&vStockCode=4667&fc=361
समीक्षक : नंदिनी देशमुख