आयुष ही वैद्यक क्षेत्रांत संशोधन करणारी भारत सरकारची संस्था आहे . आयुर्वेद,  सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या चार (योग आणि निसर्गोपचार सोडून) वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रांतील मूलभूत तत्त्वज्ञान जाणण्यासाठी तसेच त्यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी ही संस्था १९७८ मध्ये स्थापन झाली. याच संस्थेला आत्ता भारतीय वैद्यकीय आणि होमिओपॅथी प्रणाली (Indian System of Medicine and Homoeopathy – ISM&H) असे नाव पडले. त्यांना आयुर्वेद (A), योग (Y), निसर्गोपचार, युनानी (U), सिद्ध (S)  आणि होमियोपथी (H) विभाग म्हणजे आयुष (AYUSH) असे म्हणतात. स्वास्थ्य रक्षणासाठी असणारी आयुष प्रणालीच्या विकास आणि वाढीसाठी आयुष मंत्रालयाची स्थापना झाली.  आयुष ही संस्था आयुर्वेद, योग,निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, आणि होमिओपॅथी या सर्व शाखेतील शिक्षण आणि संशोधन यावर लक्ष केंद्रीत करत आहे. भारत सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राष्ट्रीय जनसंख्या नीती, राष्ट्रीय स्वास्थ्य नीती तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य धोरण मसुदा यांमध्ये आयुषतर्फे केल्या जाऊ शकणाऱ्या  संशोधन व विकासावर (R&D) भर दिला आहे.

आयुषची उद्दिष्टे भारतातील आयुर्वेद व इतर वैद्यकीय तसेच होमिओपॅथीसाठी असणाऱ्या  महाविद्यालयांची संख्या वाढवणे, या क्षेत्रातील संशोधन संस्था सर्व दृष्टीने बळकट करणे आणि विविध रोगांवर संशोधने योग्य वेळात करून घेणे, वैद्यकीय औषधांचे संवर्धन करण्यासाठी औषधी वृक्ष लागवडीच्या विविध योजना राबवणे आणि भारतीय वैद्यकातील औषधांच्या प्रमाणिकीकरणावर मार्गदर्शन करणे ही आयुष्याची मुख्य उद्दिष्टे आहेत.

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद (Central Council for Research in Ayurvedic Sciences; CCRAS), केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद (Central Council for Research in Homoeopathy; CCRH), केंद्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान परिषद (Central Council for Research in Unani Medicine; CCRUM), केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान परिषद (Central Council for Research in Yoga & Naturopathy; CCRYN) आणि केंद्रीय सिद्ध विज्ञान परिषद (Central Council for Research in Siddha; CCRS) या आयुषशी संबंधित महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत.

देशामध्ये सध्या प्राधान्याने होणाऱ्या आजारांवर आयुषमध्ये असणाऱ्या शाखोपनिहाय औषधांचे संशोधन करणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे, वैद्यकातील शाखोपनिहाय प्राचीन सिद्धांत व औषधे या पूर्वज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वापरून प्रचार आणि प्रसार करणे, आपापल्या शाखेतील निदान व चिकित्सा पद्धतीचा लोकांमध्ये संवर्धनात्मक प्रचार करणे, रोग प्रतिबंधात्मक उपचार पद्धती शोधणे, औषधांसाठी लागणारी नैसर्गिक साधने जपण्यासाठी व त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी लागणारे संशोधन करणे, विविध औषधांबद्दलची वैज्ञानिक माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे. ही सर्व शास्त्रे प्राचीन आहेत त्यामुळे पुराव्यावर आधारित प्रत्येक शास्त्रातील तत्त्वे आणि पद्धतींच्याद्वारे स्वास्थ्याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवून सुदृढ व निरोगी भारताची निर्मिती करणे, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद (CCRAS)  ही संस्था हे काम प्रामुख्याने करत आहे, त्या त्या शाखेतील औषधी कोशातील सूत्रांवर व इतर औषधांवर रुग्णोपयोगी संशोधन करणे, संपूर्ण देशभर औषधांसाठी लागणाऱ्या वनस्पतींचे सर्वेक्षण करणे, औषधांच्या प्रमाणिकीकरणाद्वारे विश्लेषण करण्यासाठी विशिष्ट पद्धती तयार करणे, ग्रामीण भागात विविध संशोधन उपक्रम राबवणे, पूर्वीच्या व नव्याने निर्माण झालेल्या संसर्गजन्य व साथीच्या रोगांवर त्या त्या क्षेत्रातील प्राचीन व नवीन औषधे निर्माण करून ती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्या त्या वैद्यकीय शाखेतील प्राचीन हस्तलिखिते, मासिके, पुस्तके, अहवाल, शिक्षण विषयक माहिती व इतर साहित्य यांचे पुनरुत्पादन करणे आणि आयुर्वेद क्षेत्रातील पशुवैद्यकीय आयुर्वेद आणि वृक्षायुर्वेद नावाच्या आयुर्वेदाच्या शाखांचे संवर्धन करणे तसेच त्यातील हस्तलिखितांचे पुनरुज्जीवन करणे ही त्यामागची उद्दिष्टे आहेत.

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद ( CCRAS )  ह्या परिषदेने स्वतः काही औषधांच्या विशिष्ट एकत्रीकरणावर संशोधन करून काही औषधी उत्पादने तयार केली आहेत. यात काही स्व-मालकीची औषधे आहेत. सध्याच्या जागतिकीकरणामुळे काही परदेशी कंपन्याही आयुर्वेदात संशोधन करण्याच्या दृष्टीने या परिषदेकडे येत आहेत.  त्यामुळे त्यांना संशोधनसाठी लागणारे तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक सहकार्य देण्याचे ह्या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

अंतर्गत अनुसंधान योजना, देशांतर्गत सहयोगी अनुसंधान योजना, आंतरदेशीय सहयोगी संशोधन योजना आणि औद्योगिक सहयोगी संशोधन योजना या चार पद्धतीने संस्थेद्वारे संशोधने  केली जातात.

केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद संस्थेने विविध औषधांवर संशोधन करून आयुष ८२, आयएमई-९ यांसारखी प्रमेह,  आयुष ६४ मलेरिया, आयुष एसी-४ गर्भनिरोधक, आयुष ५५ मेदोहर आणि इतर आजारांवर उपयोगी काही औषधेही बाजारात आणली आहेत.

आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांच्या ज्या संस्था विविध रोगांवर चिकित्सा व त्यांचा प्रतिबंध होण्यासाठी क्लिनिकल संशोधन करत आहेत त्यांना संशोधनासाठी १०० टक्के आर्थिक मदत दिली जाते. वरील प्रत्येक क्षेत्रातील विविध ग्रंथ, इतर मूलभूत माहिती व आधुनिक वैज्ञानिक संशोधनांवर आधारित आणि प्रमाणित असलेले साहित्य  विविध भाषांमध्ये अनुवादीत करण्यासाठी परिषद आर्थिक अनुदान देते. हे मूलभूत संशोधनाखाली येते. आयुष प्रणालीमधील संशोधांनाचा तसेच जागतिक स्तरावरील शैक्षणिक संशोधनांचा प्रसार करण्यासाठी आयुषचे संकेत स्थळ उपयोगी आहे.  आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या प्रत्येक शाखेच्या वैज्ञानिक क्षेत्रातील सर्व संशोधने, आयुषच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

संदर्भ :

समीक्षक – आशिष फडके