व्यक्ती आणि संस्था यांच्या आर्थिक प्रक्रियेशी, त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित असणारा एक मानसशास्त्रीय अभ्यास वर्तनवादी अर्थशास्त्रात केला जातो. पारंपरिक अर्थशास्त्रात व्यक्ती नेहमीच विवेकपूर्ण रितीने, विविध अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार वर्तन करत असते. व्यक्ती सदैव आपल्या आर्थिक फायद्याचा विचार करून निर्णय घेत असते, असे गृहित धरले जाते. अपवाद असेलच, तर नगण्य असतात असे मानले जाते. म्हणजेच पारंपरिक अर्थशास्त्राचा पाया आर्थिक मानव (होमो इकॉनॉमिक्स) आणि तार्किक अपेक्षा प्रमाण मानणारी व्यक्ती हाच असतो; मात्र प्रत्यक्षात मानवाचे वर्तन बरेचदा अतार्किक, भावनाशील आणि अविवेकी असू शकते. अशा मानवी वर्तनाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातूनच वर्तनवादी अर्थशास्त्र शाखेचा जन्म झाला आहे.

वर्तनवादी अर्थशास्त्राचा पाया १९७० च्या दशकात डॅनियल काहेनमन आणि व्हेर्नॉन लोमॅक्स स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम घातला. एखाद्या व्यक्तिची मानसिकता, त्याला असणारी मर्यादित माहिती व ज्ञान, त्याची भावनाशीलता आणि मर्यादित विवेकीपणा यांवर आधारित अनेक वास्तवादी प्रयोगातून त्यांनी अर्थशास्त्र व मानसशास्त्र यांच्या मिश्रणातून ही नवीन अभ्यासशाखा उदयास आणली. म्हणजेच या शाखेचे स्वरूप केवळ सैद्धांतिक नसून वास्तवातील घटना, प्रयोग व उदाहरणे यांद्वारे अभ्यासले जाणार आहे. अर्थशास्त्र हे एकाच वेळी कला आणि शास्त्र या दोहोंचा संगम आहे, असे म्हटले जाते.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड एच. थेलर यांनी अर्थशास्त्राच्या तात्विक चिंतनाला मानवी रूप देण्याचे काम अतिशय अभ्यासपूर्ण रितीने केले आहे. एकीकडे पारंपरिक, तार्किक कठोरता आणि दुसरीकडे प्रत्ययातील अतार्किक, असामंजस्य वर्तमान मानवी कलह यांतील सुवर्णमध्य साधून त्यावर आधारित वैचारिक सिद्धांतन मांडण्याची कामगिरी थेलर यांनी केली आहे. त्यांच्या लिखाणामुळे अर्थशास्त्रातील मर्यादित तर्कशास्त्र, सामाजिक संदर्भ आणि अर्थव्यवस्थेतील स्वनियंत्रणाचा अभाव या विविध क्षेत्रांतील संशोधनाची व्याप्ती वाढली आहे. त्यांनी नज या पुस्तकात वर्तनवादी अर्थशास्त्राचा आढावा घेत समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्याच्या उपायांवरही चर्चा केली आहे.

थेलर यांच्या मते, व्यक्तीचे आर्थिक आणि बिगर आर्थिक वर्तन अधिकाधिक अविवेकी असते. आपल्या आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक असतो, हे माहीत असूनही तो शरीरास हानीकारक व अपौष्टिक अन्न खातो. भविष्यासाठी बचत करणे योग्य आहे, हे जाणूनही तो उधळपट्टी करत राहतो. अल्पकालिक मोहाला दीर्घकालीन फायद्यापेक्षा अधिक प्राधान्य देत असतो. अलीकडच्या काळात भुतदयावादी मंडळींनी प्राण्यांच्या बेसुमार हत्या करून त्यांच्या कातडी, शिंगे किंवा केसांपासून बनविलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे अस्त्र उभे केले आहे. तेसुद्धा याच अविवेकी, परंतु मानवी वर्तनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीमुळे होय. अशाच बिगर लाभ दृष्टीकोनामुळे माणसे गरीबांना मदत करतात, हॉटेलातील कामगारांना बक्षिसे देतात, सामाजिक कार्य करतात आणि यांमुळेच मानवी नातेसंबंध सुदृढ राहतात. अर्थातच, असा न्याय्य, संवेदनशील प्रवृत्ती सर्वत्र सारख्या प्रमाणात असत नाही. मानवाचे अतार्किक, अल्पकालीन स्वार्थाचे वर्तन आणि संवेदनशील, पापभीरू व दीर्घकालीन लाभाचे वर्तन यात नेहमीच एक दृश्य-अदृश्य संघर्ष चालू असतो. यात कोणत्या तरी एका बाजूची सरशी होत असते आणि त्यानुसार त्या त्या व्यक्ती किंवा समाजाची वर्तनप्रवृत्ती निश्चित होताना दिसते. या संघर्ष प्रवृत्तीमुळे काही व्यक्ती समाजनियमांचे काटेकोर पालन करतात किंवा मुळीच करत नाही. वाहतुकीचे नियम पाळतात किंवा मोडतात, सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तीने किंवा शिस्तीने वागतात. ज्या लोकांना किंवा जमाजाला हे स्पष्टपणे कळते की, जर त्यांनी नियम मोडला, तर इतरांनाही तसेच करता येणे शक्य असते. त्यामुळे कोणाचाच फारसा लाभ होणार नाही. अशा लोकांचे वर्तन अधिक नियमबद्ध असेल. उदा., जर एकजण वाहतुकीच्या लाल दिव्यांचे उल्लंघन करून पुढे जाऊ पाहत असेल, तर तसे प्रत्येकालाच करता येऊ शकते. यामुळे सर्वांचीच कोंडी होऊन कोणीही पुढे जाऊ शकणार नाही. शिवाय, यामुळे अपघात किंवा दंडही होऊ शकतो. हे ज्याला कळते, तो माणूस किंवा समाज सहसा शिस्तीचे उल्लंघन करणार नाही.

व्यक्तीचे वर्तन तार्किक स्वरूपाचे नसून त्याच्या भावना, प्रवृत्ती, सवयी, दृष्टीकोन, पुर्वानुभव इत्यादी मानवी गोष्टींवर अधिक अवलंबून असते, असे दिसून येते. वर्तनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून तार्किक मानवाची वैचारिक हत्या घडवून असामंजस, अतार्किक, अविवेकी आणि वास्तववादी व्यक्तीला नज सिद्धांत मुळच्या संगणकशास्त्राच्या (पीर सायबरनेटिक्स) अभ्यासशाखेतून जेम्स विक यांनी अविकसित केलेल्या नज सिद्धांताचे अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांमधील उपयोजन करण्याचे श्रेय हर्बर्ट अलेक्झांडर सायमन, रिचर्ड काहनेमन, व्हेर्मॉन आणि थेलर यांना जाते. प्रत्यक्ष सूचना किंवा आदेश देण्यापेक्षा किंवा कडक कायदे आणि नियम लागू करण्यापेक्षा नज म्हणजे हलकासा धक्का किंवा कोपरखळी देऊन व्यक्तीचे वर्तन अपेक्षित दिशेने व उचित मार्गाकडे वळविणे शक्य आहे, असा या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ सांगता येईल. याद्वारे अधिक कार्यक्षम आणि प्रभावी परिणाम साधता येऊ शकते, यावर वर्तनवादी तज्ज्ञांचा विश्वास आहे.

भारतासारख्या अवाढव्य, बहुसांस्कृतिक व पाश्चात्त्य आधुनिक जगाच्या तुलनेत अधिकच असामंजस वर्तन आणि विचारपद्धती असणाऱ्या देशांमध्ये नज सिद्धांत कसा वापरला गेला आहे, हे पाहणे मनोरंजक ठरेल. मानवी वर्तन कोणत्याही नियमात किंवा सिद्धांतात बसणे अशक्यप्राय बाब आहे. थेलर यांनी स्वत: नऊ दशलक्ष स्वीडिश क्राऊन मूल्यांचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका पत्रकाराच्या ‘तुम्हाला मिळालेली रक्कम तुम्ही कशी खर्च कराल?’ या प्रश्नाचे उत्तर गमतीशीर, पण सत्याच्या अंगाने जाणारे दिले. ते म्हणाले की, ‘मीही माणूसच आहे आणि मी ही रक्कम तशाच अविवेकी पद्धतीने उडविणार.’ नज सिद्धांताचा प्रणेता जेथे अपेक्षित तार्किक वर्तन करू इच्छित नसेल, तेथे सामान्य लोकांचे वर्तन विवेकवादी सिद्धांतानुसार असणारच नाही.

संदर्भ : Thaler, Richard H.; Sunstein, Cass R., Nudge : Improving Dicisions About Health, Wealth and Happiness, US, 2009.

समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे