ही ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता आहे. तेझ्कात्लिपोका ह्या नावाचा अर्थ धूर सोडणारा किंवा चमकणारा आरसा असा होतो. त्यास सूर्याची देवता, सर्वश्रेष्ठ देवता, उत्तरेची देवता, थंडीची किंवा वायूची देवता, अंधाराची किंवा रात्रीची देवता मानले आहे. तो चिरतरुण, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अदृश्य असून उडती सावली किंवा राक्षसी रूपात दिसतो.
तेझ्कात्लिपोका हा नियमांचा देव असून त्यानुसार सर्व मानवांच्या वर्तणुकीवर तो स्वतःच्या आरशातून लक्ष ठेवतो व नियम मोडल्यास शासन करतो. तो योद्ध्यांचा देव असून अत्यंत क्रूर कर्मे करू शकतो. त्याच्या उपासनेत दरवर्षी एका युवकाची निवड करून त्याचा विधिपूर्वक छातीतून हृदय फाडून बळी दिला जाई. तसेच तो जादूगारांचा देव असून त्याने मगरीचे रूप घेऊन पृथ्वीला विश्वाच्या आरंभी असलेल्या पाण्यातून वर काढले, अशी कथा आहे.
तेझ्कात्लिपोका हा विश्वाचा निर्माता तसेच विनाशकर्तादेखील मानला जातो. ॲझटेक मिथकांनुसार सध्याच्या सूर्यापूर्वी होऊन गेलेल्या चार सूर्यांपैकी पहिल्या सूर्यावर त्याचे आधिपत्य होते. त्याच्या व क्वेत्झलकोएत्ल ह्या देवाच्या संघर्षात ह्याआधीच्या चार सूर्यांचा नाश झाला. ह्या संघर्षात त्याचा विजय होऊन क्वेत्झलकोएत्लला हा भूभाग सोडावा लागला, असे वर्णन आहे.
तेझ्कात्लिपोकाचा संबंध भूमीशी जोडला जातो व त्याला पर्वताचे हृदय असेही म्हणतात. त्याचे जॅग्वार ह्या प्राण्याशी साहचर्य मानले जाते. त्याच्या मूर्तीत त्याचा चेहरा अस्वल किंवा तापिर या प्राण्यासारखा आहे. ॲझटेकांच्या साहित्यात काही ठिकाणी त्याचे वर्णन डोक्यावर धूर सोडणारा आरसा असलेला असे केले आहे. अन्यत्र तेझ्कात्लिपोकाच्या वर्णनात धूर सोडणारा आरसा त्याच्या एका पायाच्या ठिकाणी वर्णन केला आहे. काही ठिकाणी एका पायाच्या ठिकाणी असलेल्या धूर सोडणाऱ्या आरशातून सर्प बाहेर पडतो, असे वर्णन आहे.
संदर्भ :
- Hancock, Graham, Fingerprints of Gods, London, 1995.
- Reville, Albert, Native Religion of Mexico and Peru, New York, 1884.
- Spence, Lewis, The Mythologies of Ancient Mexico and Peru, London, 1907.
समीक्षक – सिंधू डांगे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.