त्रयोपस्तंभ या शब्दाची फोड ‘त्रय उपस्तंभ’ अशी होते. त्रय उपस्तंभ म्हणजे ‘तीन खांब’. आयुर्वेदानुसार आरोग्याची इष्टतम अवस्था किंवा ‘स्वास्थ्य’ हे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीन उपस्थंभांवर अवलंबून असते. चरकसंहितेनुसार “जो या तीन खांबाचे योग्य व्यवस्थापन करतो, त्याला संपूर्ण आयुष्याची हमी दिली जाते व त्याला कोणत्याही रोगाचा त्रास होऊ शकत नाही.” या तीन उपस्तंभांच्या युक्तीपूर्वक आचरणाने स्थिर किंवा उपस्तब्ध झालेले शरीर हे बल, उपचय, वर्ण यांनी परिपूर्ण होते. आयुष्य संस्कारात अनुरूप असे राहते. शरीराच्या दृष्टीने जो अहितकारक आहार-विहार असतो, त्याचे सेवन न करणे हाच शरीर संस्कार होय.

ज्या आहाराचा गंध, वर्ण, स्पर्श, रस हा रुचकर असतो आणि जो विधिपूर्वक तयार केलेला असतो अशा आहारास प्राण्यांचा प्राण असे संबोधले जाते. जाठराग्नीची स्थिती किंवा पचनशक्ती ही या आहाररूपी इंधनावर अवलंबून असते. हे अन्न सत्त्वगुण वाढविते. हाच आहार शरीरातील सर्व धातू, बल, वर्ण, इंद्रिय यांना प्रसन्नता प्राप्त करून देतो. योग्य उपयोग केल्यास तो हितकारक, तर विधिविरुद्ध उपयोग केल्यास तो अहितकर होतो.

आहाराविषयी चरकांनी अनेक आहार घटकांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे ऋतू, देश, काळ, अवस्था यांनुसार कोणी काय अन्न घ्यावे याचे देखील सविस्तर वर्णन आले आहे. चरक संहितेमध्ये प्रकृती (द्रव्याचा स्वभाव), करण (पदार्थांवर होणारे संस्कार), काल (ऋतू आणि अवस्था), राशी (पदार्थाची मात्रा), देश (राहत असलेला प्रांत), संयोग (दोन किंवा जास्त पदार्थ एकत्र मिसळणे), उपयोग संस्था (आहार घेण्याचे नियम) तसेच उपभोक्ता (आहार घेणारा) ही आठ आहार विधी विशेषायतने वर्णन केली आहेत.आहार विधी विशेषायतानांचे हे प्रकार शुभ व अशुभ फळ देणारे, परस्पर एकमेकांशी उपकारक असे आहेत, म्हणूनच ते जाणून घेणे गरजेचे असते. याच्याबरोबर आहार विधी विधानाचे देखील वर्णन चरकसंहितेत आले आहे. आहार उष्ण, स्निग्ध, योग्य मात्रेत, पहिला आहार पचल्यानंतर, परस्पर वीर्य विरुद्ध नसणारा, इष्ट देशी, इष्ट व सर्व उपकरणे असणारा, फार भरभर वा फार हळूहळू न घेतला जाणारा, फार बडबड न करता, फार न हसता व स्वत:कडे यथायोग्य लक्ष देत घेतला जाणारा असा असावा.

त्रयोपस्तंभातील पुढचा स्तंभ म्हणजे निद्रा. जेव्हा मन थकते, आपापली कामे करणारी सर्व इंद्रियेही थकतात आणि आपापल्या विषयांपासून निवृत्त होतात, त्यावेळी मनुष्य झोपी जातो. निद्रा म्हणजे मनाचा निरींद्रिय प्रदेशी प्रवेश करणे होय. चरकांनी निद्रेचे ६ प्रकार सांगितले आहेत – (१) तमोभवा (२) श्लेष्म समुद्भवा (३) मन शरीर श्रमसंभवा (४) आगंतुकी (५) व्याध्यानुवर्तीनी (६) रात्री स्वभाव प्रभवा.

यथाविधी झोप घेतल्याने शारीरिक तथा मानसिक सुख, शरीराची पुष्टी, बलवृद्धी, वीर्यवृद्धी, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढणे आणि दीर्घजीवनाची प्राप्ती होणे हे लाभ होतात. याउलट शास्त्रनियमांच्या विपरीत निद्रा घेतल्याने दु:ख, कृशता, दौर्बल्य, क्लैब्य (नपुंसकत्व), अज्ञान आणि मृत्युही येऊ शकतो. अकाली झोपल्याने, अधिक झापल्याने किंवा दिवसा वा रात्री कधीच न झोपल्याने निद्रेचा मिथ्यायोग, अतियोग किंवा अयोग होतो. याप्रकारची निद्रा ही कालरात्रीप्रमाणे असते. यासाठीच सुखायु इच्छिणाऱ्या पुरुषाने या हीन, अतियाग, मिथ्यायोग निद्रेचा त्याग करून निद्रेच्या सम्यक योगाचे पालन केले पाहिजे. निद्रा ही योग्यप्रकारे घेतली गेली, तर मनुष्यास सुखायु प्राप्त होते. ज्याप्रकारे सत्याबुद्धी (विवेकपूर्ण बुद्धी) असण्याने योगी पुरुषांना सिद्धी प्राप्त होते तसेच येथे घडते.

देहवृत्तौ यथाऽऽहारस्तथा स्वप्न: मुखो मत: ।

स्वमाहारसमुत्थे च स्थौल्यकाश्ये विशेषत: ॥

देहधारणाकरता ज्या प्रकारे विधिपूर्वक घेतलेला आहार हितकर असतो, त्याप्रमाणेच यथाविधी सेवन केलेली निद्रा ही सुद्धा सुखकारक असते. शरीराची स्थूलता आणि कृशता यामध्ये निद्रा आणि आहार ही विशेष रूपाने कारणीभूत असतात.

निद्रेनंतर शेवटचा परंतु, महत्त्वाचा आरोग्यस्तंभ म्हणजे ब्रम्हचर्य पालन. आहार आणि निद्रा याप्रमाणेच ब्रह्मचर्य हाही एक शरीरधारणेस आवश्यक असा उपस्तंभ आहे. जीवनाच्या सुरुवातीच्या काळास ब्रम्हचर्याश्रम असेच संबोधिले जाते. जीवनाच्या सुरवातीच्या काळात सप्तम धातु शुक्र याची अभिव्यक्ती पूर्णत्वाने झालेली नसते. अध्ययनादि कर्मे करताना मन विचलित होऊ नये, यासाठी या काळात ब्रह्मचर्य पालन आवश्यक असते. याकाळी ब्रम्हचर्य पालन न केल्यास शरीराची वाढ मंदावते.

गृहस्थाश्रमात मात्र स्त्रीसहवासातून वीर्यक्षरण होत असते. हा वीर्यक्षरणाचा सदुपयोगच मानला आहे, कारण त्यामुळेच अपत्य संभव होऊ शकतो. गृहस्थाश्रमामध्ये पूर्ण ब्रम्हचर्य पाळावयाचे नसते परंतु, स्त्रीसमागमाचा अतिरेकही उपयोगी नसतो.

आहार जनित रसाचे शरीरात अंतिम परिणमन शुक्र तथा आर्तवामध्ये होत असते. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यांच्या विधियुक्त प्रयोगाने बल, वर्ण, पुष्टी प्राप्त होते. हित्कर्माच्या सेवनाने अल्पायुचे परमायुत, तर अहितकर सेवनाने परमायुचे अल्पायुत रूपांतर होऊ शकते.

संदर्भ :

  • Dr.  Shantibhushan  R.  Handur Ahara Vidhi – Dietry guidelines in Ayurvedaj 6:220-222, Ayurveda Integr Med Sci., 2019.
  • S. N. Kumar Shetty, R., & KA, S. A REVIEW ON THE CONCEPT OF TRAYOPASTAMBHA WITH SPECIAL REFERENCE TO BRAHMACHARYA Journal Of Ayurveda And Integrated Medical Sciences (ISSN 2456-3110), 5(4), 341 – 346, 2020.
  • चरक, चरकसंहिता, सूत्र स्थान, विमान स्थान, वैद्यामित्र प्रकाशन, २०१३.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे