भारतातील कलावंतांची एक सर्वांत जुनी संस्था. भारतभर ती ‘इप्टा’ या नावाने ओळखली जाते. स्वातंत्र्य लढ्याच्या वाटचालीबरोबरच दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमिवर समाजात घडत असलेल्या वैचारिक मंथनाचे संदर्भ या संघटनेला आहे. प्रचंड घडामोडींच्या त्या काळात या सांस्कृतिक चळवळीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रचार भारतीय जनतेत केला. कलेच्या माध्यमातून भारतीय जनतेचे सांस्कृतिक प्रबोधन करणे, हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते.
इप्टाची स्थापना २५ मे १९४३ रोजी मुंबई येथील मारवाडी स्कूलमध्ये भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रागतिक चित्रपट, नाट्य व संगीत कलाकारांच्या समूहाने केली. त्या काळात अनेक स्वातंत्र्य लढे कार्यरत होते. उदा., ‘भारत छोडो’ चळवळ. स्वातंत्र्य लढ्यात कलावंतांनी योगदान देण्याच्या उद्देशाने ही संस्था निर्माण करण्यात आली. तत्पूर्वी इ. स. १९३६ मध्ये लखनऊ येथे ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोशिएशन’, इ. स. १९४० मध्ये कोलकाता येथे ‘युथ कल्चरल इंस्टिट्यूट’, इ. स. १९४१ मध्ये बेंगलुरू येथे अनिल डी’सिल्वा यांनी ‘पीपल्स थिएटर’ स्थापन केले. या संस्थांची पार्श्वभूमी इप्टाच्या स्थापनेमागे होती. इप्टाचे कलाकार वैचारिक दृष्ट्या डाव्या चळवळीशी संबंधित होते.
पृथ्वीराज कपूर, बिजन भट्टाचार्य, होमी भाभा, ऋत्विक घटक, उत्पल दत्त, ख्वाजा अहमद अब्बास, सलील चौधरी, पंडित रविशंकर, शाहीर अण्णाभाऊ साठे हे या सांस्कृतिक चळवळीतील काही आरंभिक सदस्य होते. पुढील वाटचालीत बलराज साहनी आणि इतर बरेच कलाकार इप्टाशी जोडले गेले. दुसर्या महायुद्धाच्या काळात बंगाल येथे पडलेल्या दुष्काळात हजारो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले होते. अशा पार्श्वभूमीवर संवेदनशील कलावंत आणि लेखकांचे अखिल भारतीय पीपल्स थिएटर अधिवेशन मुंबईला संपन्न झाले. कला, नाट्य, गीत, संगीताच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याचे या अधिवेशनात ठराव झाले. जनतेची कला निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष जनतेत जाऊन तिला सोबत घेऊन नवसृजन करावे, असा या कलाकारांचा निश्चय होता. भारतीय जनतेला वैचारिक दृष्ट्या जागरूक करणे आणि त्यांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे असे या संघटनेचे उद्दिष्ट ठरले. या अधिवेशनानंतर भारतभर विविध ठिकाणी या संघटनेच्या शाखा सुरू झाल्या. अशा प्रकारे एक प्रभावी सांस्कृतिक चळवळ निर्माण झाली. तिचा प्रभाव चित्रपट, नाट्य, संगीत इत्यादी सर्व विभागांवर पडला.
हिंदी भाषिक पट्ट्यात ही सांस्कृतिक चळवळ ‘भारतीय जन नाट्य संघ’; आसाम व पश्चिम बंगालमध्ये ‘भारतीय गण नाट्य संघ’ (गण संस्कृती संघ) आणि आंध्र प्रदेशात ‘प्रजा नाट्य मंडली’ या नावांनी ओळखली जाते. ‘पीपल्स थिएटर स्टार्स दी पीपल’ म्हणजे ‘जननाट्याची नायक स्वतः जनता आहे’, हे इप्टाचे ब्रीद वाक्य आहे. इप्टाच्या बोधचिन्हात संदेशवहनाचे व संवादाचे सर्वांत आदीम साधन नगारा हे मानवी समाजाचे प्रतीक एक व्यक्ती वाजवित असल्याचे दाखविण्यात आले आहे. हे बोधचिन्ह सुप्रसिद्ध बंगाली चित्रकार चित्तो प्रसाद यांनी तयार केले होते.
इप्टाने गीत-संगीत-नाटकांच्या माध्यमांतून भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल जनजागृती केली. तसेच भांडवलशाहीत होणारे कामगारांचे शोषण व जमीनदारशाहीमुळे होणारे शेतकरी व शेतमजुरांचे शोषण या मुद्यांना त्यांच्या कलाकृतींचे विषय बनविले. भारतीय लोककला व अभिजात कला यांच्या विविध रूपांचा या पथकाने सुयोग्य मेळ घातला. त्यामुळे लोककला, समूहगान व जननाट्याची समृद्ध परंपरा निर्माण झाली. आपल्या देशातील संपन्न सांस्कृतिक वारश्याचा मेळ या पथकाने त्या काळातील जनजीवनाशी, ज्वलंत सामाजिक प्रश्नांशी व लोकांच्या इच्छा आकांक्षांशी घातला. पथकासाठी ‘पीपल्स थिएटर’ हे नाव प्रख्यात शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांनी सूचविले होते. रोमन्स रोलँड यांच्या पीपल्स थिएटरच्या संकल्पनेवर आधारित पुस्तकातून त्यांना ही प्रेरणा मिळाली होती.
इसवी सन १९४२ मध्ये बंगालमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यात हजारोंच्या संख्येने माणसे मृत्यूमुखी पडली. त्यामुळे लेखक व कलावंत खूप व्यथित झाले. या संकटामुळे कलाकारांना नवीन प्रेरणा मिळाली. त्यांनी पीडितांना मदत करण्यासाठी पथक उभारले. या पथकाने भारतात सगळीकडे फिरून ‘भुखा है बंगाल’ या संगीत नाटिकेचे प्रयोग केले. याच काळात अण्णाभाऊ साठे यांनी ‘बंगालची हाक’ हे लोकनाट्य लिहून सादर केले. या लोकनाट्याचे पुढे ‘बंगाल की पुकार’ या नावाने हिंदीत, तसेच बंगाली भाषेतसुद्धा रूपांतर झाले. बंगालच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पथकाकडून प्रेरणा घेऊन पुढे अनेक पथके निर्माण झाली. आग्रा येथे एक मोठे सांस्कृतिक पथक उभे राहिले. देशभर भागाभागात अनेक पथके काम करू लागली. तेव्हा त्यांना एका सूत्रात आणून राष्ट्रीय पातळीवर संघटित करण्याची कल्पना पुढे आली. वैचारिक दृष्ट्या ही सांस्कृतिक पथके मार्क्सवादी विचारांशी निगडित होती. या पथकांना एकत्र आणण्यात व दिशा देण्यात कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पी. सी. जोशी यांनी मूलभूत भूमिका निभावली. प्रगतीशील लेखक संघाचे (प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोशिएशन) सरचिटणीस सज्जाद जहीर यांनीदेखील मोलाचे योगदान दिले. अशा एकत्रित प्रयत्नांतून इप्टाचा जन्म झाला.
मुंबई येथील स्थापना अधिवेशनात सामाजिक बांधिलकी मानणारे देशभरातील सृजनशील कलाकार उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात हिरेन मुखर्जी यांनी देशभरातील लेखक, कलावंतांना आवाहन केले की, ‘लेखक आणि कलाकार या! कलाकार आणि नाटककार या! शारीरिक आणि बौद्धिक श्रम करणारे सर्वजण या! स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायावर आधारित समाज घडविण्यासाठी स्वतःला वाहून घ्या!’ पंडित जवाहर लाल नेहरूंनी या संमेलनासाठी शुभेच्छा संदेश पाठविला होता. नंतरच्या काळात झालेल्या इप्टाच्या संमेलनात श्रीमती सरोजिनी नायडू, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि इतर नेत्यांनीही शुभेच्छा संदेश पाठविले होते.
इप्टाच्या स्थापनेनंतर कलकत्ता, अहमदाबाद, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी अधिवेशने झालीत. अल्पकाळातच या सांस्कृतिक संघटनेचा देश पातळीवर विस्तार झाला. या काळात मनोरंजन भट्टाचार्य, निरंजन सेन, डॉ. राजाराव, राजेंद्र रघुवंशी, एम. नागभूषणम, बलराज साहनी, बिमल रॉय, तेरासिंग चन्न, अमृतलाल नागर, के. सुब्रमण्यम, शीला भाटिया, दिना पाठक, सुरिंदर कौर, अब्दुल मलिक, सलील चौधरी, हेमंग बिस्वास, शाहीर अमर शेख, शाहीर द. ना. गव्हाणकर असे अनेक पुरोगामी विचारवंत, लेखक व कलावंत या संघटनेशी जोडले गेले होते.
इप्टाच्या सांस्कृतिक चळवळीने तत्कालीन समाज वास्तव अधोरेखित केले. त्यांनी पारंपरिक व आधुनिक कलाप्रकार यांचा संगम घडविला. या चळवळीने लोकांच्या सामाजिक जाणिवांचा विकास केला. ‘जीवनासाठी कला’ या ध्येयवाक्यातून त्या कलाकारांनी कला व सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत एक नवा दृष्टिकोण दिला. त्यांनी कला, कलाकार आणि जनता यांच्यामधील नात्याची नवी व्याख्या मांडली. इप्टाने भारतीय संस्कृतीमधील सकस मूल्ये आत्मसात केले, जागतिक पातळीवरील मानवी समाजाचा प्रागतिक वारसा जोपासला आणि अत्यंत कुशलतेने व सृजनशीलतेने नव्या कलाकृती निर्माण करून सांस्कृतिक चळवळीला समृद्ध केले.
इप्टाने भारतात समूहगानाची पद्धत सुरू केली. याच क्रमात पंडित रवी शंकर यांनी इकबाल यांच्या ‘सारे जहां से अच्छा’ या गीताला संगीतबद्ध केले. बिनोय रॉय, सलील चौधरी, हेमांग विश्वास, प्रेम धवन, कानू घोष, नरेंद्र शर्मा, साहिर लुधियानवी, कानू रॉय, शंकर शैलेंद्र, मखदूम मुहिउद्दीन, शील, वल्लथोल, ज्योतिर्मय मोइत्रा, ज्योती प्रसाद अग्रवाल, भूपेन हजारिका, अनिल बिस्वास इत्यादींनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी लिहिली. ती भारतभर गायली जाऊ लागली. जनसंगीत निर्माण करण्यात अशा अनेक कलावंतांनी भरीव कामगिरी केली. प्रेम धवन यांनी ‘हम होंगे कामयाब’ हे सुप्रसिद्ध हिंदी गीत लिहिले. त्याला कानू घोष यांनी संगीतबद्ध केले होते. हे गाणे देशभर जनतेच्या ओठी चढले आणि सगळीकडे गायले जाऊ लागले. केंद्रीय पथकाने ‘भारत की आत्मा’ आणि ‘अमर भारत’ या संगीत नाटिकांद्वारे सांस्कृतिक चळवळीला नव्या उंचीवर नेले. ज्योतिर्मय मोईत्रा यांनी ‘नवजीवनेर गान’ या बंगाली संगीतनाटकातून, डॉ. राजाराव यांनी आंध्र प्रदेशच्या बुर्रा कथा, हरी कथा आणि वेथी नाटक या पारंपरिक लोककलाप्रकारातून समकालीन प्रश्न मांडले. मलबारच्या कोळी नृत्य आणि उत्तर भारतातील लोकनृत्याच्या माध्यमातून जनकलेचे नवे आविष्कार पाहायला मिळाले. याच काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे, द. ना. गव्हाणकर यांची मराठी शाहिरी लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून जनतेला प्रेरणा देऊ लागली. मगई ओझा यांची आसामी लोकगीते या सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनले.
इप्टाने भारतीय नाट्यकलेला नवी दिशा दिली. जनेतच्या वेदना, अश्रु, स्वप्ने आणि आकांक्षांना अभिव्यक्त करण्यासाठी पारंपरिक साचे मोडून त्यांनी नवी शैली विकसित केली. डॉ. रशीद जहां, ख्वाजा अहमद अब्बास, अली सरदार जाफरी, टी. सरमलकर, बलवंत गार्गी, जसवंत ठक्कर, मामा वरेरकर, आचार्य अत्रे इत्यादी लेखक आणि नाटककारांनी वास्तववादी आशय मांडणार्या नाट्यचळवळीचा प्रारंभ केला. पुढे बलराज साहनी, शंभू मित्र, हबीब तन्वीर, भीष्म साहनी, दिना पाठक, राजेंद्र रघुवंशी, आर. एम. सिंग, उत्पल दत्त, ए. के. हंगल, रामेश्वरसिंग कश्यप, शीला भाटिया यांसारख्या दिग्दर्शक आणि कलाकारांनी त्यात मौलिक कामगिरी बजावली.
इप्टाने इ. स. १९४६ मध्ये धरती के लाल आणि नीचा नगर या चित्रपटांची निर्मिती केली. नीचा नगर या चित्रपटाला त्याच वर्षी फ्रांसच्या कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे या चित्रपटात सिनेकलाकारांसह अनेक शेतकरी, कामगार व विद्यार्थ्यांनी काम केले होते. ऋत्विक घटक, ख्वाजा अहमद अब्बास, अनिल विश्वास, सलील चौधरी, चेतन आनंद, ए. के. हंगल अशा इप्टाच्या अनेक कलाकारांनी चित्रपट क्षेत्रावर स्वतःची वेगळी छाप पाडली. सिनेमाला सामाजिक जाणिवांशी जोडण्यात व त्याद्वारे समाजवास्तव मांडण्याचे ऐतिहासिक कार्य इप्टाच्या कलाकारांनी पार पाडले. या लोकसांस्कृतिक चळवळीने प्रदीर्घ प्रवास केलेला असून ती आजही भारताच्या विविध भागांत कार्यरत आहे.
इप्टाच्या सुवर्णमहोत्सवाच्या (१९९४) निमित्ताने भारत सरकारने इप्टाचे बोधचिन्ह असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले होते.
संदर्भ :
- पाटकर, रमेशचंद्र, इप्टा सांस्कृतिक चळवळ, मुंबई, २०११.
- Dennis Kennedy and Rustom Bharucha, eds., The Oxford Encyclopedia of Theatre and Performance, Vol. 1, U. K, 2003.
- Ghosh Arjun, A History of the Jana Natya Manch : Plays for the People, India, 2012.
- Sumangala Damodaran, The Radical Impulse – Music in the Tradition of the Indian People`s Theatre Association, New Delhi, 2017.
समीक्षक : वैशाली दिवाकर