गोंय विद्यापीठ. गोवा राज्यातील एकमेव विद्यापीठ. त्याची स्थापना १९८४च्या गोवा विद्यापीठ कायद्यानुसार झाली. या विद्यापीठाची सुरुवात १ जून १९८५ मध्ये पणजी जवळच्या तळेगाव येथील ४२७.४९ एकर जागेमध्ये झाली. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात आगमनानंतर गोव्यामध्ये सामर्थ्यशाली अशा पॅरिस शाळा सुरू केल्या. त्यामध्ये मुख्यत: धर्माबाबतचे शिक्षण दिले जाई. गोवा विद्यापीठाने आशिया खंडातील पहिली ५ वर्षांची वैद्यकीय पदवी आणि ३ वर्षांची औषधनिर्मिती पदवी सुरू केली. गोवा सरकार व मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने जून १९६५ मध्ये पणजी येथे पदव्युत्तर संस्था आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचेच विस्तारित रूप म्हणजे आताचे हे नवे विद्यापीठ. विद्यापीठाला ‘राष्ट्रीय मूल्यनिर्धारण आणि अधिस्वीकृती परिषदे’ (National Assessment and Accreditation Council – NAC) या संस्थेचे ‘अ’ प्रमाणपत्र मिळाले असून, ‘मानव संसाधन व विकास मंत्रालया’च्या ‘राष्ट्रीय संस्थेचा दर्जा ठरविणाऱ्या विभागाने भारतामध्ये गोवा विद्यापीठाला विसावा क्रमांक दिला आहे. ‘ज्ञान पवित्र आहे’, (Knowledge is Divine) हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

विद्यापीठामध्ये भाषा; नैसर्गिक विज्ञाने; सामाजिक शास्त्रे; जीवविज्ञान व पर्यावरण; वाणिज्य; तांत्रिक शिक्षण संशोधन, व विकास; अभियांत्रिकी; कायदा व सुव्यस्था; वैद्यकीय; व्यवस्थापन; संगीत, कला आणि पर्यटन व हॉटेल व्यवस्थापन अशा १२ विद्याशाखा आहेत. विद्यापीठ महाविद्यालयांना २४ विभागांद्वारे व ३ संशोधन केंद्राद्वारे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. विद्यापीठाच्या शिक्षण विभागामार्फत सर्व पदवी आणि शैक्षणिक बाबींसाठी विस्तृत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सर्व पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठाने मुलांना त्यांच्या आवडीनुसार नव्याने निवड श्रेयांकपद्धतिची घोषणा केलली आहे. विद्यापीठाने औद्योगिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करू शकणारे अभ्यासक्रम निर्माण केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करू शकणाऱ्या संधी प्राप्त होऊ शकतील. विद्यापीठात संशोधनाला महत्त्व असून डी डी कोसंबी संशोधन केंद्र, दयानंद बांदोडकर राजकीय अर्थव्यवस्था संशोधन केंद्र, द बाकीबाब बोरकर तुलनात्मक साहित्य संशोधन केंद्र, मारिओ मिरांदा (Mario Miranda) कला, चित्र व व्यंग्यचित्र संशोधन केंद्र, अँथॉनी गोन्साल्विस पाश्चिमात्य संगीत संशोधन केंद्र, नाना शिरगावकर पारंपरिक संगीत संशोधन केंद्र अशी विविध संशोधन केंद्रे विद्यापीठात आहेत. पदव्युत्तर युवक संशोधनाकडे वळावेत यासाठी विद्यापीठामार्फत विशेष प्रयत्न केले जातात आणि तशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. विद्यार्थ्यांना नेहमी उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, याकरिता विद्यापीठाने पूर्ण वेळ मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाद्वारे काही अभ्यासक्रम महाजालकाद्वारा (Online) चालविले जातात. परिक्षार्थ्यांना १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुण हे अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के गुण हे सत्राच्या शेवटी मूल्यांकनावरून दिले जातात. विज्ञान विभाग हा विज्ञान उपकरणे, नवीन तंत्रज्ञान साधने इत्यादी साहित्यांनी सुसज्ज आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक नवनवीन संशोधने, पेटंट तयार होताना दिसत आहेत. विद्यापीठात डॉक्टरेटच्या २ विभागांचा समावेश आहे. प्रादेशिक आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमांव्यतिरिक्त लॅटिन अमेरिकन, कॅरिबियन समुद्र क्षेत्र इत्यादी विषयांचे विविध अभ्यासक्रम विद्यापीठात चालतात. तसेच फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी भाषाही विद्यापीठात शिकविल्या जातात.

गोवा विद्यापीठ कायद्यानुसार गोवा राज्याला उत्कृष्ट दर्जाचे उच्च शिक्षण प्रदान करणे, विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, यशस्वी उमेदवारांना विविध क्षेत्रांतील पदवी प्रदान करणे, वेगवेगळ्या पद्युत्तर विद्याशाखांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व त्यांना प्रवेश देणे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी चालना देऊन प्रबलन देणे, विविध परीक्षांसाठी तयारी करून घेणे आणि त्यांना योग्य उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे, वरील बाबींच्या माहितीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात माहितीपुस्तिका प्रकाशित करणे इत्यादी कार्य गोवा विद्यापीठ करीत आहे. विद्यापीठात १२ विद्याशाखांव्यतिरिक्त ‘राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र’, वास्को-द गामा, ‘राष्ट्रीय महासागरविज्ञान संस्था’, दोना पावला; ‘झेव्हिअर इतिहास संशोधन केंद्र’, आल्टो पोर्वोरीन; ‘मलेरिया संशोधन केंद्र’ पणजी; ‘थॉमस स्टीफन कोकणी केंद्र’ पोर्वोरीन; ‘भारतीय मासेमारी सर्वेक्षण केंद्र’, मोर्मुगाव; ‘निसर्गरम्य आणि आदिम वनस्पती आणि प्राणी (Flora and Fauna) संशोधन केंद्र’; ‘बुरशीजन्य संस्कृती (Fungus culture collection) संशोधन केंद्र’ इत्यादी विद्यापीठांतर्गत चालणारे विभाग आहेत.

विद्यापीठांतर्गत ‘भारत अभ्यास कार्यक्रम’ चालविला जातो. त्यात निहोन विद्यापीठ, जपान याच्याबरोबर विद्यापीठाने एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार दर वर्षी जपानवरून विद्यार्थ्यांची एक अभ्यास तुकडी सहा महिन्यांसाठी भारताच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक अभ्यासासाठी भारतात येते. लॅटिन अमेरिकन अभ्यास हा भारतातील फार कमी विद्यापीठात चालणारा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठात चालतो. त्याचबरोबर विद्यापीठाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली; इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली; कोलिमा विद्यापीठ, मेक्सिको; युनिव्हर्सिडेड मॉडर्ना, अवेरिओ विद्यापीठ, पोतुगाल; राष्ट्रीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान केंद्र, मुंबई; आण्विक संशोधन केंद्र, मुंबई; आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र फिलिपाइन्स यांच्याबरोबर काही सामंजस्य करार केले आहेत.

१९९२ मध्ये विद्यापीठाला स्वत:ची इमारत मिळाली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये विद्यापीठाचे कामकाज चालते, तर तिच्या मागील बाजूच्या इमारतीमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्र चालते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची एक आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा विद्यापीठामध्ये आहे. विद्यापीठाच्या मधोमध भव्य ग्रंथालय असून त्यामध्ये संदर्भग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ, शालेय पुस्तके अशी लाखो पुस्तके आहेत. त्याचबरोबर येथे ई-बुक सेवाही उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय पूर्णपणे संगणकीकृत असून इलेक्ट्रॉनिक सेवा व जनरल सुविधा पुरवते. विद्यापीठ परिसरात ४,००० आसनक्षमतेचे  डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी क्रीडासंकुल आहे. विद्यापीठचे अतिथीगृह ४० वातानुकूलीत खोल्यांनी सज्ज आहे. विद्यापीठामध्ये शैक्षणिक कामासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी खोल्या राखीव ठेवलेल्या असतात.

विद्यापीठाशी ५५ महाविद्यालये संलग्न आहेत. त्यांतील ३० सामान्य शैक्षणिक महाविद्यालय, तर २५ व्यावसायिक महाविद्यालये आहेत. विद्यापीठात एकूण २८,००० विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षणात मुलींची संख्या लक्षणीय आहे. गोवा विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कार्यांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे.

समीक्षक : संतोष गेडाम