प्राचीन काळापासून वापरले जाणारे दक्षिण भारतीय तंतुवाद्य. त्याला गोटूवाद्यम् आणि महानाटक वीणा, वीणा हनुमद या नावानेही ओळखले जाते. हे एकवीस तारा असणारे एक पूर्णत: भारतीय तंतुवाद्य आहे. यामध्ये साधारणपणे ३० इंच लांब आणि ४ इंच रुंदीचा लंबगोलाकार पोकळ आणि कंपनयुक्त लाकडापासून बनविलेला बुंधा असतो. या बुंध्याची एक बाजू सपाट व चपटी केलेली असते आणि ती दोन पोकळ ध्वनीगर्भावर (भोपळा) बसविलेली असते. यातील मुख्य ध्वनीगर्भ हा लाकडापासून बनविलेला असतो. बुंध्याच्या दुसऱ्या टोकाचा ध्वनीगर्भ हा भोपळ्यापासून बनवलेला असतो आणि त्याचा उपयोग अनुनाद निर्मितीकरिता केला जातो.
या वाद्याला सहा प्रमुख तारा असतात, ज्या मुख्यत: स्वर-ध्वनीनिर्मितीसाठी वापरल्या जातात. यासोबत आणखी तीन दुय्यम तारा देखील असतात. उर्वरित सर्व तारा या मुख्य स्वर-ध्वनी निर्माण करणाऱ्या तारांखालून त्या तारांना समांतर बसविलेल्या असतात.
उजव्या हाताच्या बोटांवर घातलेल्या दोन नख्यांचा उपयोग या वाद्याच्या सहा मुख्य तारा छेडण्यासाठी करतात आणि त्या बरोबरीने डाव्या हातामध्ये पकडलेल्या एका दंडगोलाकृती लहानशा खंडाने (ज्याला ‘कोना’ असेही संबोधले जाते) त्या तारांवर घर्षण करून वेगवेगळे स्वर आणि त्यांचे विविध स्वराकार निर्माण केले जातात.
एक अती मुलायम गानस्वर निर्माण करणे हे चित्रवीणेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. चित्रवीणा हे जगातील एक दुर्मिळ असे स्वरवाद्य आहे आणि दिवसेंदिवस या वाद्याची लोकप्रियता वाढते आहे. या प्राचीन वाद्याची लोकप्रियता वाढवण्याचे श्रेय सध्याच्या काळातील तिरुविदैमरुदूर सखा राम राव, नारायण अय्यंगार, बुदलूर कृष्णमूर्ती शास्त्री, नरसिंहम् आणि मन्नारगुडी सावित्री अम्मल इत्यादी प्रतिभावंत दिग्गज वादकांना जाते.
कालपरत्वे या तंतुवाद्याच्या रचनेमध्ये बदल केले गेले आहेत; पण त्याचे स्पष्ट दस्तऐवजीकरण झालेले मात्र आढळत नाही. चित्रवीणेचा सर्वांत जुना संदर्भ भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये दिलेला आहे. तेराव्या शतकातील पंडित शारंगदेव यांच्या संगीतरत्नाकर या ग्रंथामध्ये याच प्रकारच्या पण सात तारांनी युक्त तंतुवाद्याचा उल्लेख केलेला सापडतो.
एकंदरीत चित्रवीणा हे खूप प्राचीन काळापासून वापरले जाणारे आणि नावारूपाला आलेले एक महत्त्वाचे तंतुवाद्य आहे.
मराठी अनुवाद : शुभेंद्र मोर्डेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.