घेरण्डसंहितेत निर्दिष्ट केलेल्या आठ प्रकारच्या कुंभकांपैकी ‘केवलकुंभक’ हा शेवटचा व प्रमुख कुंभक होय. केवलकुंभक म्हणजेच केवली प्राणायाम. तो ‘पूरक-रेचका’शिवाय होतो, म्हणून त्यास ‘केवली प्राणायाम’ म्हटले आहे (हठयोगप्रदीपिका २.७३).

वसिष्ठ-संहितेत असे म्हटले आहे की, “श्वास किंवा उच्छ्वास जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक न करता सुखाने प्राणवायूचे धारण केले जाते त्याला केवलकुंभक असे म्हणतात.” (रेचनं पूरणं मुक्त्वा सुखं यद्वायुधारणम्| प्राणायामोऽयमित्युक्त स वै केवलकुम्भक:||, वसिष्ठ-संहिता  ३.२७)

पतंजलींनी योगसूत्रांत प्राणायामाचे चार प्रकार सांगितले आहेत — (१) बाह्यवृत्ति : श्वास पूर्णपणे बाहेर सोडून (रेचक करून) बाहेरच श्वासाला रोखून धरणे. (२) आभ्यन्तरवृत्ति : श्वास पूर्णपणे आत घेऊन (पूरक करून) आत श्वासाला रोखून धरणे. (३) स्तंभवृत्ति : श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरू असताना मध्ये कोठेही श्वासाला रोखून धरणे. (४) केवलकुंभक : वरील तीन प्रकारच्या प्राणायामात जरी प्राण रोखून धरला तरी एका ठराविक मर्यादेनंतर श्वास घ्यावा किंवा सोडावा लागतो. अर्थातच प्राणायामाची क्रिया ही श्वासोच्छ्वासाशी बांधील आहे. परंतु, जर योगी स्वेच्छेनुसार कितीही काळ प्राणाला आत किंवा बाहेर रोखून धरू शकत असेल तर तो कुंभक श्वासोच्छ्वासाच्या क्रियेशी बांधलेला नाही, त्यामुळे त्यास केवलकुंभक म्हणतात. बाह्य म्हणजे रेचक आणि आंतर म्हणजे पूरक या दोन्ही प्राणायामांमध्ये सजगतेची अपेक्षा न करणारा कुंभक अर्थात बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी (पातंजल योगसूत्र २.५१) हा केवलकुंभक होय.

केवलकुंभक करताना कोणत्याही आधारासनात बसून विधीप्रमाणे मूलबंध लावावा. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घ्यावा. मात्र हा केवळ पूर्ण श्वास आहे याला पूरक म्हणता येणार नाही कारण ही श्वास घेण्याची क्रिया प्रमाणबद्ध किंवा अनुशासित नाही. नंतर रेचकाच्या ऐवजी प्रमाणाविना साधा उच्छ्वास दोन्ही नाकपुड्यांनी करावा. असे हे श्वास, कुंभक व उच्छ्वास यांचे आवर्तन एकामागून एक असे इच्छित संख्येपर्यंत करावे. श्वासोच्छ्वासात डोळे मिटावे. केवलकुंभक करताना दृष्टी नासाग्र अथवा भ्रूमध्यावर व मनोधारणा कोंडलेल्या श्वासावर ठेवावी. पहिल्या दिवशी कुंभक एक ते चौसष्ट वेळा करणे अपेक्षित आहे (घेरण्डसंहिता ५.९२). त्यानंतर प्रत्येक दिवशी दर प्रहरी म्हणजे तीन तासानंतर एकदा याप्रमाणे दिवसातून आठ वेळा या कुंभकाचा अभ्यास करावा किंवा दिवसातून पहाटे, दुपारी, सायंकाळी, मध्यरात्री व रात्रीच्या चौथ्या प्रहरात (पहाटे तीन वाजता) अशा प्रकारे पाच वेळा अभ्यास करावा किंवा दिवसाचे आठ-आठ तासांचे तीन भाग कल्पून त्या प्रत्येक भागात एकदा याप्रमाणे दिवसातून तीनदा केवलकुंभकाचा अभ्यास करावा (घेरण्डसंहिता  ५.९३-९४).

पूर्ण केवलकुंभक साधेपर्यंत दर दिवशी केवलकुंभक करण्याचा काळ अजपा जपाच्या (श्वासाबरोबर ‘सो’ व उच्छ्वासाबरोबर ‘हम्’ मंत्राचा जाणीवपूर्वक जप) संख्येला धरून एकते पाच पटीपर्यंत वाढवीत न्यावा (घेरण्डसंहिता  ५.९५). यानंतर केवलकुंभक साधला जातो असे घेरण्ड मुनींचे मत आहे. घटावस्था प्राप्त झालेल्या योग्याने मात्र केवलकुंभक दिवसातून एकदाच करावा (योगतत्त्व उपनिषद् ६८).

थोड्या प्रमाणातील व थोड्या संख्येचा केवली प्राणायामाचा अभ्यास इतर कुंभकांचा पूर्वाभ्यास म्हणून अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा यथाशक्ती अभ्यास सर्वसाधारण साधकांनी जरूर करावा. केवलकुंभकामुळे साधकाच्या त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात आणि त्याला मनाच्या गती इतका वेग प्राप्त होतो आणि सर्व वांछित प्राप्त होते. (घेरण्डसंहिता ५.९६, हठयोगप्रदीपिका २.७४, रेचकं पूरकं मुक्त्वा कुम्भीकरणमेव य:| करोति त्रिषु कालेषु नैव तस्यास्ति दुर्लभम्||, योगत्रिशिखिब्राह्मण उपनिषद्  १०८)

केवलकुंभकामुळे आळस, मंदपणा, अतिनिद्रा, तंद्रा (सुस्ती/ग्लानी) इत्यादी दोषांचा क्षय होतो. साधकाच्या मनातील भीती, निराशा व औदासीन्य कमी होते. परिणामी साधक कृतीशील बनतो. त्याचे मन प्रफुल्लित, आत्मविश्वासयुक्त व आनंदी बनते.

केवलकुंभकाच्या साधनेमुळे साधकाची कुण्डलिनी जागृत होते.

पहा : प्राणायाम, सहित प्राणायाम.

संदर्भ :

  • देवकुळे व. ग., घेरण्डसंहिता, मे. शारदा साहित्य, पुणे, १९८५.
  • देवकुळे व. ग., हठप्रदीपिका, मे. शारदा साहित्य, पुणे.

समीक्षक : दुर्गादास सावंत