जगातील व्यापारी बँकांच्या परिनिरीक्षणाच्या संदर्भात बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने जी समिती नेमली होती, तिला बॅसल समिती असे संबोधले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर व विशेषेकरून विसाव्या शतकाच्या शेवटी व एकविसाव्या शतकात बँकिंग क्षेत्रात व त्यातही व्यापारी बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. वाढती स्पर्धा, नवे तंत्रज्ञान, उदारीकरण, आर्थिक सुधारणा, खाजगीकरण ही बदलाची ठळक वैशिष्ट्ये होती. बँकांनी आपले व्यवहार पारदर्शी ठेवावेत, त्यांची कार्यपद्धती प्रमाणीकृत असावी, तेजी-मंदीच्या आव्हानांना त्यांनी समर्थपणे तोंड द्यावे अशा उद्दिष्टांसाठी या बॅसल समितीने आपल्या शिफारशी मांडल्या. बँकांनी आपल्या व्यवस्थापकीय पद्धतीमध्ये सुधारणा करावी, जोखीम व्यवस्थापन व रोखतेचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे असा दृष्टिकोण या शिफारशींमागे होता. या सर्वांतून बँकांची उत्पादकता आणि त्यांचे उत्तरदायित्व सुधारणार होते. ही उद्दिष्टे साधण्यासाठी बँकांनी आपला भांडवली पाया विस्तृत व सखोल करावा आणि सर्व तऱ्हेची वित्तीय अरिष्टे पेलण्याची क्षमता वाढवावी अशी भूमिका या बॅसल प्रमाणकांच्या संदर्भात व्यक्त केली गेली. व्यापारी बँकांची वित्तीय क्षमता व त्यांचे वित्तीय आरोग्य तपासण्यासाठी अनेक निकषांचा वापर केला जातो. उदा., भांडवल : जिंदगी (अँसेट्स) गुणोत्तर, भांडवल : एकूण कर्जे गुणोत्तर इत्यादी.

बँकांच्या ताळेबंदात जिंदगी बाजूची महत्त्वाची बाब म्हणजे बँकांनी वितरित केलेली कर्जे. या कर्जांपासून बँकांना व्याजाचे उत्पन्न मिळत असले, तरी या कर्जांमध्ये जोखमीची कमीअधिक मात्रा असते. जर व्याज व मुद्दल यांची वेळेवर परतफेड झाली, तर ती उत्पादक किंवा सशक्त जिंदगी मानली जाते; पण जर अशी कर्ज व व्याज परतफेड विलंबाने झाली किंवा अतिविलंबाने झाली किंवा परतफेड मुळीच झाली नाही, तर ती टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या जोखमीची किंवा पूर्ण तोट्याची जिंदगी मानली जाते; परंतु कर्जदाराकडून पुरेसे तारण घेतले असल्यास अशा जिंदगीस दुय्यम प्रतीची जिंदगी समजली जाते. पुरेसे तारण नसलेली जिंदगी शेवटी नादारी किंवा दिवाळखोरीत परावर्तीत हेते. अशा जिंदगीस विशिष्ट कालमर्यादेनंतर अनुत्पादक, तर विशिष्ट प्रक्रियेनंतर बुडित जिंदगी ठरविली जाते. अशा अनुत्पादक जिंदगीसाठी व बुडित जिंदगीसाठी बँकांना तितक्या रकमांची तरतूद त्यांनी कमाविलेल्या उत्पन्नातून किंवा नफ्यातून करावी लागते. अशा जिंदगीसाठी आवश्यक तो निधी तयार करणे हे क्रमप्राप्त असते. हे सर्व करण्यासाठी बँका स्वत:कडील निधीचा वापर करतात. ठेवींमार्फत गोळा झालेला पैसा हे ठेवीदारांचे देणे असल्याने या कामासाठी तो पैसा वापरता येत नाही; मात्र बँकेचे स्वत:चे भाग भांडवल, स्वनिधी ज्यामध्ये राखीव निधी, इमारत निधी, आकस्मातील अडचणींसाठी  असलेले इतर निधी येथे उपयोगी पडतात. त्यामुळेच जोखीम व्यवस्थापनासाठी बँकांच्या भांडवलाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.

बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या समितीने १९८८ पासून बँकांच्या अशा भांडवल पर्याप्ततेवर अनेक सूचना केल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदी, बँकांमधील स्पर्धा, उदारीकरणाची धोरणे अशा घडामोडींमुळे कर्ज व्यवहारांमधील जोखीम वाढू लागली आहे. म्हणून अशा भांडवल पर्याप्ततेचा विचार बँकांना अटळपणे करावा लागतो. याच दृष्टिकोणातून बॅसल प्रमाणकांचा आधार घेतला जातो. १९८८ च्या या प्रमाणकांमध्ये ‘बँकांचे भांडवल त्यांच्या जोखीम भारत जिंदगीच्या किमान ८% असावे’ असे म्हटले होते. ही बॅसल १ प्रमाणके होय. ही प्रमाणके तत्त्वत: योग्य असली, तरी त्यांमध्ये काहीशी संदिग्धता वा अपुरेपणा वाटल्याने १९९९ मध्ये नवी प्रमाणके प्रसृत करण्यात आली. त्यांचेही सुधारित प्रारूप २००१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यातही काहीशी सुधारणा २००३ मध्ये करण्यात आली. ही बॅसल २ प्रमाणके होत. ही प्रमाणके २००६ पर्यंत टप्प्याटप्प्याने अंमलात आणावी, असे त्यात म्हटले होते. त्यानुसार जर कर्ज प्रकरण उत्तम गुणवत्तेचे म्हणजे व्याज-मुद्दल परतफेडीच्या अटी तंतोतंत पाळणारे असेल, तर त्याच्या पोटी सापेक्षतेने कमी तरतूद ताळेबंदात असावी. ही गुणवत्ता जसजशी घटती असेल, तसतशी त्यासाठी तरतूद वाढत जाईल, असे यात निर्धारित केले गेले. त्यानुसार बँकांनी आपली अंतर्गत परिनिरीक्षण पद्धती सुधारावी, कर्ज प्रकरणे अधिक काटेकोरपणे हाताळावी आणि त्या सर्व नियमावलीस उचित प्रसिद्धी द्यावी, असे त्या प्रमाणकांमध्ये म्हटले होते. या प्रमाणकांच्या अंमलबजावणीस बँकांचे पारदर्शी व्यवहार व नव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांचा मोठा वाटा होता.

बॅसल १ व बॅसल २ प्रमाणकांच्या नियमावलीस भारताने अनुकूल प्रतिसाद दिला. या नियमावलीबाबत बँकांना मार्गदर्शन करणे, भांडवल उभारणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देणे, या प्रगतीचा तिमाही आढावा घेणे, बँकांनी दर्जाकन करून घ्यावे म्हणून आग्रह धरणे अशी पावले भारतीय रिझर्व्ह बँकेने उचलली. बँकिंग उद्योग अधिक स्थिर बनविण्यासाठी अंदाजे रु. ७,००० कोटी इतक्या नव्या भागभांडवलाची भारतीय व्यापारी बँकांना गरज होती, असे त्या सुमारास सांगितले होते; मात्र २००८ मध्ये आलेली जागतिक महामंदीची लाट व पेच प्रसंगामुळे जगातील अनेक नामवंत अर्थसंस्था आणि त्यातही गुंतवणूक बँका (उदा., लेहमन ब्रदर्स, मेरील लिंच इत्यादी.) लयाला गेल्या. काही दुसऱ्या संस्थेत विलीन झाल्या, तर काही अवसायानात गेल्या. यातून मार्गक्रमण करण्यासाठी बॅसल ३ प्रमाणके उदयाला आली. यामध्ये जोखीम व्यवस्थापन व द्रवता किंवा रोखता व्यवस्थापन यांवर भर दिला गेला आहे. भारतातील बँकांचे प्रमाणकांची गरज भासू लागली. बदलत्या परिस्थितीची आव्हाने पेलण्यासाठी बँकांना विनियंत्रणे, विविधीकरण आणि संरचनात्मक संगठन यांची गरज होती. या प्रमाणकांनुसार भारतीय बँकांनी मार्च २०१९ पर्यंत एकूण जोखीम भारित जिंदगीच्या किमान ८% भांडवलाची अट पूर्ण करावी अशी अपेक्षा होती. एका अंदाजानुसार प्रत्यक्षात ही रक्कम रु. ४.२० लाख कोटीचे अतिरिक्त भांडवल अशी असणार होती. जर बँकांची नक्त अनुत्पादक कर्जे वाढत गेली, तर ही किमान अपेक्षित भांडवल पर्याप्तता अधिकच वाढत जाईल असे आढळते.

थोडक्यात, जगातील सर्वच अर्थसंस्थांना बॅसल ३ हे आव्हान आहे. बँकांना भांडवली पाया मजबूत करतानाच आपल्या जिंदगीची रोखता किंवा द्रवता राखावी लागेल.

बॅसल स्वित्झर्लंड देशाच्या वायव्य भागात उत्तर सीमेवर ऱ्हाईन नदीच्या तीरावर वसलेले एक छोटे शहर आहे. त्याची लोकसंख्या सुमारे ५,६७,००० इतकी आहे (२०२२). लोकसंख्येच्या दृष्टीने हे देशातील तिसरे शहर आहे. मुख्यत: हे शहर रसायन आणि औषधनिर्माण उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सेवा व्यवसायांमध्ये प्रामुख्याने बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठीसुद्धा हे शहर प्रसिद्ध आहे. तेथे बॅसल ऑफ युनिव्हर्सिटी (स्थापना इ. स. १४६०) हे देशातील सर्वांत जुने विद्यापीठ आहे. त्या शहरात अनेक वस्तुसंग्रहालये व कलादालने आहेत.

समीक्षक : आर. एस. देशपांडे