कचऱ्यातील काही घटकांचा पुन्हा वापर करणे, यालाच पुनर्वापर असे म्हणतात. पुनर्वलन अथवा पुनर्वापर ही एक प्रक्रीया, तसेच एक क्रिया-प्रक्रियांची मालिका आहे. त्यामध्ये टाकाऊ वस्तूंचे एकत्रिकरण अथवा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करून क्रमवारी लावणे, त्यानंतर नवीन उत्पादन करणे आणि हे नवीन उत्पादन ग्राहकांनी वापरणे या सर्व क्रिया-प्रक्रियांचा समावेश पुनर्वापरामध्ये होतो. अनेक उत्पादित वस्तूंचा वापर केल्यानंतर आपण त्या वस्तू टाकून देतो. त्या वस्तूंवर विशिष्ट प्रक्रिया करून पुन्हा वस्तू उत्पादन करता येते. उदा., प्लास्टिक, कागद यांसारख्या वस्तूंवर पुन्हा पुन्हा प्रक्रिया करून वेगवेगळ्या वस्तू अथवा माल तयार केला जातो. कागदाचा लगदा करून पुन्हा त्यापासून कागद अथवा पुठ्ठा किंवा बोर्ड तयार करता येतो.
फायदे ꞉ पुनर्वापराचे समाजास व पर्यावरणास पुढील फायदे होतात ꞉
- पुनर्वापर पर्यावरण संरक्षणास मदत करते ꞉ पुनर्वापर कचऱ्याची मात्रा अधिक प्रमाणात कमी करते. आपल्या जलव्यवस्थेत घन कचऱ्यामुळे विषारी रसायने मिसळली जाऊ नये म्हणून पुनर्वापर उपयुक्त ठरते. काही शहरांमध्ये पाणी पुरवठ्यात घातक रासायनिक घाण मिसळली जात असल्याचे आढळून येते. विद्युतनिर्मितीसाठी घन कचऱ्याचे ज्वलन उपयुक्त ठरू शकते; परंतु त्यामुळे हवेमध्ये कार्बन डाय-ऑक्साइडचे व इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते. त्यामुळे पुनर्वापर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी फायदेशीर ठरते.
- पुनर्वापरामुळे मर्यादित साधनसंपत्तीचे रक्षण करण्यास मदत होते ꞉ वृत्तपत्र कागद, कार्यालयीन कागद, मिश्र कागद यांच्या पुनर्वापरातून सुमारे ८.२ लक्ष झाडे वाचविले जाऊ शकतात. सोने, चांदी, तांबे इत्यादींसारखी विविध खनिजे भविष्यात संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुनर्वापर मर्यादित साधनसंपत्तीचे रक्षण करण्यास मदत करते, हे सिद्ध होते.
- पुनर्वापर ऊर्जा कार्यक्षमतेस उत्तेजन देते ꞉ ऊर्जा वापर किंवा खपत याबाबत नवीन उत्पादनापेक्षा पुनर्वापर अधिक कार्यक्षम ठरते. राष्ट्रीय स्तरावर यामुळे पुरेशा प्रमाणात ऊर्जेची बचत होण्यास मदत होते.
- पुनर्वापर अर्थव्यवस्थेच्या उभारणीस मदत करते ꞉ प्रत्येक खर्चात कपात, ऊर्जेची कार्यक्षमता, साधनसंपत्तीचे रक्षण आणि रोजगार निर्मिती यांमुळे पुनर्वापर अर्थव्यवस्थेच्या उभारणीस मदत करते. राष्ट्रीय स्तरावर किंवा देशपातळीवर केली जाणारी पुनर्वापराची प्रक्रिया अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम पडवून आणते. यामुळे नागरी प्रशासनास कचरा गोळा करण्यास मदत होते व त्यातून रोजगार निर्मितीही होते. यामध्ये नागरी शासनसंस्थेची मोठी बचत होते.
- पुनर्वापर रोजगार निर्मिती करते ꞉ टाकाऊ पदार्थांचा कचऱ्यात राखरांगोळी होऊन जमिनीत मिसळण्यापेक्षा पुनर्वापर अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करते. उदा., १० ते १०० टन घनकचरा जाळून विजनिर्मिती हे एकच रोजगार उत्पन्न करते; मात्र पुनर्वापर प्रक्रिया कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्यापासून वस्तू उत्पादन करणे इत्यादींमुळे सुमारे ३६ प्रकारच्या रोजगारांची निर्मिती करते.
- पुनर्वापर आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते ꞉ गृहउद्योगासाठी पुनर्वलन ही एक सोपी व कमी खर्चिक प्रक्रिया आहे.
अर्थशास्त्राच्या दृष्टिकोणातून काही वस्तूंच्या पुनर्वापराचे फायदे पुढील प्रमाणे ꞉
- कागदासंदर्भातील पुनर्वापराची आवश्यकता ꞉ कागदाच्या निर्मितीसाठी प्रत्येक मिनिटास १०० एकर जमिनीवरील जंगल कटाई केली जाते. त्याचा विशेष विचार न करताच कागद वापरले जाते व जंगल नष्ट केले जाते. एक झाड पूर्णपणे वाढण्यास कमीत कमी १५ ते २० वर्षे लागतात; परंतु ते तोडण्यास १० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. एका झाडापासून ७०० कागदी पिशव्यांचे उत्पादन होते; मात्र मोठ्या बाजारात त्यांचा वापर जास्तीत जास्त एक तासच केला जातो.
पेनसिल्व्हेनियाच्या अधिकृत माहितीनुसार कागदाच्या प्रत्येक टन पुनर्वापरामुळे पुढील बचती साध्य होतात ꞉ १७ झाडे २७५ सल्फरचे पौंड्स, ३५० चुनखडीचे पौंड्स, ९,००० वाफेचे पौंड्स, ६०,००० गॅलन (४.५ लिटर) पाणी, २२५ तास किलोवॅट्स वीज, ३.३ यार्ड जमिन.
- प्लास्टिकसंदर्भातील पुनर्वापराची आश्यकता ꞉ प्रत्येक तासाला सुमारे २,५०,००० प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या जातात. यांपैकी सुमारे ५० टक्के पुनर्वापर होण्यासारख्या बाटल्या फेकण्यामुळे वाया जातात. प्लास्टिकच्या बाटल्या जमिनीत पूर्णपणे पुनर्विघटनासाठी ७०० वर्षे लागतात. वापरलेले प्लास्टिक समुद्रात फेकल्यामुळे प्रत्येक वर्षी अंदाजे १० लाख सागरी प्राणी नष्ट होतात.
- काचेसंदर्भातील पुनर्वापराची आवश्यकता ꞉ काच ही पुन्हा पुन्हा तयार होणारी एक वस्तू आहे. पुनर्वापरासाठी वापर झालेल्या काचेस काच उद्योगात वेचण्यासाठी वाढती मागणी आहे; कारण वेचण केलेली किंवा पुनर्वापर झालेली काच ही ओरबाडलेल्या कच्च्या मालापासून, तयार काचेपेक्षा खूपच स्वस्त अथवा कमी खर्चिक आहे. वेचन खूपच कमी विजेचा वापर करते. त्यामुळे ऊर्जेची बचत होते, तसेच कार्बन डाय-ऑक्साइड व नायट्रोजन आक्साइड या हरितगृह वायूचे प्रमाण घटते.
काच व प्लास्टिक हे विघटनास दीर्घ कालावधी लागणारे पदार्थ आहेत; परंतु ते पूर्णपणे पुनर्वापर होणारेसुद्धा आहेत. त्यामुळे काच व प्लास्टिक उत्पादने खरेदी करणे, त्यांचा पुनर्वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
संदर्भ ꞉ Nagre, Vijay H., Environmental Economics, Kanpur, 2012.
समीक्षक ꞉ ज. फा. पाटील