अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स इंटरनॅशनल (ए.एस.टी.एम इंटरनॅशनल ), (स्थापना:  १८९८)

 

अमेरिकन सोसायटी  फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स, इंटरनॅशनल (ASTM) ही जागतिक पातळीवरची प्रमाणक संस्था असून तिची स्थापना अमेरिकेत झाली झाली होती. त्याकाळी वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे रेल्वेचे रूळ वारंवार नादुरुस्त होत. त्यामुळे चार्ल्स बेंजामिन डुडले यांच्या नेतृत्वाखाली काही संशोधक आणि तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली. प्रथम, त्यांनी रेल्वेरुळासाठी लागणार्‍या लोखंडासाठी प्रमाण तयार केले. १९०२ साली संघटनेला अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग मटेरियल असे संबोधिले गेले. पुढे १९९६ साली तिचे नामकरण अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग अँड मटेरियल असे झाले. २००१ पासून ही संघटना ए.एस.टी.एम., इंटरनॅशनल या नावाने ख्यातकीर्त बनली व तिने ‘जागतिक दर्जाची प्रमाणके’ असे ब्रीदवाक्य जाहीर केले. २०१४ पासून या संस्थेने ‘उत्तम कार्यासाठी जगाला सहाय्य’ हे धोरण स्वीकारले आहे. वस्तू, उत्पादने, प्रमाणबद्ध चाचणी-पद्धती आणि सेवा यांना लागणारी माहिती या संघटनेद्वारे नियमित प्रकाशित केली जाते. या संघटनेचे सध्याचे मुख्यालय पश्चिम कोन्शेहोकेन (पेन्सिल्वानीया) येथे असून, ब्रिटिश (BSI), यूरोपीयन (ISO, IEC), जर्मन (DIN); यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणक संस्थाच्या स्थापनेआधीपासून ती कार्यरत आहे. या संस्थेची बेल्जियम, कॅनडा, चीन, पेरु आणि वॉशिंग्टन येथे कार्यालये आहेत. जगभरात देशांतर्गत वापरली जाणारी प्रमाणे प्रामुख्याने ए.एस. टी.एम. प्रमाणावर आधारित असतात.

एखाद्या प्रमाणक-कार्यात काम करणारी आणि स्वारस्य असलेली संघटना या संस्थेची सदस्य बनू शकते. संस्थेतील विविध समित्या प्रमाणके तयार करण्यात कार्यरत असतात. आवश्यकतेनुसार, नव्या समित्यांची, उपसमित्यांची स्थापना केली जाते. समितीतील सदस्याची नेमणूक ऐच्छिक असते; त्यासाठी आमंत्रण व अधिकृत प्रक्रिया नसते. हे सदस्य उत्पादक, ग्राहक, वापरकर्ते किवा साधारण स्वारस्य असलेले सदस्य असतात व सल्लागार आणि शिक्षणतज्ञ हे या गटात मोडतात. २०१५पर्यंत संस्थेचे १४० देशांतून सुमारे ३०,००० सदस्य होते, त्यात ११५० विविध संस्था-संघटनाचा समावेश होता. ए.एस.टी.एम. इंटरनॅशनल ही संस्था आपल्या प्रमाणकांच्या परिपूर्तेतेसाठी बांधील नसते. दोन संस्थांच्या औद्योगिक करारात ही  प्रमाणे संदर्भ म्हणून वापरली जातात.

संदर्भ:

 समीक्षक : अ. पां. देशपांडे