समाजाला अनिवार्य असणाऱ्या वस्तू व सेवा म्हणजे गुण वस्तू. गुण वस्तूंच्या विशिष्ट स्वरूपामुळे आणि त्यांच्या जास्तीच्या किमतींमुळे लोकांकडून त्या वस्तू व सेवा यांचा उपभोग कमी प्रमाणात घेतला जातो किंवा काही लोकांची आर्थिक कुवत कमी असल्यामुळे ते अशा वस्तू व सेवा यांची किंमत अदा करू शकत नाही. त्यामुळे अशा वस्तू व सेवांचा ते पर्याप्त उपभोगही घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत या वस्तूंचा उपभोग घेता यावा म्हणून सरकार त्यांना आर्थिक मदत देते किंवा सरकारकडून गरजू लोकांना त्या गुण वस्तू व सेवा मोफत पुरविल्या जातात.

गुण वस्तूंच्या सकारात्मक बाह्य बचती असतात. त्यांचा समाजाला फायदा होत असतो. त्यांच्याशी संबंधित नसलेल्या लोकांवर आर्थिक घडामोडींचा चांगला किंवा वाईट परिणाम होतो. या परिणामाला बाह्य गुण-दोष किंवा मर्यादा असे म्हणतात. अशा लोकांनी त्या परिणामांची होणाऱ्या खर्चाची निवड केलेली नसते किंवा त्यांपासून होणाऱ्या फायद्यांचीही अपेक्षा केलेली नसते. अशा वस्तूंच्या किमती बाजारामध्ये परिवर्तीत होत नाहीत. बाह्य बचती (फायदे) या सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतात.

सकारात्मक बाह्य बचती : शिक्षणासाठी सरकारने केलेला खर्च. काही पालक आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करू इच्छित नाहीत. तेव्हा अशा पालकांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकार मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देते. त्यामुळे पालकांचा आर्थिक भार कमी होतो. राज्यातील व देशातील स्त्रीयांची साक्षरता पातळी वाढावी म्हणून मुली आणि स्त्रीयांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना छोटे कुटुंब, आरोग्य अशा विविध सामाजिक समस्यांची जाणीव होते. साक्षरतेचे देशातील प्रमाण एकूणच वाढल्याने शिस्तीचे महत्त्व, कायदा व सुव्यवस्था आणि कामगारांच्या उत्पादकतेत वाढ हे सर्व फायदे होतात.

नकारात्मक बाह्य बचती : काही उत्पादन संस्था वस्तूंचे उत्पादन करीत असताना त्यांच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी नदीत, धरणात किंवा हवेत सोडतात. त्यामुळे हवा किंवा जल प्रदूषणात वाढ होऊन त्या परिसरातील लोकांना प्रदूषणाचा त्रास होतो. अशा वस्तूंच्या किमतीमध्ये प्रदूषणग्रस्त लोकांना कोणतीही भरपाई दिली जात नाही. उदा., साखर कारखाने, रासायनिक द्रव्ये तयार करणारे कारखाने इत्यादी.

गुण वस्तू या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांकडून पुरविल्या जातात. अशा वस्तूंचा पुरवठा हा मर्यादित असल्याने त्यांचा वैकल्पिक खर्च हा खूपच जास्त असतो. या वस्तूंच्या उपभोगासाठी प्रतिस्पर्धी असते. त्यामुळे एका व्यक्तीने त्याचा उपभोग घेतला, तर दुसऱ्यांकरिता त्याची उपलब्धता कमी होते. ज्या ज्या लोकांना अशा वस्तूंची किंमत देण्याची इच्छा नसते, ते आपोआप त्या वस्तूंच्या उपभोगातून वगळले जातात. गुण वस्तूंचा कमी उपभोग घेतल्याने मुक्त अर्थव्यवस्था अपयशी ठरते. असे होऊ नये म्हणून सरकार काही सुविधा पुरवित असते. उदा., शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे म्हणून शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि सर्वसामान्यांना घरांच्या किमती परवडाव्यात म्हणून घरासाठीही आर्थिक मदत (घरकुल योजना) दिले जातात.

सार्वजनिक वाहतुकीला आर्थिक मदत दिल्याने हवेचे प्रदूषण कमी होते आणि वाहतुकीची होणारी कोंडी टाळता येऊन प्रवास सुखाचा होतो. त्याच प्रमाणे मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा देणारे सरकारी दवाखाने, रुग्णालये यांनाही सरकारद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. अशा प्रकारच्या सेवा खाजगी क्षेत्रांद्वारे घेतल्या, तर त्यांची किंमत जास्त असू शकते. प्रत्यक्षात अशा वस्तू व सेवांची किंमत फारच जास्त आहे. त्यामुळे या सेवा बहुसंख्या लोकांना मिळूच शकत नाही.

बहुसंख्य लोकांना बँकांच्या व्यवहारांची सवय लावणे हेसुद्धा सकारात्मक बाह्य बचतीचे आणखी एक उदाहरण होय. यासाठी सरकारने सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी व्यापारी आणि विदेशी बँकांना सर्वसामान्य लोकांचे जनधन खाते उघडण्यासाठी कायेशीर बंधन घातले आहे. या खात्यात शून्य रुपये असले, तरी चालणार आहे. त्यामुळे स्थलांतर करणारे कामगार, रोजच्या रोज मजुरी किंवा वेतन मिळविणारे कामगार बँकांच्या सेवा क्षेत्राचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे विविध वस्तू व सेवा त्यांच्या बाह्य बचती किंवा गुणवत्तेमुळे गुण वस्तू म्हणून ओळखल्या जातात.

भाषांतरकार : दत्ता लिमये

 समीक्षक : आर. वाय. माहोरे