थेलर, रिचर्ड एच. (Thaler, Richard H.) : (१२ सप्टेंबर १९४५). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, वर्तनाधारीत अर्थशास्त्राचे जनक व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. थेलर यांना वर्तनवादी वित्तविषयातील वर्तणुकीचे अर्थशास्त्र (Behavioral Economics) या विषयात दिलेल्या चार दशकाच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल २०१७ सालचा अर्थशास्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
थेलर यांचा जन्म अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील ईस्ट ऑरेंज या शहरात वडील ॲलन व आई रॉस्लीन या दांपत्यापोटी ज्यूव्हिश कुटुंबात झाला. त्यांचे वडील एका विमा कंपनीत सांख्यिकी, तर आई शिक्षिका होत्या. थेलर यांनी १९६७ मध्ये केस वेस्टर्न रिझर्व विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर १९७० मध्ये एम. ए. ही पदवी तसेच १९७४ मध्ये शेर्वीन रॉझेन या अर्थतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. या पदव्या त्यांनी रॉचेस्टर विद्यापीठातून मिळविल्या. डॉक्टरेटनंतर त्यांनी १९७४ – १९७८ या काळात रॉचेस्टर विद्यापीठातच अध्यापन केले. ते १९७८ – १९९५ या काळात कॉर्नेल विद्यापीठातील ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझनेस ॲण्ड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विद्याशाखेचे सदस्य होते. थेलर हे १९९१ पासून नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स प्रोजेक्ट या संस्थेचे सहसंचालक होते. १९९३ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या फुल्लर ॲण्ड थेलर असेट मॅनेजमेंट या पेढीचे सहसंस्थापक व १९९९ पासून प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. थेलर यांचा विवाह फ्रान्स लिक्लर्स हिच्याशी झाला. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत.
थेलर यांनी अर्थशास्त्राचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषणात्मक अभ्यास केला. आधुनिक अर्थशास्त्रामध्ये मोलाची भर घातली. एखादी व्यक्ती अथवा समाज अर्थशास्त्रातील किंवा वित्तीय बाजारपेठेमध्ये कोणताही निर्णय घेत असताना त्यावर सामाजिक आणि मानसिक घटकांचा कसा परिणाम होतो, हे त्यांनी दाखविले. यालाच ते आर्थिक मानसिकतेच्या लेखापरिक्षणाचा सिद्धांत असे म्हणतात. एखादी वस्तू आपल्याकडे नसताना ती आपली झाल्यानंतर तिची किंमत जास्त का वाटते, या अर्थशास्त्रातील वर्तनात्मक पद्धतीचा उलगडा त्यांनी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल विजेते डॅनिएल काहनेमन या आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने ‘एंडोमेंट इफेक्टʼमध्ये केला. ग्राहकांच्या आर्थिक वर्तनाचे मोजमाप करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘दि डिक्टेटर गेमʼ हे शास्त्र विकसित केले आहे. मानवाच्या स्वभाववैशिष्ट्यांचा परिणाम बाजारपेठेवर होतो, असे ते म्हणतात. तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी लोकांशी कसे वागावे, याकरिता त्यांनी अर्थशास्त्रातील निर्णयप्रक्रियेतील विश्लेषणाद्वारे मानसशास्त्रीय व वास्तववादी कल्पनांचे गृहितक मांडले. अर्थशास्त्राच्या प्रमेयामध्ये मूलभूत मानली जाणारी अनेक गृहितके, त्यांबद्दलची अधिक वर्तननिष्ठ विश्लेषण पद्धती आणि त्यांच्या आधारे वित्तीय व्यवहारासाठी अधिक प्रगत, धोरणात्मक, कृतिप्रवर्तक मार्गदर्शन करणे, यासाठी थेलर प्रसिद्ध आहेत.
थेलर हे आर्थिक मंदीतील बेरोगारीसंबंधात म्हणतात की, प्रमाणित आर्थिक सिद्धांतानुसार आर्थिक मंदीच्या काळात उद्योजक वेतन कपात करतात; परंतु ती कपात वस्तू व सेवा यांच्या मागणीच्या समप्रमाणात असते. त्यामुळे आर्थिक मंदीत बेरोजगारी निर्माण होत नाही. थेलर यांची मूलत: वर्तनवादीशास्त्र व अर्थशास्त्र यांच्यातील घनिष्ठ संबंधावर सातत्यपूर्ण संशोधन करणारे तज्ज्ञ म्हणून ख्याती आहे. त्यांच्या संशोधनामुळे अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांतील दरी भरून काढली गेली आहे. त्यांनी अर्थशास्त्र विषयाला सैद्धांतिक चाकोरीतून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. थेलर यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब अमेरिकेच्या आरोग्य, शक्तीपुरवठा, पर्यावरण व ग्राहक संरक्षण, शिक्षण, बेरोजगारी आणि राष्ट्रीय सुरक्षासंबंधी धोरण इत्यादींमध्ये आढळते.
थेलर यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातील कायदा विषयाचे प्राध्यापक कॅस आर. सन्स्टेन यांच्या सहकार्याने २००८ मध्ये लिहिलेल्या नज : इम्प्रूव्हिंग डिसिजन्स अबाउट हेल्थ, व्हेल्थ ॲण्ड हॅपिनेस या प्रसिद्ध ग्रंथात व्यावहारिक अर्थशास्त्राचा आढावा घेत समाजातील समस्यांवर प्रकाश टाकला आहे; त्याचबरोबर व्यक्तिच्या वर्तणुकीच्या अर्थशास्त्रावर सविस्तर विवेचन केले आहे. आरोग्य, संपत्ती आणि आनंद या मानवी जीवनाशी निगडित असलेल्या संकल्पनांना सोप्यापद्धतीने मांडून त्यांचा अर्थशास्त्राशी संबंध जोडत छोट्या फायद्यांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडण्याची सोपी पद्धत त्यांनी या ग्रंथात मांडली आहे. ग्राहकांची मानसिकता समजावून घेण्यासाठी अर्थशास्त्र उपयुक्त आहे, असे सांगताना अर्थव्यवहाराकडे मानवी भावभावनांद्वारे पाहायला हवे आणि अर्थशास्त्रातील प्रारूपांत त्यांचा समावेश व्हावा, हा त्यांचा युक्तिवाद पटणारा आहे. समाजावर आर्थिक व्यवहारासाठीची सक्ती न करता त्यांना मार्गदर्शन करण्याचा सिद्धांत आपल्या ग्रंथात मांडलेला आहे. ग्राहकांच्या क्रय प्रेरणांचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केलेले आहे.
थेलर यांनी स्वत: व सहकाऱ्यांसह पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले आहे : दि सायकॉलॉजी ऑफ चॉइस ॲण्ड दि ॲसुम्प्शन्स ऑफ इकॉनॉमिक्स (१९८७), क्वॉसी रॅशनल इकॉनॉमिक्स (१९९१), दि विनर्स कर्स : पॅराडॉक्सेस ॲण्ड ॲनॉमेलीझ ऑफ इकॉनॉमिक लाईफ (१९९१), ॲडव्हॉन्सेस इन बिहॅव्हिअरल फायनान्स – भाग १ व २ (१९९३ व २००५), नज : इम्प्रूव्हिंग डिसिजन्स अबाउट हेल्थ, व्हेल्थ ॲण्ड हॅपिनेस (२००८ – सहलेखक), मिसबिहॅविंग : दि मेकिंग ऑफ बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स (२०१५). शिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
थॅलर हे ‘सेंटर फॉर डिसिजन रिसर्चʼ या संस्थेचे संचालक आणि १९९५ पासून आजतागायत शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत वर्तनवादी अर्थशास्त्र या विषयाचे प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
समीक्षक – जयवंत चौधरी