अन्नपूर्णादेवी : (२३ एप्रिल १९२७ – १३ ऑक्टोबर २०१८). भारतातील मैहर या वादक घराण्याच्या प्रसिद्ध स्त्री सूरबहारवादक व सतारवादक. त्यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील मैहर येथे झाला. त्यांच्या आई मदिना बेगम या गृहिणी होत्या; त्यांना संगीताची आवड होती. भारतातील निष्णात सरोद-सतारवादक व संगीतरचनाकार उ. अल्लाउद्दीनखाँ हे त्यांचे वडील होत. ते ब्रजनाथसिंह या मैहर संस्थानच्या राजांच्या दरबारी सेवेत होते. अन्नपूर्णादेवींना तीन बहिणी व प्रसिद्ध सरोदिये उ. अलीअकबरखाँ हे बंधू. अन्नपूर्णादेवी या भावंडात सर्वांत छोट्या होत्या. त्यांचा जन्म चैत्रपौर्णिमेचा असल्याने हिंदूंच्या रिवाजाप्रमाणे राजा ब्रजनाथसिंहांनी त्यांचे नाव ‘अन्नपूर्णा’ असे ठेवले व तेच पुढे रूढ झाले. अल्लाउद्दीनखाँनी त्यांचे ‘रोशनाआरा’ हेही एक नाव ठेवले.
अन्नपूर्णादेवी त्यांच्या भावंडांसोबत मौलवींकडून बंगाली व अरबी भाषा शिकत होत्या. त्यांना अल्लाउद्दीनखाँ यांनी प्रथम संगीतशिक्षणापासून दूर ठेवले होते; पण अन्नपूर्णादेवींनी केवळ श्रवणभक्तीतून आत्मसात केलेले संगीतज्ञान त्यांनी अनुभवले आणि त्यांना प्रथम सतारीची आणि नंतर सूरबहारची तालीम देण्यास सुरुवात केली. सूरबहार हे वाद्य त्यांच्या नाजूक बांध्याला पेलायला अवघड असूनही त्यांनी वडिलांच्या इच्छेला मान दिला आणि अल्लाउद्दीनखाँनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. सांझगिरी, चित्रागौरी, स्वत: तयार केलेला भगवती, देसमल्हारमधील आलाप, जोड, अती विलंबित ध्रुपद अंगाचे आलाप आणि कठीण असा खर्ज हे त्यातील विशेष होत.
प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर अल्लाउद्दीनखाँकडे आले, तेव्हा अन्नपूर्णादेवींनी वाजविलेल्या स्वरांच्या आरोहा-अवरोहातील वजन व स्पष्टता त्यांना मोहित करून गेली. तेही अल्लाउद्दीनखाँकडे सतार शिकू लागले. तेव्हा त्यांनी दोघांनाही शुद्ध कल्याण एकत्रच शिकविला. यानंतर दोन वर्षांनी रविशंकर यांचे मोठे भाऊ व प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक उदयशंकर यांनी त्या दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव अल्लाउद्दीनखाँपुढे ठेवला, तेव्हा अन्नपूर्णादेवी अवघ्या चौदा वर्षांच्या होत्या. वेगवेगळ्या धर्मामुळे या विवाहात अडचणी आल्या; पण त्या पार करून उदयशंकरांनी स्थापन केलेल्या अलमोड्याच्या ‘इंडियन कल्चरल सेंटर’ मध्ये १४ मे १९४९ रोजी हा विवाह थाटात पार पडला. त्यानंतर लवकरच त्यांच्या शुभेंद्र ह्या त्यांच्या पुत्राचा मैहरला जन्म झाला. रविशंकरांना होऊ लागलेल्या अतिज्वराच्या त्रासामुळे ते दोघे मुंबईला राहायला गेले. अन्नपूर्णादेवी रविशंकरांच्या बरोबर त्यांच्या आकाशवाणीतील नोकरीच्या ठिकाणी – लखनौला, दिल्लीला एकत्र राहत होत्या. यादरम्यान कॉन्स्टिट्यूशनल क्लब, दिल्ली येथे संगीतसभेत त्या दोघांच्या सहवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला रसिकांची आणि संगीतज्ञांची पसंती मिळाली. त्यानंतर १९५६ मध्ये कौटुंबिक कलहामुळे अन्नपूर्णादेवी मैहरला परतल्या.
कोलकात्याला स्थापन झालेल्या ‘अलिअकबर कॉलेज ऑफ म्युझिक’मध्ये अन्नपूर्णादेवी उपप्राचार्य म्हणून रुजू झाल्या. तेथील रणजी स्टेडियमवर त्यांचा वादनाचा कार्यक्रम झाला. नोकरी व काहीच वादनाचे कार्यक्रम हे करत असताना त्या निवडक शिष्यांना वादनाची तालीमही देत होत्या. पतीबरोबरचे पूर्वीचे मतभेद विसरून त्या पुन्हा रविशंकरांबरोबर दिल्लीत व मुंबईत राहू लागल्या; मात्र पुन्हा मतभेद झाले व दोघे कायमचे विभक्त राहू लागले (१९६७).
अन्नपूर्णादेवींचे जीवन अनेक चढउतार आणि विसंगतींनी भरलेले होते. एका उच्चकुलीन, कलावंत घराण्यात जन्म; अती तापट पण हळवे वडील, प्रेमळ आई असे विरोधाभास आजूबाजूला होतेच; पण मुख्य म्हणजे पती पं. रविशंकरांच्या आणि अन्नपूर्णादेवींच्या विचारसरणीत, जीवनदृष्टीत खूप अंतर होते. त्यातच त्यांचा विवाह खूप लवकर झाला होता. पं. रविशंकर बहिर्मुख, अमेरिकेतल्या झगमगाटात राहून आलेले, प्रसिद्धीसाठी उत्सुक, तर अन्नपूर्णादेवी अंतर्मुख वृत्तीच्या, अल्पसंतुष्ट भारतीय विचारसरणीच्या, कलेचा विचार करणाऱ्या होत्या. या असामान्य प्रतिभेच्या ह्या जोडप्यात विसंवाद व विच्छेद झाला; पण ह्या सुजाण कलावतीने दोघांतील स्पर्धा टाळून, अध्यापनाच्या मार्गाने आपला निष्णात शिष्यवर्ग तयार केला आणि वडिलांचा ज्ञानवारसा अखंड चालू ठेवला. विवाहविच्छेदानंतर त्यांचे वास्तव्य बहुतांशी मुंबईतच राहिले. अग्रणी मानसतज्ज्ञ व उ. अलीअकबरांचे शिष्य ऋषिकुमार पंड्या हेही अन्नपूर्णादेवींकडे वादन शिकण्यासाठी येत असत. १९८२ साली या दोघांनी विवाह केला. १९९२ साली त्यांचे पुत्र व सतारवादक शुभेंद्र यांचा अमेरिकेत अकाली मृत्यू झाला. २०१३ साली ऋषिकुमारांचेही निधन झाले. त्यांनी मैहरच्या दरबारात, रणजी स्टेडियममध्ये व अलिअकबर कॉलेजमध्ये असे मोजकेच एकल जाहीर कार्यक्रम केले. पं. रविशंकरांबरोबर कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये, झंकार म्युझिक सर्कलला, मुंबईत सांताक्रुझला व दिल्लीला वादनाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.
अन्नपूर्णादेवींना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या संगीतातील कारकीर्दीच्या सन्मानार्थ १९७७ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. १९८८ मध्ये सूरसिंगार संसदकडून त्यांना शारंगदेव अधिछात्रवृत्ती देण्यात आली. १९९१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार; त्यांना शांतिनिकेतनतर्फे १९९८ साली ‘देशिकोत्तम’, डी.लिट. ही पदवी मिळाली. संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ती (२००५) असे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी बाह्य जगाशी फारसा संपर्क ठेवला नव्हता.
त्यांनी निवडक पण उत्तम कलाकरांचा असा शिष्यवर्ग तयार केला. त्यामध्ये प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, सतारवादक निखिल बॅनर्जी, गीतकार आणि पार्श्वगायक अमित भट्टाचार्य, सरोदवादक बसंत काब्रा व पुत्र शुभंकर ह्यांचा समावेश आहे.
त्यांचा मुंबई येथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
संदर्भ :
- बंदोपाध्याय, स्वपनकुमार, मराठी अनुवाद, झा, अपर्णा, अन्नपूर्णा, २०१५.
समीक्षक : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.