समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की, त्यांना काही अद्वितीय (युनिक) वस्तू बाळगणे प्रतिष्ठितपणाचे वाटत असते. त्यामुळे सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात प्रचलित असणाऱ्या मागणी व पुरवठ्याच्या नियमास अशा अद्वितीय वस्तू अपवाद ठरताना दिसतात. या अद्वितीय वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झाल्यास वस्तूंच्या मागणीमध्ये मागणी नियमाच्या उलट परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्यास प्रतिष्ठितपणाचा किंवा शिष्टाईचा परिणाम असे समजले जाते. या परिणामामुळे या अद्वितीय वस्तूंच्या मागणीचा वक्र हा अत्यंत कमी लवचिक असतो. याला शिष्टाईचा परिणाम असेही म्हटले जाते.

प्रतिष्ठितपणाचा परिणाम या स्थितीत उच्च उत्पन्न गटातील व्यक्तिंची मागणी ही अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींकडून वस्तूला असणाऱ्या मागणीच्या उलट अथवा विरुद्ध दिशादर्शक असते. ज्या वस्तू अद्वितीय किंवा श्रीमंतीचे प्रतिक म्हणून समजल्या जातात. अशा वस्तूंची मागणी ही मागणी नियमाच्या उलट स्थिती दर्शविते. साधारणत: अशा वस्तूंचे पैशातील किंवा आर्थिक मूल्य खूप जास्त असते, तर त्याप्रमाणात व्यावहारिक किंवा उपभोग मूल्य अत्यल्प असते. उदा., फेरारी स्पोर्ट कार, रॅडो किंवा रोलॅक्स घड्याळे इत्यादी.

दुर्मीळ कलाकुसरीच्या वस्तू, विशिष्ट पद्धतीने तयार केलेली व अत्यंत महागडी वस्तू (उदा., मर्सिडीज कार इत्यादी) अशा वस्तूंची प्रतिष्ठा व दर्जा यांमुळे तिची मालकी अगदी थोड्या लोकांकडेच असते. अशा वस्तूंची विक्रीसुद्धा दुर्मीळ, अद्वितीय आणि विशिष्ट भूमिकेतूनच केली जाते. त्यामुळे येथे या अद्वितीय वस्तू पुरवठ्याच्या नियमासही अपवाद ठरत असल्याचे दिसून येते. अशा मौल्यवान वस्तू अनेक दशके किंवा शतकानुशतके त्यांची नाममुद्रा काळजीपूर्वक जतन करतात व प्रयत्नपूर्वक सूट देणे किंवा कमी दर्जाची उत्पादने बाजारात आणणे टाळतात. त्यामुळे हा प्रतिष्ठितपणाचा परिणाम साधला जातो. जर अशा विशिष्ट वस्तूंचा बाजारातील हिस्सा अथवा वापर वाढला, तर या वस्तूंची अद्वितीय अशी असणारी ओळख आणि दर्जा नाहीसा होणे संभव असते; कारण प्रतिष्ठितपणाचा परिणाम ही एक प्रवृत्ती असते. जर विशिष्ट नाममुद्रा असणाऱ्या वस्तूंवर सूट देण्यात आली, तर अतिश्रीमंत व्यक्तींकडून अशा वस्तूंची खरेदी अथवा वापर सोडून देण्याची शक्यता असते.

प्रतिष्ठितपणाचा परिणाम हा प्रतिष्ठितपणाच्या संस्कृतीसही लागू पडतो. प्रतिष्ठितपणाचा परिणाम हा प्रत्येक वेळी प्रत्यक्ष पैशामुळेच निर्माण होतो असे नाही. प्रतिष्ठितपणाचा परिणाम हा बँडवॅगन परिणामाच्या अगदी उलट आहे.

समीक्षक : पी. बी. कुलकर्णी