ताळ्ळपाक अन्नमाचार्य : (सु. १४०८–१५०३). प्रख्यात कीर्तनरचनाकार, गायक, संगीतकार व तेलुगू कवी. अन्नमाचार्यांना ‘गीतसाहित्य-पितामह’, ‘वाग्गेयकार’, ‘संकीर्तनाचार्य’ इत्यादी सार्थ बिरुदे लावली जातात. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील ताळ्ळपाक या गावी नारायण सूरी उर्फ कुमारनारायण आणि लक्षाम्बा यांच्या पोटी झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले. असे म्हणतात की, केवळ आठ वर्षांच्या कोवळ्या वयात भगवान वेंकटरमणा यांनी त्यांना स्वप्नात येऊन दिलेल्या आदेशाप्रमाणे ते थेट तिरुमला येथे रवाना झाले. त्याच काळात बाल अन्नमाचार्यांनी मोकाल्लामुडूपू येथे जवळपास १०० गानरचना रचल्या. त्यानंतर त्यांनी घनविष्णू यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव परंपरेत पदार्पण करून पारंपरिक पंचसंस्कारापासून साधना सुरू केली. संस्कृत व तेलुगू या भाषांचे ते प्रकांड पंडित होते. संगीतशास्त्राबद्दलचा त्यांचा अभ्यास सखोल होता. त्यांची प्रायः सर्व रचना भक्तिप्रधान अशी आहे.
असे म्हटले जाते की, अन्नमाचार्य हे तेलुगू भाषेत दररोज एक नवे कीर्तनपद रचून आणि गाऊन वेंकटेश्वराची वा बालाजीची आर्तस्वराने व अनन्यभावाने आळवणी करीत असत. अशी ३२,६०० कीर्तनपदे त्यांनी रचली; तथापि ती सर्व आत्ता उपलब्ध नाहीत. त्यांतील १३,००० कीर्तने ताम्रपत्रांच्या रूपात तिरुपती गावात एका उत्खननात सापडली असून ताम्रपत्रांवर कोरलेली ही कीर्तने आजही तिरुपतिक्षेत्री ‘संकीर्तन भांडारात’ (श्री वेंकटेश्वर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, तिरुपती) सुरक्षित आहेत. या गान रचना २६ खंडाच्या रूपात प्रकाशित केल्या गेल्या आहेत. यांपैकी बऱ्याच रचना अप्रचलित आणि अतिप्राचीन रागांमध्ये रचलेल्या असल्याने आधुनिक संगीतकारांनी त्यांच्या बऱ्याच गाण्यांसाठी लोकप्रिय व प्रचलित राग निवडून त्या गीतांना नवीन स्वरूप दिले. संगीतकलानिधी नेदुनूरी कृष्णमूर्ती यांनी अन्नमाचार्यांच्या गानरचना लोकप्रिय करण्याच्या हेतूने खूप परिश्रम घेतले आहेत. हंसध्वनी रागामध्ये रचलेली ‘वंदेहम् जगत वल्लभम्’ आणि यमुना कल्याणी (यमन कल्याण) रागामध्ये बांधलेली ‘भवयामी गोपालबालम्’ या त्यांच्या काही रचना वारंवार ऐकल्या जातात. त्यांच्या अनेक रचना वेंकटचला मुद्रेवर संगीतबद्ध केलेल्या आहेत.
संकीर्तनलक्षण हा त्यांचा संस्कृत ग्रंथ होय. याशिवाय द्विपद-रामायणमु, वेंकटाचल माहात्ममु, शृंगारमंजरी आणि सर्वेश्वर शतक हे त्यांचे इतर तेलुगू ग्रंथ होत. त्यांची तेलुगू कीर्तने म्हणजे उत्कृष्ट भक्तिगीतेच होत. कीर्तनात शब्द कमी महत्त्वाचे असतात. शब्द स्वरांत मिसळून जातात आणि स्वरच अर्थवाही बनतात. या कामी तालाचे साहाय्य होते. मुळात तेलुगूचे स्वरान्त शब्द गेय काव्यास अत्यंत पोषक आहेत. त्यात अन्नमाचार्यांची आर्त भावना आणि संगीताच्या राग, ताल, स्वर इ. अंगोपांगाचे सखोल ज्ञान यांची त्यांना जोड मिळाल्यामुळे, त्यांची कीर्तने अत्यंत लोकप्रिय झाली. कर्नाटक संगीतात त्यांना आद्य आणि बहुमोल स्थान प्राप्त झाले. त्यांची ४,००० कीर्तने वेदान्तपर आणि ८,००० कीर्तने सगुणभक्तिपर आहेत. भगवान वेंकटेश्वर आणि मंगम्मा या दांपत्यातील प्रेमभावावर त्यांनी अनेक भावपूर्ण कीर्तने लिहिलेली आहेत. त्यांतील शृंगारयुक्त शांत रसाचा परिपोष विलोभनीय आहे. विशुद्ध, सुबोध आणि शिष्टमान्य भाषेत मधुर, अर्थगंभीर व काव्यगुणाने युक्त कीर्तने लिहिणाऱ्यांत अन्नमाचार्यांचे स्थान अद्वितीय आहे. भाषा व काव्यगुणाच्या दृष्टीनेही त्यांची कीर्तने उत्कृष्ट आहेत.
पेनुकोंडाचे राज्यकर्ते सलुवा नरसिंहराय यांनी अन्नामाचार्यांना त्यांच्या दरबारी आमंत्रित केले होते; पण ते तेथे फार काळ थांबले नाहीत. अन्नमाचार्यांच्या दरबारी येण्याने राजे खूपच आनंदित झाले आणि त्यांनी अन्नमाचार्यांना स्वत:ची प्रशंसा करणारी गाणी रचण्यासाठी गळ घातली; परंतु, मनुष्याची स्तुतीपर रचना करणे अन्नमाचार्यांच्या तत्त्वात बसत नव्हते. त्यांच्या गुरुंनी आदेशपर ‘स्तुती ही फक्त परमात्म्याची करावी’ असे सांगितल्याने, त्यांनी राजांना तसे विनम्र निवेदन करून त्यांची असमर्थतता दर्शवली. त्यामुळे आपली अवज्ञा केली असे समजून राजे क्रुद्ध झाले आणि त्यांनी अन्नमाचार्यांची रवानगी तुरुंगात केली. काही कालानंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर अन्नमाचार्य आपल्या अध्यात्मिक स्वगृही म्हणजे तिरुमला येथे परतले आणि तेथे त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वेंकटेश्वराच्या स्तुतीपर गाणी रचली.
अन्नमाचार्यांनी तिमक्का आणि अक्कलम्मा यांच्याशी विवाह केला. त्यांनी संपूर्ण दक्षिण भारतात फिरून वैष्णवाची उपासना केली. अन्नमाचार्य आणि त्यांचे चिरंजीव पेड्डा तिरुमलाचार्य व नातू सिन्ना यांना ‘ताळ्ळपाकम् संगीतकार’ असे संबोधले जाते. त्यांनी तेलगूमध्ये पल्लवी आणि कारनाम (क्रिती स्वरूप) सह गान रचना निर्माण केल्या.
अन्नामचार्यांचा संप्रदाय ‘ताळ्ळपाक’ किंवा ‘ताळ्ळपाक्कम्’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे अनुकरण पुढे अनेकांनी केले. त्यांची पहिली पत्नी ताळ्ळपाक तिमक्का यांनीही सुभद्राकल्याण वा सुभद्रार्जुनीयमु नावाचे द्विपद छंदात एक काव्य लिहिले. त्यांच्या इतर वंशजांनीही भक्तिप्रधान गीतांची रचना केली आहे.
मराठी अनुवाद व समीक्षण : शुभेंद्र मोर्डेकर