भारतीय संगीतामधील गीत हा प्रकार सगळे नियम सांभाळून जो उत्तमप्रकारे निर्माण करू शकतो त्याला “वाग्गेयकार” अशी संज्ञा आहे. त्याला यातील सर्व नियमांची चांगली माहिती असणे आवश्यक असून काव्यरचना आणि स्वररचना या दोन्हींमध्ये तो कुशल असणे अपेक्षित आहे. म्हणजेच साहित्य आणि संगीत या दोहोंमध्ये तो पारंगत असावा. वाक् म्हणजे पद्यरचना आणि गेय म्हणजे स्वररचना या दोन्हींचा मिलाप करून ‘वाग्गेय’ ही संज्ञा तयार झालेली आहे आणि अशी पद्यरचना आणि स्वररचना निर्माण करणारा तो “वाग्गेयकार” असे म्हटले जाते. तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांनी लिहिलेल्या संगीतरत्नाकर या ग्रंथामध्ये त्यांनी वाग्गेयकाराचे गुण सांगितले आहेत. त्यात त्यांनी उत्तम वाग्गेयकार, मध्यम वाग्गेयकार आणि अधम वाग्गेयकार असे वाग्गेयकारांचे वर्गीकरण दिलेले आहे. त्यात उत्तम वाग्गेयकार कसा असावा ते पुढील श्लोकाद्वारे सांगितले आहे.

“ वाङ्मातुरुच्यते गेयं धातुरित्यभिधीयते। वाचं गेयं च कुरुते यः स वाग्गेयकारकः ।।१।।
शब्दानुशासनज्ञानमभिधानप्रवीणता। छन्दः प्रभेदवेदित्वमलंकारेषु कौशलम् ।।२।।
रसाभावपरिज्ञानं  देशस्थितिषु चातुरी। अशेषभाषाविज्ञानं कलाशात्रेशु कौशलं ।।३।।
तूर्यत्रितयचातुर्यम्  ह्रद्यशारीरशालीता। लयतालकलाज्ञानं विवेकोऽनेकाकुषु ।।४।।
प्रभूतप्रतिभोद् भेदभाक्त्वं सुभगगेयता। देशीरागेष्वभीज्ञत्वं  वाक्पतुत्वं सभाजये ।।५।।
रागद्वेषपरित्यागःसाद्र॔त्वमुचितज्ञता। अनुच्छिष्टोक्तिनिर्बन्धो नूतनधातुविनिर्मितिः ।।६।।
परचित्त्परिज्ञानं प्रबंधेषु प्रगल्भता। द्रुतगीतविनिर्माणं पदांतरविदग्धता ।।७।।
त्रिस्थानगमकप्रैढ़िर्विविधालाप्तिनैपुण्म्। अवधानं गुणैर्रे भिर्वरो वाग्गेयकारकः ।।८।।

वरील श्लोकांत वाग्गेयकाराचे अठ्ठावीस गुण सांगितले आहेत. ज्याची माहिती भारतातील थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक वि. ना. भातखंडे यांनी दिली आहे, ती पुढीलप्रमाणे :

१) शब्दानुशासनज्ञान – व्याकरणशास्त्राचे ज्ञान;

२) अभिधानप्रविणता – प्राचीन ग्रंथांचे ज्ञान;

३) छंद:प्रभेदवेदित्व – सर्व प्रकारच्या साहित्यिक छंदांचे ज्ञान;

४) अलंकारकौशल – साहित्यशास्त्रात वर्णन केलेल्या सर्व अलंकारांचे ज्ञान;

५) रसभावपरिज्ञान – साहित्यशास्त्रात वर्णन केलेल्या शृंगार, करुण आदी रसांचे आणि विभिन्न भावांचे ज्ञान;

६) देशस्थितिज्ञान – वेगवेगळ्या देशातील चालीरीतींची माहिती;

७) अशेष भाषाज्ञान – देशातील सर्व भाषांचे ज्ञान;

८) कलाशास्त्रकौशल – संगीत, नाट्य आदी शास्त्रांमध्ये कुशल;

९) तूर्यत्रितयचातुर्य – गीत, वाद्य आणि नृत्य यात पारंगत;

१०) हृदयशारीरशालीता – फारसे कष्ट न करता ज्याला संगीतातील वेगवेगळ्या विधा सादर करण्यायोग्य मनोहर शरीर प्राप्त झाले आहे असा;

११) लयतालकलाज्ञान – लय, ताल आदी कलांमध्ये निपुण;

१२) अनेककाकुज्ञान – काकू म्हणजे स्वरभेद (असे सहा स्वरभेद सांगितले गेले आहेत.) या स्वराभेदांचे ज्ञान असणारा;

१३) प्रभुतप्रतीभोद्ध्येदभावत्व – तीक्ष्ण बुद्धी आणि नवीन कल्पना सुचणारी प्रतिभा असणारा;

१४) सुभगगेयता – सुखद गायन करण्याची क्षमता;

१५) देशी राग ज्ञान – देशी रागांची माहिती;

१६) वाक् पटुत्व – सभेत विजय मिळवू शकणारा वक्तृत्वगुण;

१७) रागद्वेषपरित्याग – क्रोध आणि द्वेष यांचा त्याग;

१८) सार्द्रत्व – सरसता;

१९) उचितज्ञता – कोणत्या ठिकाणी काय योग्य याचे ज्ञान;

२०) अनुच्छिष्टोक्तिनिर्बंध – संगीताची स्वतंत्र रचना करण्याची कुवत;

२१) नूतनधातुविनिर्मितीज्ञान – नवनवीन स्वररचना रचण्याचे कौशल्य;

२२) परचित्तपरिज्ञान – दुसऱ्याच्या मनामधले ओळखण्याचे ज्ञान;

२३) प्रबंधप्रगल्भता – प्रबंधाचे उत्तम ज्ञान;

२४) द्रुतगीतविनिर्माण – शीघ्र कविता करण्याची क्षमता;

२५) पदान्तरविदग्धता – निरनिराळ्या गीतांच्या छायांचे अनुकरण करण्याचे सामर्थ्य;

२६) त्रिस्थानगमकप्रौढी – तीनही सप्तकात गमक घेण्याची कुवत;

२७) आलप्तीनैपुण्य – रागालाप्ती आणि रुपकालाप्ती यांचे ज्ञान;

२८) अवधान – चित्त एकाग्र करण्याची क्षमता.

वरील सर्व गुण अथवा क्षमता असणाऱ्यास “उत्तम वाग्गेयकार” असे म्हणतात. उदा.,सदारंग, बैजू , गोपाल इत्यादी कलाकारांचा याबाबतीत उल्लेख केला जातो. जो स्वररचनेमध्ये प्रवीण परंतु काव्यरचनेत कमी असतो, अशा कलाकारास मध्यम वाग्गेयकार म्हणतात. तर ज्याला शब्दरचनेचे ज्ञान आहे, पण स्वररचनेचे नाही अशा कलाकारास अधम वाग्गेयकार म्हणतात.

संदर्भ :

  • पुरोहित, बाळ, हिंदुस्थानी संगीत पद्धती : मूलतत्त्वे आणि सिद्धांत,  नागपूर.

समीक्षक : सु. र. देशपांडे