रज्जुमान (Chordata) संघातील ज्या प्राण्यांच्या डोक्याकडील भागात मेरूरज्जू असतो, त्याचा सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ बनवला आहे. या उपसंघात अँफिऑक्सस या प्राण्याचा समावेश होतो. हा माशासारखा दिसणारा एक लहान सागरी प्राणी आहे. अँफिऑक्ससच्या ३ प्रजाती आणि २५ जाती अस्तित्वात आहेत. याचे शास्त्रीय नाव ब्रॅंकिओस्टोमा लॅंसिओलॅटम (Branchiostoma lanciolatum) आहे. लॅटिनमध्ये branchio म्हणजे ‘कल्ले’ आणि stoma म्हणजे ‘मुख’ यावरून या प्रजातीला ब्रँकिओस्टोमा हे नाव पडले आहे. तसेच लॅटिनमध्ये amphioxum या शब्दाचा अर्थ ‘दोन्ही बाजूला टोकदार असलेले’ असा होतो. या प्राण्याचे शरीर दोन्ही बाजूला निमूळते असून टोकदार असते, यावरून याला अँफिऑक्सस हे नाव दिले गेले.
अँफिऑक्सस उपसमशीतोष्ण आणि उष्ण प्रदेशात समुद्रतीरावरील उथळ पाण्यात तसेच रेताड पुळणात आढळतो. याच्या शरीराची लांबी ५—८ सेंमी. असते. क्वचित १५ सेंमी.पर्यंत लांबीचे अँफिऑक्सस आढळतात. हा नेहमी वाळूत बीळ करून राहतो, परंतु त्याचा तोंडाकडील भाग वाळूच्या वर पाण्यात असतो. रात्री हा बीळ सोडून पाण्यात पोहतो आणि पहाटेस पुन्हा वाळूत गाडून घेतो. गाळातील जैवपदार्थ व सूक्ष्म जीव हे त्याचे अन्न आहे. याला इंग्रजीमध्ये ‘लान्सलेट’ असेही म्हणतात.
अँफिऑक्ससची शरीररचना सामान्य व्यक्तीस परिचित नसली तरी कणा असलेल्या पृष्ठवंशी प्राण्यांची सर्व वैशिष्ट्ये अँफिऑक्ससमध्ये प्राथमिक स्थितीत आढळून येतात. बहुपेशीय रज्जुमान संघातील सजीवाचा भ्रूण विकास होत असताना कमीतकमी चार लक्षणे आढळून येतात, ती पुढीलप्रमाणे आहेत — चेतानलिका ज्या बाजूस आहे त्यास शरीरशास्त्रात ऊर्ध्व बाजू (वरील बाजू) म्हणण्याची पद्धत आहे. ऊर्ध्व बाजूस चेतासंस्था, पृष्ठरज्जू, ग्रसनी कल्ले (घशात उघडणारे कल्ले) व पश्चगुद पुच्छ (पुच्छ पर) म्हणजे शेपूट गुदद्वारानंतर असते. सर्व रज्जुमान संघातील सजीवांची चेतासंस्था नलिकेप्रमाणे असते. चेतानलिकेमध्ये मेरुद्रव असतो. चेतासंस्थेच्या लगत परंतु, खालील बाजूस कूर्चेने बनलेला पृष्ठरज्जू चेतासंस्थेस आधार देतो. ग्रसनीमध्ये उघडणारे कल्ले, धड आणि शेपटी हे अँफिऑक्ससच्या शरीराचे मुख्य भाग असून डोके स्पष्ट नसते. शरीराचा आकार दोन्ही बाजूंनी चपटा असतो. तोंड खालील बाजूस उघडते. तोंडाभोवती दृढ रोमक (Cilia) असतात. पुच्छ पराच्या बुडाशी डाव्या बाजूला गुदद्वार असते.
शरीराचे खंडीकरण झालेले असून स्नायूंचे खंडविभाग अथवा आदिस्नायुखंड देहभित्तीवर स्पष्ट दिसतात. शरीराच्या वरच्या भागात पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत पृष्ठरज्जू असतो. पृष्ठरज्जूच्या ऊर्ध्व बाजूस नलीकारूप मज्जारज्जू असतो. मज्जारज्जूचा अग्रभाग थोडासा विस्तृत झालेला असतो. मेंदूची ही अगदी प्राथमिक अवस्था आहे. मज्जारज्जूमध्ये संवेदी (मेंदूला संदेश पोहोचविणाऱ्या) आणि प्रेरक (मेंदूपासून संदेश नेणाऱ्या) चेतापेशी व संपर्क स्थाने असतात. श्वसन तसेच रक्त-परिवहनाचा मार्ग माशांप्रमाणे असतो. अॅंफिऑक्ससला हृदय नसते परंतु, रक्तवाहिन्या आकुंचनशील असतात.
श्वसनासाठी व अन्न ग्रहणासाठी अँफिऑक्सच्या पुढील भागातून ग्रसनीच्या दोन्ही बाजूस असलेल्या कल्ल्यावरील रोमकांच्या हालचालीमुळे पाणी ग्रसनीत घेतले जाते. ग्रसनीभोवती असलेल्या पोकळीस अलिंद गुहा म्हणतात. अलिंद गुहेत आलेले पाणी अलिंद छिद्रातून बाहेर पडते. तसेच जननग्रंथीत तयार होणारी पक्व युग्मके देखील आलिंद गुहेतून बाहेर पडतात. शुक्राणू व अंडाणू यांचा संयोग (निषेचन) पाण्यात होतो. अॅंफिऑक्ससच्या विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या सुरूवातीस असतो.
१८६० च्या दशकात अर्न्स्ट हेकेल या जर्मन वैज्ञानिकांनी ‘अॅंफिऑक्सस हा सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज असावा’, असा विचार मांडला. अॅंफिऑक्ससची सोपी, कमी गुंतागुंतीची शरीररचना, त्या शरीररचनेचे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीररचनेशी असलेले साधर्म्य तसेच विशिष्ट भ्रूणविकास (Embryology) पद्धती यांमुळे त्याला पृष्ठवंशीय प्राण्यांच्या पूर्वजांचा सर्वांत जवळचा नातेवाईक मानले गेले.
अलिकडच्या काळात अॅंफिऑक्ससच्य भ्रूणविकासाचा रेणवीय आनुवंश विज्ञानाच्या (Molecular Genetics) अंगाने अभ्यास झाला आहे. त्यातून पृष्ठवंशीय प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली असावी या बद्दलचे संकेत मिळाले आहेत. प्रत्यक्षात अँफिऑक्ससला डोळे, दोन अवयवांच्या जोड्या नाहीत. परंतु, जीनोम विश्लेषणातून त्यामध्ये डोळे, हात व पाय यांच्या जनुकांच्या जोड्या तसेच डोक्यापासून शेपटापर्यंत क्रमाने येणारे खंड यांच्याशी सबंधित जनुके (Hox genes) असल्याचे आढळून आले आहे. बहुपेशीय प्राण्यांच्या सर्व भ्रूणावस्थेत शरीराचा पुढील भाग कोणत्या खंडापासून होणार व मागील भाग कोणत्या खंडापासून होणार हे निश्चित असते. यास शरीराची ध्रुवता (Polarity) म्हणतात. थोडक्यात शरीराचा नकाशा जनुके ठरवतात. त्यामुळे अँफिऑक्ससला प्रातिनिधिक सजीवाचे (Model organism) स्थान मिळाले आहे. अँफिऑक्ससच्या जीनोमचे पूर्ण क्रमनिर्धारण झालेले नाही; परंतु, त्याच्या पेशीमध्ये एकोणीस गुणसूत्रे असल्याचे आढळले आहे.
पहा : चेतासंस्था, प्रातिनिधिक सजीव.
संदर्भ :
- https://www.britannica.com/animal/amphioxus
- https://en.wikipedia.org/wiki/Lancelet
समीक्षक : मोहन मद्वाण्णा