इलिच, इव्हान (Illich, Ivan) : (४ सप्टेंबर १९२६ – २ डिसेंबर २००२). प्रसिद्ध ऑस्ट्रियन शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, सामाजिक समीक्षक आणि रोमन कॅथलिक धर्मगुरू. इलिच यांचा जन्म व्हिएन्ना येथे एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सेपहार्डिंग जेनिस, तर वडिलांचे नाव इव्हान पीटर इलिच होते. त्यांचे वडील इंजिनिअर होते. इलिच यांचे शिक्षण इ. स. १९३६ – इ. स. १९४१ या कालावधीत व्हिएन्ना येथील शाळेत झाले. त्यांची आई ज्यू वंशाची असल्याने त्यांना याच वर्षी शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले विद्यापीठीय शिक्षण फ्लोरेन्स विद्यापीठात पूर्ण केले. ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू (पाद्री) होण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी रोम विद्यापीठात इ. स. १९४३ – इ. स. १९४६ या कालावधीत धर्मगुरुसाठी आवश्यक असणारे धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला. त्यांनी ‘ऐतिहासिक ज्ञानाच्या स्वरूपाचा शोध’ या विषयाचा अभ्यास करून साल्झबर्ग विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी प्राप्त केली.

इलिच लहानपणापासूनच इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, लॅटीन, पोर्तुगीज, हिंदी, इंग्रजी इत्यादी आधुनिक भाषा अस्खलितपणे बोलत. तसेच ते शास्त्रीय भाषांमध्येही पारंगत होते. पीएच. डी. नंतर १९५१ मध्ये ते धर्मगुरू होण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील वॉशिंग्टन हाईट्स येथे गेले आणि तेथील पोर्तो रिकन या स्थानिक समुदायात सामील झाले. तेथे धर्मगुरू म्हणून ते १९५६ पर्यंत कार्य केले. त्यानंतर १९५६ – १९६० या काळात त्यांनी पॉन्स येथील कॅथलिक विद्यापीठात काम केले. त्यांनी संतती नियमनाच्या धोरणांना पाठिंबा दिल्यामुळे १९६० मध्ये पोप जॉन पॉल १३ या कॅथलिक पंथाच्या अत्युच्च्य धर्मगुरुंशी त्यांचे मतभेद झाले. परिणामतः त्यांनी १९६९ मध्ये आपल्या धर्मगुरुपदाचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी १९६१ मध्ये सेंटर फॉर इंटरकल्चरल डॉक्युमेंटेशन (सीआयडीओसी) स्थापन केली. उत्तर अमेरिकेतील मिशनरींसाठी या संशोधन केंद्रामध्ये भाषेचे शिक्षण दिले जात. त्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन फिट्सजेरल्ड केनेडी यांच्या मार्गदर्शनानुसार अनुयायांच्या प्रगतीसाठी अभ्यासक्रम विकसित करण्यात आले होते. त्यात आधुनिक विकासावर भर होता. मिशनरींनी आपले सांस्कृतिक मूल्य इतरांवर लादू नये, अशा पद्धतीचे शिक्षण त्यात होते. १९६० च्या उत्तरार्धात आणि सत्तरच्या सुरुवातीला सीआयडीओसी या संस्थेने शाळेबरोबरच संपूर्ण अमेरिकेतील उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींसाठी मुक्त विद्यापीठ म्हणून कार्य केले. १९७६ मध्ये इतर सदस्यांची संमती घेऊन त्यांनी सीआयडीओसी बंद केले. इलिच यांनी १९८० आणि त्यानंतर अमेरिका, मोरोक्को आणि जर्मनी यांठिकाणी प्रवास केला. या कालावधीत त्यांनी पेन स्टेट येथे तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान आणि समाज या विषयांचे अभ्यागत निमंत्रित प्राध्यापक म्हणून काम केले. ब्रेमेन आणि होगेन या विद्यापीठांतही त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.

विसाव्या शतकाच्या सातव्या दशकात इलिच यांनी डिस्कुलिंग सोसायटी (शाळा विरहित समाज) या पुस्तकाचे लेखन केले. या पुस्तकात त्यांनी शालेय संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मानवी शोषण कसे होते, याबाबतचे विवेचन एकूण सात घटकांत केले आहे. या पुस्तकात त्यांनी प्रचलित शाळा/शैक्षणिक संस्थांचे विसर्जन करण्याची आवश्यकता असल्याचे मत आणि शिक्षणाची नवीन पद्धती मांडलेली आहे. शैक्षणिक संस्थांच्या कार्यासंबंधी आकलन, शिक्षणसंस्थांमध्ये विशिष्ट अभ्यासक्रमानुसार होणारे अध्ययन-अध्यापन, कृत्रिम वातावरणामुळे मुलांच्या नैसर्गिक शक्तींचे होणारे शोषण यांमुळे सार्वजनिक स्वरूपाच्या शिक्षणाचा हेतू व्यक्ती विकास नसून राजकीय व सामाजिक विकास बनला आहे. त्यातून व्यक्तीला उपभोगी प्रवृत्तीचे बनविले जाते. शाळेत न शिकताही व्यक्ती ज्ञान प्राप्त करीत असते, असे त्यांचे मत होते. त्यांनी विकासाचे कर्मकांड स्पष्ट करून शालेय शिक्षणातून होणारे तोटे स्पष्ट केले आहेत. तसेच त्यांनी संस्थाचे डावे, उजवे आणि मध्यवर्ती असे तीन गट पाडून त्यांच्यातील फरक व उपयुक्तता मांडली आहे.

इलिच यांनी शाळा विरहित समाजाबाबतची योजना सादर करून उत्कृष्ट शिक्षणाचे चार हेतू सांगितलेले आहेत.

  • (१) व्यक्तीला जीवनातील कोणत्याही वयात शिकण्याची इच्छा असल्यास तिला शिकता आले पाहिजे.
  • (२) ज्ञानी व्यक्तीला आपल्या विषयातील जिज्ञासू व्यक्ती शोधण्याचा व त्यांना शिकविण्याचा अधिकार असावा.
  • (३) समाजापुढे आव्हान ठेवण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे.
  • (४) विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाबाबत सक्ती करू नये.

विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात व्यापक स्वरूपाचे मार्गदर्शन मिळण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, विषय निष्णात, संबंधित व्यावसायिक व्यक्ती, विचारवंत आणि त्यांचे अध्ययनक्षेत्र यांची माहिती सहज उपलब्ध असावी. यामुळे समाजातील विषमता व उच्च-नीच स्तरभाव कमी होईल. व्यक्तीला विविध प्रकारच्या बंधनातून मुक्त करणे हा शिक्षणाचा उद्देश सफल होऊ शकेल, असे विचार इलिच यांनी मांडले.

इलिच यांनी आरोग्य, कृषी, घरबांधणी, अध्ययन आणि यांबाबतचे ज्ञान व कौशल्याबाबत प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्रपणे संपूर्ण क्षमतेसह अचूक कार्य करण्याचे साधने उपलब्ध व्हावे, हा विचार मांडला. तसेच औषधांच्या मर्यादा स्पष्ट करून मानवी जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो हे स्पष्ट केले.

इलिच यांनी पुढील ग्रंथ लिहिली आहेत : डिस्कुलिंग सोसायटी, १९७०; सेलिब्रेशन ऑफ अव्हेरनेस, १९७०; एनर्जी अँड इक्विटी, १९७३; टुल्स फॉर कॉन्व्हिविॲलिटी, १९७३; मेडिकल नेमिसिस, १९७४; डिसॅब्लिंग प्रोफेशन्स, १९७७; टुवर्ड अ हिस्ट्री ऑफ निड्स, १९७८; द राईट टू युजफुल अनएम्प्लॉयमेंट, १९७८; जेंडर, १९८२; एबीसी, १९८८; इव्हान इलिच इन कॉन्व्हर्सेशन, १९९२; इन द विनेयार्ड ऑफ द टेक्स्ट, १९९३; बियाँड इकॉनॉमिक्स अँड इकॉलॉजी, २०१३ इत्यादी.

इलिच यांच्यावर शेवटच्या दिवसांमध्ये महात्मा गांधी आणि जे. सी. कुमाराप्पा यांचा प्रभाव होता. त्यांना १९९० मध्ये कर्करोग या आजाराने ग्रासले. त्यांनी वैद्यकांच्या सल्ल्याविरुद्ध स्वतःच स्वतःवर उपचार केले. अखेर ब्रेमेन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कुंडले. म. बा., शिक्षणाचे तात्विक, सामाजिक व सांस्कृतिक यथार्थदर्शन, भाग २ (संपा),    नाशिक, २००७.
  • दुनाखे, अ., शाळाविहीन समाज, नाशिक, २०१४.

समीक्षक : एच. एन. जगताप