एखाद्या रोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय. वात, पित्त व कफ हे तीन दोष आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा वाढल्यास काही वेळा ते शरीरातील रक्ताला त्याचे काम नीट करू देत नाही. अशा रक्ताला दूषित रक्त म्हणतात. या दूषित रक्तामुळे शरीरावर फोड येणे, खाज सुटणे असे काही त्वचेचे विकार होतात; तर तोंड येणे, कडू, आंबट घशाशी येणे, योनीवाटे अकारण रक्त जाणे, वातरक्त (सांधेदुखीचा एक प्रकार) असे अनेक रोग होतात.

रक्तमोक्षणालाच रक्तविस्त्रावण किंवा शोणित विस्त्रावण असेही म्हणतात. कधीकधी या दूषित रक्ताचा प्रभाव सर्व शरीरभर दिसतो, तर कधी तो एखाद्या भागापुरता मर्यादित असतो. दूषित रक्ताचा प्रभाव कुठवर पसरलेला आहे त्यानुसार रक्तमोक्षणाची पद्धत ठरविली जाते. रक्तमोक्षणाचे मुख्यत: दोन प्रकार पडतात –

शस्त्रकृत रक्तमोक्षण : कपिंग थेरपी.

(१) शस्त्रकृत रक्तमोक्षण : त्वचेवर एखादी चिर मारून किंवा सुई टोचून रक्त बाहेर काढले जाते, त्याला शस्त्रकृत रक्तमोक्षण असे म्हणतात. याचे दोन प्रकार पडतात –

(i) सिरावेध : यात रक्त काढण्यासाठी सुईचा वापर होतो. जर दूषित रक्ताचा प्रभाव सर्व शरीरभर जाणवत असेल, तर त्वचेवरून स्पष्ट दिसणाऱ्या रक्तवाहिनीत सुई टोचून तिच्याद्वारे रक्त बाहेर काढले जाते. ही पद्धत रक्तदान करतेवेळी अवलंबविण्याच्या प्रक्रियेप्रमाणे आहे.

(ii) प्रच्छन : दूषित रक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर प्रच्छन पद्धतीने रक्तमोक्षण केले जाते. यात त्या भागावरील त्वचेवर चिरा मारून आवश्यक तेवढा रक्तस्त्राव होऊ दिला जातो. या ठिकाणी दूषित रक्ताचा प्रभाव त्वचेखाली खूप खोलवर पसरलेला नसेल, तर ही प्रक्रिया लाभदायक ठरते. परंतु, दूषित रक्ताचा प्रभाव थोड्या खोलपर्यंत पसरलेला असेल, तर केवळ वरवर चिरा मारून उपयोग नाही. अशावेळी ‘शृंग व अलाबू’ या दोन उपकरणांचा वापर केला जातो.

अशस्त्रकृत रक्तमोक्षण : जळवांच्या साहाय्याने केले जाणारे रक्तमोक्षण.

‘अलाबू’ म्हणजेच भोपळा. आतून पोकळ असलेल्या अलाबूत पेटता दिवा ठेऊन तो आतून निर्वात केला जातो व लगेच चिरा दिलेल्या भागावर तो अलाबू दाबून धरला जातो. निर्वात अवस्थेमुळे आत ऋणात्मक दाब तयार होऊन चिरेमधून रक्त बाहेर येऊ लागते. दूषित रक्ताचा प्रभाव त्याहीपेक्षा अधिक खोल असेल तर ‘शृंगाचा’ वापर होतो. ‘शृंग’ म्हणजे शिंग. आतून पोकळ, तळाशी पसरट व टोकाशी निमुळते असे विशिष्ट रचना असलेले प्राण्याचे शिंग यात वापरले जाते. शृंगाच्या निमुळत्या टोकाला छिद्र पाडल्यास ते एखाद्या आचुषकाप्रमाणे काम करते. त्वचेवर प्रच्छन करून त्या चिरेवर शृंगाचा तळ दाबून धरून वरच्या टोकाने रक्त शोषल्यास खोलवरचे रक्तही बाहेर येते. सध्या शृंग व अलाबूचा वापर न करता त्याऐवजी प्लॅस्टिकच्या विशिष्ट कपांचा वापर करतात. त्यांच्या साहाय्याने केलेल्या रक्तमोक्षणास ‘कपिंग थेरपी’ (Cupping therapy) म्हणतात. त्यातही ऋणात्मक दाबाचा उपयोग केला जातो.

सुश्रुतसंहितेत विशेषेकरून रक्तमोक्षणासाठी शस्त्रकर्माचा विचार केला आहे.

(२) अशस्त्रकृत रक्तमोक्षण : शस्त्राचा वापर न करता केले जाणारे रक्तमोक्षण म्हणजे अशस्त्रकृत रक्तमोक्षण होय. यासाठी बिनविषारी जळवांचा वापर होतो. जळू ही एक रक्त शोषणारी जलचर अळी आहे. काही जळवा विषारी असतात, परंतु त्यांचा रंग बिनविषारी जळवांपेक्षा फार वेगळा असतो. दूषित रक्ताचा प्रभाव एखाद्या भागापुरता मर्यादित असेल, तर जळूचा वापर होतो. जळू त्वचेला चावा घेऊन पकडते व त्या ठिकाणचे दूषित रक्त शोषून घेते. एका मर्यादेपर्यंत रक्त शोषल्यावर जळू चावा सोडते किंवा आवश्यक तेव्हा तिचा चावा सोडविण्यासाठी तिच्या तोंडावर काही औषधी सोडण्यात येतात.

रुग्णाचे वय, त्याची सहनशक्ती व दूषित रक्ताचे प्रभावक्षेत्र यानुसार रक्तमोक्षणाची पद्धत ठरवली जाते.

पहा : जळू, पंचकर्म.

संदर्भ :

  • सुश्रुतसंहिता — सूत्रस्थान, अध्याय १३ , अध्याय १४.
  • सुश्रुतसंहिता — शारीरस्थान, अध्याय ८.
  • चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय २४.
  • Evaluation of Bloodletting Cupping Therapy in the Management of Hypertension. Al-Tabakha MM1, Sameer, FT1, Saeed MH1, Batran RM1, Abouhegazy NT1, Farajallah AA2. 2018 Jan-Mar;10(1):1-6. doi:10.4103/jpbs.JPBS_242_17, PMID: 29657501, PMCID: PMC5887646

समीक्षक : जयंत देवपुजारी