फकीरुल्ला कृत ‘रागदर्पण’ या संगीतविषयक ग्रंथाचा विचार सुटेपणाने न करता ‘मानकुतुहल’ या ग्रंथासह एकत्रितपणे त्याचा परामर्श घेणे उचित ठरते, कारण ‘रागदर्पण’ हा ग्रंथ ‘मानकुतूहल’ ह्या ग्रंथाचा, काहीशी भर घालून केलेला, फारसी अनुवाद आहे.

ग्वाल्हेरच्या तँवर अथवा तोमर वंशाचा राजा मानसिंह (राज्यकाल १४८६ ते १५१९) हा स्थापत्य-चित्र-संगीत अशा कलांचा आश्रयदाता, स्वत: संगीतकार, रचनाकार होता. मानमंदिर, गुजरीमहाल ह्या वास्तू त्याच्या स्थापत्यप्रेमाचे नमुने आहेत, तर ध्रुपद ह्या संगीतप्रकाराच्या प्रतिष्ठापनेचा मान त्यास दिला जातो. मानसिंहाने दिलेल्या उदार आश्रयामुळेच ही गायनशैली सिद्ध झाली, विकसित झाली असे मानले जाते. मानसिंहाच्या प्रोत्साहनाने ध्रुपद शैलीचा प्रवास संस्कृत भाषेतील गीतगायनाकडून ब्रजभाषेतील पदगायनाकडे झाला, तसेच ग्वाल्हेर हे संगीतकारांचे मोठे केंद्र बनले. स्वत: संगीतकार असलेल्या मानसिंहाने गुजर वंशीय राणी मृगनयनी हिच्या प्रीतीखातर गुजरी, बहुलगुजरी, मालगुजरी, मंगलगुजरी हे चार राग निर्माण केले असेही मानले जाते.

राजा मानसिंहाने १५व्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन रागसंगीताचे भरतमतानुसार विवेचन मांडणारा ग्रंथ त्याच्या दरबारातील विद्वत्परीषदेसह चर्चा-विमर्श करून ‘मानकुतुहूल’ हा संस्कृत वा ब्रजभाषेतील संगीतग्रंथ सिद्ध करवला. मूळ ग्रंथ आज उपलब्ध नाही, त्यामुळे त्याच्या स्वरूपाविषयी स्पष्टता नसली तरी ह्या ग्रंथाच्या ‘रागदर्पण’ ह्या फारसी भाषांतराद्वारे त्याची काहीशी कल्पना करता येते.

शाहजहाँ व औरंगजेब या मुघल शासकांच्या कार्यकालात फकीरुल्ला फकीर सैफ खाँ हा काश्मीरचा सुभेदार म्हणून काम करत होता. हिजरी सन १०७३, म्हणजेच इसवी सन १६७१ मध्ये त्याला मूळ ‘मानकुतूहल’ हा ग्रंथ प्राप्त झाला व सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत त्याने ह्या ग्रंथाचा फारसी भाषेत अनुवाद केला. अर्थात अनुवादाखेरीज त्याने तत्कालीन कलावंतांची माहिती, स्वत:विषयी काही कथन आणि अन्य भागही समाविष्ट केल्याने ‘मानकुतूहल’मधील मजकुराबरोबरच फकीरुल्लाची स्वत:ची अशी बरीच भरही त्यात आहे. शिवाय फकीरुल्लाची भूमिका ही पूर्वग्रहदूषित कट्टरवादाची असल्याने अस्सल ऐवज कोणता आणि भाकड भाग कोणता याचा निर्णय करणे आज कठीण आहे. मात्र तरीही मध्ययुगीन संगीताचा महत्त्वाचा ऐतिहासिक साधनग्रंथ म्हणून ‘रागदर्पण’चे महत्त्व आहे.

फकीरुल्लाने ‘रागदर्पण’मध्ये प्रथम अल्ला आणि पैगंबर ह्यांना नमन करून प्रस्ताव केला असून एकूण दहा प्रकरणांतील वर्ण्यविषयांची अशी सूची दिली आहे :- पहिले प्रकरण – ग्रंथाच्या रचनेविषयी मनोगत, दुसरे प्रकरण – रागविवेचन, तिसरे प्रकरण – ऋतु-राग संबंध, ग्राम व गीताक्षर विषयक वर्णन, चौथे प्रकरण – स्वर, तसेच गीतरचना प्रकार वर्णन, पांचवे प्रकरण – वाद्यवर्णन, नायक-नायिका भेद, सहावे प्रकरण – गायकाचे दोष, सातवे प्रकरण – मानवी कंठस्वराचे प्रकार व वर्णन, आठवे प्रकरण – गायनाचार्य वर्णन, नववे प्रकरण – वाद्यवृंद वर्णन, दहावे प्रकरण – तत्कालीन गायक-वादकांचे वर्णन.

पहिले प्रकरण – फकीरुल्ला नमूद करतो की ग्वाल्हेरचा राजा मानसिंह संगीताचा मोठा आश्रयदाता व स्वत: संगीतकार होता. त्याच्या दरबारात नायक बक्शू, नायक पाण्डवीय, नायक कर्ण, महमूद लोहंग असे उत्तम गायक होते. इतके उत्तम कलाकार एकाच स्थानी असलेले पाहून मानसिंहाने त्यांच्याकडून रागचर्चा करवली व ‘मानकुतूहल’ हा अत्यंत विश्वसनीय ग्रंथ सिद्ध केला. ह्या एका ग्रंथातच भरत मत, संगीत रत्नाकर, संगीत दर्पण अशा विविध ग्रंथांतील संगीताचे ज्ञान एकत्रितपणे मिळाल्याने विद्यार्थ्यांस एवढे सगळे ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही; म्हणूनच ह्या ग्रंथाचा फारसी अनुवाद मी करत आहे.

दुसरे प्रकरण – रागांचे शुद्ध, संकीर्ण, सालंग, संपूर्ण, षाडव व औडव असे सहा प्रकार असून भैरव, मालकोश, हिंडोल, दीपक, श्री व मेघ हे मूळ, शुद्धराग आहेत. ह्या शुद्धरागांच्या रागिणी व पुत्रराग हे संकीर्ण राग होत. प्रत्येक शुद्धरागाच्या साधारणत: पाच रागिणी व आठ पुत्रराग असतात, मात्र ही संख्या सर्वत्र एकसारखी नाही. सालंग राग म्हणजे वर्तमानकाळात निर्माण केले गेलेले, अधुनाप्रसिद्ध व नवनिर्मित राग आहेत. संपूर्ण, षाडव व औडव हे क्रमाने ७, ६, ५ स्वर असलेले राग आहेत. मानकुतूहल ग्रंथात वर्णित भारतीय परंपरेतील सुमारे २०० रागांव्यतिरिक्त राजा मानसिंह (५ राग), नायक बक्शू (५ राग), तानसेन (४ राग) यांनी निर्माण केलेले काही राग, पर्शियन संगीत-संगमातून अमीर खुस्रो (१५ राग), शेख बहाउद्दीन जकारिया (१ राग), सुलतान हुसेन शर्की (२३ राग) ह्यांनी निर्माण केलेल्या, आणि स्वत: फकीरुल्लाने निर्माण केलेल्या ५ रागांसह सुमारे २५ अधुनाप्रसिध्द राग अशा २८०च्या आसपास रागांचा उल्लेख ‘रागदर्पण’मध्ये आहे.

तिसरे प्रकरण – ह्यात ऋतु आणि राग ह्यांच्या संबंधाचे विवेचन असून वसंत ऋतु – हिंडोल राग, ग्रीष्म – दीपक, वर्षा – मेघ, शरद – श्री, हेमंत – मालकोश, शिशिर – भैरव असे ऋतु-राग संकेत नमूद केले आहेत.

चौथे प्रकरण – ह्यात प्रथम शरीरातील अवयव आणि पशु-पक्ष्यांशी स्वरोत्पत्तीचा संबंध वर्णिला आहे. तसेच गीतरचनांची माहिती दिली आहे. फकीरुल्ला नमूद करतो की प्रत्येक प्रांतात तेथील भाषेत विशेष गीतप्रकार असतात. ‘मार्गी गीतांत देवतावर्णन असते. ही गीते उत्तर भारतापेक्षा दक्षिण प्रांतात अधिक गायली जातात कारण तेथे देशी राग व देशी गीते प्रचलित नाहीत, तर मार्गी राग प्रचलित आहेत’ ह्या विधानावरून त्या काळी मार्गी = कर्नाटक पद्धती आणि देशी = हिंदुस्थानी पद्धती असा अर्थ प्रचलित झाला होता असे लक्षात येते. फकीरुल्ला असे वर्णन करतो – ‘मार्गी गीते संस्कृत भाषेत असत. मात्र मानसिंहाने चार चरण असलेली ध्रुपद गीते ब्रजभाषेत गायला आरंभ केला. मानसिंहाच्या दरबारात नायक मन्नू, नायक बक्शू, नायक कर्ण, महमूद ह्या गायकांच्या प्रभावी गाण्यामुळे ध्रुपद प्रतिष्ठित झाले, व मार्गी गीते त्यापुढे फिकी पडू लागली. ह्यामुळे संस्कृतातील मार्गी गीतांचे गायन मागे पडले. भाषेखेरीज अजून एक कारण असे की मार्गी गीते ही केवळ शुद्ध मार्गी रागांतच असत, मात्र ध्रुपदात देशी रागही होते.” ध्रुपदाखेरीज इतरही गीतप्रकारांचा उल्लेख आहे –  जौनपुरचा सुलतान हुसेन शर्की निर्मित व झूमरा तालात गायला जाणारा चुटकुला (जाणकारांच्या मते ही चुटकुला गीते आजच्या ख्यालाचे पूर्वरूप होत), कौल, ख्याल (आजच्या ख्यालाची पूर्वावस्था), तराना, सुहिला (विवाहगीते), विष्णुपद (पुष्टीमार्गी हवेली परंपरेतील ध्रुपदे), साधरा (सादरा), तसेच कल्ली, लजारी, कजली, कडक्के, जहंद हे लोकगीत प्रकार. अठराव्या शतकातील नियामत खाँ ‘सदारंग’ हा ख्यालाचा जनक मानला जातो, मात्र त्याही पूर्वीच्या काळातील ह्या ग्रंथातील उल्लेखामुळे ख्याल आधीही अस्तित्त्वात होता हे सिद्ध होते.

पाचवे प्रकरण – ह्यात वाद्य, नायक-नायिका व सखी भेद यांचे वर्णन आहे. भारतीय संगीतशास्त्रात प्रचलित असलेल्या तंतु-सुषिर-घन-अवनद्ध ह्या वाद्यवर्गांचे वर्णन इथे निराळे केले आहे – तारेची वाद्ये (तंतुवाद्ये), चामड्याने मढवलेली वाद्ये (अवनद्ध), धातुवर आघात करून वाजणारी (घन वाद्ये) व तोंडाने वाजणारी (सुषिर) वाद्ये असे वर्णन आहे. नंतर उत्तम, मध्यम, अधम नायक, तसेच स्वकीया, परकीया नायिका; अष्टनायिका यांचे वर्णन आहे.

सहावे प्रकरण – संगीत रत्नाकरादि ग्रंथांत गायकाचे गुणदोष वर्णन आहे, त्याच प्रकारे ह्या ग्रंथातील हे प्रकरण गायकाच्या २५ दोषांचे वर्णन करते.

सातवे प्रकरण – संगीत रत्नाकरात मानवी कंठाचे गुणधर्मानुसार प्रकार वर्णिले आहेत, त्यानुसार हा भाग आहे. आवाजाचे छागल, नाहत, योनिक, श्रुती असे चार प्रकार व त्यांचे उपप्रकार नमूद केले आहेत. श्रुतींचे मंद, मध्य व तीव्र असे तीन प्रकार सांगितले आहेत. तसेच कंठाचे १५ गुण व ८ दोष दिले आहेत.

आठवे प्रकरण – संगीत रत्नाकरातील प्रकीर्णाध्यायाशी याचे साम्य आहे. प्रथम गीतरचनेतील मातु व धातु, वाणीकारक (वाग्गेयकार)  अथवा गायनाचार्य (रचनाकार) याची लक्षणे व गुण नमूद केले आहेत. मग गायकांचे कंकार, सुराद व गंधर्व असे प्रकार सांगितले आहेत. शिक्षाकार, अनुकार, रसिक, रंजक व भावक असे गायकांचे वर्गीकरण नमूद केले आहे. एकल, जम्मल (यमल) व वृंद असेही गायकांचे प्रस्तुतीच्या अनुसार गट दिले आहेत.

नववे प्रकरण – यांत वृंद व त्याचे लाभ यांचे वर्णन आहे. वृंद म्हणजे गायक-वादकांचा समूह. त्याचे उत्तम, मध्यम व अधम असे तीन प्रकार व सहा लाभ दिले आहेत. हे नाट्यशास्त्रानुसार आहेत. ह्यानंतर फकीरुल्ला म्हणतो – ‘रागसागर’ ह्या अकबराच्या काळात लिहिल्या गेलेल्या ग्रंथात ‘मानकुतूहल’पेक्षा वेगळे रागवर्णन आहे, याचे कारण असे की एक तर दोन्ही ग्रंथांच्या काळात अंतर आहे, व दुसरे असे की ‘मानकुतूहल’ हा संगीतातील अधिकारी व्यक्तींनी लिहिलेला ग्रंथ आहे, तर अकबराच्या काळात ‘अताई’ (उत्तम प्रस्तुती करणारे, पण शास्त्र न जाणणारे) कलाकार अधिक झाल्याने ‘रागसागर’ मध्ये दिलेले राग शास्त्रशुद्ध नाहीत. येथे अताई गायक म्हणून अकबराच्या काळातील तानसेन, सुबहान खाँ फतेहपुरी, चांद खाँ व सूरज खाँ, मियां चंद, तानतरंग खाँ, बिलास खाँ, रामदास, मदन खाँ, मुडिया धाडी, मुल्ला इश्हाक खाँ, खिज्र खाँ, नवाब खाँ, इ. कलावंतांचा, तसेच शास्त्रसिद्धांत ज्ञात असलेले म्हणून नायक भन्नू, बक्शु, चरजू, भगवान, बाज बहादुर, नायक सुरतसेन, लाला व देवीप्रसाद हे बंधू, अकिल खाँ यांचा उल्लेख केला आहे. ह्याद्वारे तत्कालीन कलावंतांचे नेमके स्थान काय होते यावर प्रकाश पडतो.

नववे प्रकरण – यांत फकीरुल्लाने त्याच्या पूर्वीच्या व समकालीन कलाकारांचे वर्णन केले आहे. शेख बहाउद्दिन जकारिया, मियां डालू धाडी (ध्रुपदिया व सरोद वादक), समंदर खाँचा पुत्र असलेला व बिलास खाँचा शिष्य ध्रुपदिया लाल खाँ, त्याचा मुलगा खुशहाल खाँ, कविराय जगन्नाथ (यांचा उल्लेख ध्रुपदे रचणारा म्हणून केला आहे), ध्रुपदिया सुहेरसेन (तानसेनाच्या मुलीचा मुलगा),  मिश्री खाँ धाडी (बिलास खाँचा शिष्य व रचनाकार), हसन खाँ नौहार, किशनसेन (ध्रुपदिया व रचनाकार), बख्त खाँ (तानसेनाचा शिष्य), रंग खाँ (शाहजहानच्या दरबारातील उच्च श्रेणीचा गायक), सालमचंद्र डागर, तुलसीराम, धर्मदास, सुदर्शन, शेख कमाल, शेख सादुल्ला लाहोरी, मोहम्मद वारी, अब्दुल, मीर अमीर, खमीरसेन, सुहेलसेन, सबाद खाँ धाडी, वली धाडी, रहीमदाद धाडी, केशव धाडी, बूचा, वाजिद खाँ, सैयद तय्यब, सैयद नौहार हे गायक, तसेच मीर स्वाल, शेरा, कबीर हे कव्वाल; पुरुषनयन, वायजी दख्खनी, सुखीसेन, स्लासेह ख्वानी, हयाती ख्वानी, अल्लाहदाद धाडी, ‘रसबीन’ मोहम्मद, तम्बूरवादक शौकी, अबुल वफा, तसेच किरपा मृदंगराय, फिरोज खाँ धाडी, भगवान, ताहीर हे पखवाज वादक, इ. कलाकारांचे उल्लेख आहेत.

या नंतर ‘रागदर्पण’चा संगीताविषयक भाग संपला आहे, मात्र येथे फकीरुल्लाने स्वत:ची कारकीर्द, त्यास मिळालेली काश्मीरची सुभेदारी, इ. कथन केले आहे. नंतर तो म्हणतो – “हिजरी सन १०७६ (इसवी सन ) मधील हिवाळ्यात मी (काश्मीरमधून) बाहेर पडू शकलो नाही. त्यामुळे बादशहा औरंगजेब यास हा ग्रंथ मी अजूनही सादर केला नसल्याने यात आरंभी बादशहाचे गुणवर्णन मी केलेले नाही. काश्मिरातील काही गायकांकडून इराणी राग मला कळले, त्या आधारे हिंदुस्थानी राग आणि इराणी राग यांबद्दल लिहित आहे – गिजाल व षटराग, नौरोज व कल्याण, दरगाह व शुद्ध तोडी, नवाह व सारंग, रास्त व नाट, इश्शाक व पूरियाधनाश्री, सरपरदा व ठुमरी (येथे ठुमरीचा गीतप्रकार म्हणून नव्हे तर राग म्हणून उल्लेख आहे, हे विशेष), शहनाज व सिंधुरा इ. ११ इराणी व हिंदुस्थानी राग मिळतेजुळते आहेत.”

फारसी भाषा व संगीताच्या प्रख्यात विदुषी असलेल्या शाहब सरमादी ह्यांनी ‘तजुर्मा-ए-मानकुतूहल व रिसाला-ए-रागदर्पण’ ह्या नावाने सदर ग्रंथाचा सटीप अनुवाद १९९६ साली प्रसिद्ध केला आहे.

संदर्भ :

  • जयदेव सिंह, ठाकूर, इंडियन म्युझिक, कोलकाता, (१९९५).
  • द्विवेदी, हरिहरनिवासी, मानसिंह और मानकुतूहल, ग्वाल्हेर, (१९५३).
  • सरमादी, शाहब, तजुर्मा-ए-मानकुतूहल व रिसाला-ए-रागदर्पण, दिल्ली, (१९९६).

समीक्षक : सुधीर पोटे