केन्डलर, ऑटो : (२३ ऑक्टोबर १९२० – २९ ऑगस्ट २०१७) ऑटो केंडलर यांचा जन्म जर्मनीतील डिगेन्डॉर्फ येथे झाला. भाज्या, फळे पिकवणे आणि विकण्याच्या घरच्या व्यवसायात मदत करताना त्यांना वनस्पतींच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या अभ्यासाची गोडी लागली. घरच्या गरीबीमुळे शिक्षणात खंड पडत असताना शिक्षकांनी त्यांची फी भरून ते संकट टाळले.

शाळेच्या सातआठ इयत्ता झाल्या असताना वयाच्या बाराव्या वर्षी ऑटो यांनी चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल ऐकले. उत्कांतीविषयी वडीलधाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शिक्षा झाली. त्यामुळे उत्क्रांती हा विषय शिकावा असे त्यांना आणखी प्रकर्षाने वाटू लागले.

केंडलर शिक्षकी पेशात येण्याचे ठरवत असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांना आणि सर्व सहाध्यायींना बव्हेरियातील राईशसर्बाईटसदिएन्स्ट या नाझी जर्मनीतील सरकारी सेवायोजना कार्यालयात काम करावे लागले. पुढे केंडलर यांना जर्मन लष्करातर्फे रशियन आघाडीवर आकाशवाणी वार्ताहर म्हणून जावे लागले. युद्ध अंतिम टप्प्यात असताना त्यांची रवानगी ऑस्ट्रियात झाली. अनेक संकटे सोसून घरी परतल्यावर भाज्या, फुले, फळे विकून त्यांनी शिक्षणासाठी पैसे उभे केले.

दुसरे महायुद्ध संपले तेव्हा लुडविग मॅक्सीमिलीयन युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिक विद्यापीठात केंडलर यांना प्रवेश मिळाला. केंडलर यांनी प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतले होते. वनस्पतीशास्त्र हा त्यांचा मुख्य विषय होता. त्यांच्या आवडीच्या विषयात वनस्पतीशास्त्रातील चयापचय क्रियांचा – विशेषतः वनस्पती ऊती संवर्धांविषयी सखोल अभ्यास करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. कार्ल ससेनगथ हे त्यांचे पीएच्.डी.चे मार्गदर्शक होते. लगेच त्यांची वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून लुडविग मॅक्सीमिलीयन युनिव्हर्सिटीत नियुक्ती झाली.

वनस्पतीशास्त्रातील प्रकाशसंश्लेषण आणि वनस्पतींतील कर्बोदकांचे चयापचय यात केंडलर यांना जास्त रुची होती. वनस्पती पेशींत घडणाऱ्या प्रकाशसंश्लेषणात प्रकाश-फॉस्फरिलन क्रियेचा प्रायोगिक पुरावा प्रथम त्यांनी आपल्या शोधनिबंधांतून सादर केला. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन रॉकफेलर फाउंडेशनने केंडलर यांना छात्रवृत्ती देऊन एक वर्षभर अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. केंडलर यांना मेल्व्हीन काल्व्हीन आणि मार्टिन गिब्स, गोविंदजी, ब्लॅक यांसारख्या अग्रगण्य प्रकाशसंश्लेषण तज्ज्ञांबरोबर काम करण्याच्या संधी मिळाली. त्यात त्यांना जर्मनीत त्याकाळी उपलब्ध नसणारी किरणोत्सर्गी समस्थानिके प्रकाशसंश्लेषणात घडणाऱ्या रासायनिक क्रियांचा माग काढण्यास मिळणार होती. कार्बन सात्मीकरणाच्या C3-चक्राच्या अभ्यासात त्यांना या समस्थानकांची मदत झाली.

वनस्पतीशास्त्राप्रमाणेच केंडलर यानी जीवाणूशास्त्रातही रस घेतला. त्यांनी जीवाणूंच्या पेशीभित्तिकांच्या रासायनिक रचनांचा अभ्यास केला. लवकरच ते जीवाणू पेशीभित्तिकांच्या रासायनिक रचनाक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून संशोधकांत प्रसिद्ध झाले. या अभ्यासाच्या आधारे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण अधिक अचूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केंडलर यानी सर्वांत लहान आकाराचे आणि पेशीभित्तिका विरहित जीवाणू प्लूरो न्यूमोनिया लाइक ऑरगॅनिझ्म्स PPLO यांचा अभ्यास करायचे ठरवले. सध्या पीपीएलो मायकोप्लास्मा या नावाने ओळखले जातात. केंडलर आणि गरट्रुड शाफेर यांचे या संशोधनावरील शोधनिबंध आजही मार्गदर्शक मानले जातात.

विविध मुद्यांवर काम करून स्वतंत्र किंवा सहलेखक म्हणून केंडलर यांनी चारशे संशोधन निबंध प्रकाशित केले. ते जर्नल ऑफ बायॉलॉजिकल फिजिक्स, प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका (PNAS), ॲन्युअल रिव्ह्यू  ऑफ प्लांट फिजिऑलॉजी, बॅक्टिरिऑलॉजिकल रिव्ह्यू, सेल्युलर अँड मॉलेक्युलर सायन्सेस यांसारख्या प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत.  

केंडलर यांना वनस्पतीशास्त्राचे पूर्ण प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून लुडविग मॅक्सीमिलीयन युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिकमध्ये पदोन्नती मिळाली होती.

पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकेन नसलेला जीवाणूंचा एक मोठा गट त्यांना आढळला. त्यातील मिथॅनोजेन आदिजीवाणूंचा त्यांनी सखोल अभ्यास केला. मिथॅनोजेन आदिजीवाणू हे जीवाणू अतिप्राचीन असावे. उत्क्रांतीक्रमात पेप्टिडोग्लायकेन रेणूनिर्मिती आणि पेप्टिडोग्लायकेनचा पेशीभित्तिकांच्या बांधणीत उपयोग करणे पेशीमध्ये होण्यापूर्वी मिथॅनोजेन अस्तित्वात आले असावे असे मत त्यांनी मांडले. कालांतराने ते मान्य झाले. इलिनॉय विद्यापीठातील अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कार्ल वूस आणि रसायनतंत्रज्ञ, जॉर्ज फॉक्स यांनी जीवाणू वर्गीकरण रायबोसोम्सच्या आरएनएतील साम्यभेदांवर आधारित असावे असे मत मांडले.

वूस आणि फॉक्स यांची निरीक्षणेही केंडलर यांच्या निरीक्षणांशी जुळतील अशा प्रकारचीच होती. या संशोधकांना आढळलेल्या गटातील सूक्ष्मजीव एकपेशीय आणि केंद्रकविहीन होते. तसेच तोपर्यंत माहीत असलेल्या सर्व जीवांपेक्षा, अगदी जीवाणूंपेक्षाही भिन्न होते.

या विचार मंथनातून केंडलर, वूस, राल्फ वूल्फ आणि फॉक्स सहसंशोधक बनले. कार्ल वूस आणि केंडलर यांनी पुढाकार घेतला आणि पूर्णतः नवा अधिक्षेत्र (domain) नामक मोठा जीवशास्त्रीय वर्गीकरणीय गट निर्माण केला. केवळ आदिजीवाणूंसाठी आर्किआ, हे नवे अधिक्षेत्र बहाल केले. आणखी अभ्यासाने कळले की आदिजीवाणू पृथ्वीवरील सध्या माहीत असलेले सर्वांत प्राचीन जीव आहेत. अनेक आदिजीवाणू अतिआम्ल, अतिअल्कली, अतिउष्ण, अतिशीत, अतिक्षारयुक्त अशा टोकाच्या पर्यावरणातही टिकू शकतात. आव्हानात्मक प्रतिकूल परिस्थितीत सक्रीय राहून संख्यावाढही करतात. दिसायला आदिजीवाणू बरेचसे जीवाणूंसारखे असले आणि जीवाणूंप्रमाणेच पेशीकेंद्रकहीन असले तरी ते अनेक बाबींत भिन्न असतात. आदिजीवाणू जनुकीयदृष्ट्या आणि शरीरक्रियांच्या दृष्टीने दृश्यकेंद्रकी जीवांच्या पेशींशी (उदा., कवक, वनस्पती, प्राणी इत्यादींच्या पेशींशी) जास्त मिळतेजुळते असतात. असे नवे मुद्दे केंडलर, वूस आणि सहसंशोधक यांनी आदिजीवाणूंचे आर्किआ, हे स्वतंत्र अधिक्षेत्र निर्माण करणे किती योग्य होते हे दर्शवतात. वनस्पतीशास्त्रात प्रकाशसंश्लेषणाखेरीज केंडलर यांनी आणि त्यांच्या संशोधन गटाने काही वनस्पतीविशिष्ट संयुगांचा अभ्यास केला. उदा., हॅमेलोज, सेलॅजिनोज, स्टॅचिओज, अंबेलिफेरोज.

लुडविग मॅक्सीमिलीयन युनिव्हर्सिटीत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त होईपर्यंत केंडलर कार्यरत होते. त्यांना पेशी पातळीपासून पूर्ण वाढलेल्या वृक्ष पातळीपर्यंतच्या जीवसंरचनेचे ज्ञान होते.

केंडलर यांना अनेक सन्मान मिळाले. जर्मन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस लिओपोल्डिनाचे ॲवार्ड, घेंट विद्यापीठातर्फे सन्मान, बर्जी ॲवार्ड आणि बव्हेरियन अकॅडमी ऑफ सायन्सेस अँड ह्युमॅनिटीजचे सदस्यत्व, मायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्यत्व, हर्मन वेईगमॅन मेडल, फर्डिनंड कोहन मेडल, ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द जर्मन रिपब्लिक हा किताब, बव्हेरियन ऑर्डर ऑफ मेरिट हे त्यातील काही सन्मान होत.

म्यूनिक येथे त्यांचे  निधन झाले .

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा