विविध परिसंस्था प्रणालीच्या परस्पर संबंधांचे अध्ययन करणारी एक शाखा. यामध्ये मानवी स्वभाव, परस्पर संबंध आणि पर्यावरणीय समस्यांचे अन्वेषण करून त्यांना विविध विषयांमध्ये एकत्रित केले जाते. पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट भागाशी निगडित असलेली सभोवतालची परिस्थिती. इंग्रजी भाषेतील इन्व्हिरॉन या शब्दाचा अर्थ परिवेष्टित करणे असा होतो. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जिव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण होय. जैविक व अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते. जॉन टर्क यांच्या मते, पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर पडणारा प्रभाव यांचा अभ्यास म्हणजे पर्यावरण विज्ञान होय. पर्यावरण विज्ञान एक आंतरशाखीय विषय आहे. ज्यामध्ये भौतिक विज्ञान आणि जीव विज्ञानाचा समन्वय साधण्यात आला आहे. या विषयाचा उपयोग पर्यावरणीय आव्हानांचे आणि समस्यांचे अध्ययन करून त्यावर उपाय शोधण्यासाठी केला जातो.

पर्यावरण विज्ञानामध्ये सामान्यतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, परिसंस्था, मृत्तिका विज्ञान, भूगर्भ विज्ञान, वायुमंडळ विज्ञान, भूगोल इत्यादी विषयांचा समावेश होतो. पर्यावरण विज्ञानांतर्गत सामाजिक अध्ययन हा विषयसुद्धा अभ्यासला जातो. त्यामध्ये मानवीय आंतरसंबंध व पर्यावरणविषयक धोरणे यांचा अभ्यास केला जातो. मनुष्यास १९६० ते १९७० च्या दरम्यान पर्यावरण विज्ञानाचे महत्त्व समजले आणि जगभर हा विषय अभ्यासला जाऊ लागला. गुंतागुंतीच्या पर्यावरणीय समस्या व आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी विविध ज्ञानशाखांमधील महत्त्वपूर्ण तत्त्वांचा आणि सिद्धांताचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा, हीच या विषयाची अभ्यासवस्तू आहे. पर्यावरणीय समस्या आता लोकांच्या समस्या बनल्यामुळे पर्यावरणीय कायद्यांचा समावेशसुद्धा या विषयात करण्यात आला आहे.

पर्यावरणीय विज्ञानाचे घटक ꞉

  • वायुमंडळ विज्ञान ꞉ यामध्ये पृथ्वीच्या वायुमंडळाचे व हरितगृह वायू, वायुजनित प्रदूषके, ध्वनि प्रदूषण, पराजंबू (अल्ट्रावॉयलेट) किरणे इत्यादी बाबींचे अध्ययन केले जाते.
  • परिसंस्था ꞉ यांतर्गत सजीव आणि त्यांच्या पर्यावरणातील आंतरक्रियांचे अध्ययन केले जाते.
  • पर्यावरणीय रसायनशास्त्र ꞉ पर्यावरणातील रासायनिक बदलांचे अध्ययन यामध्ये केले जाते. कोणत्या रासायनिक प्रदूषणाचे सजीवांवर काय परिणाम होतील, याच्या आकलनासाठी पर्यावरण रसायनशास्त्र उपयोगी पडते.
  • भूगर्भ विज्ञान ꞉ यांतर्गत पृथ्वीची संरचना, जलावरण, सागरविज्ञान इत्यादी बाबींचे अध्ययन केले जाते. थोडक्यात, पर्यावरण विज्ञान हा एक आंतरशाखीय आणि व्यापक स्वरूपाचा विषय असून पर्यावरणाच्या सर्वंकष अभ्यासासाठी अत्यंत उपयोगी आहे.

समीक्षक ꞉ उमाजी नायकवडे