किमान मजूर एकत्र येऊन काम करण्याचे एक क्षेत्र. अनौपचारिक अर्थव्यवस्थेला असंघटित क्षेत्र असेही म्हणतात. अनौपचारिक अर्थव्यवस्था हा शब्द प्रथमत: १९७१ मध्ये ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ किथ हार्ट यांनी उत्तर घानातील वेतनी रोजगार प्राप्त न करू शकलेल्या अकुशल स्थलांतरीतांच्या अल्प उत्पन्न क्रियाकलापांचे अध्ययन करतांना उपयोगात आणला. त्यांनी वेतनी रोजगार आणि स्वयंरोजगार या क्रियाकलापांच्या आधारावर औपचारिक व अनौपचारिक या उत्पन्नसंधींमध्ये फरक स्पष्ट केला. तत्पूर्वी या संकल्पनेचा शैक्षणिक साहित्य व धोरणात्मक वर्तुळातील उल्लेख १९५० च्या दशकात डब्ल्यू. ऑर्थर लेविस यांच्या आर्थिक विकासाचे प्रारूप या पुस्तकात आढळतो. लेविस यांनी ही संकल्पना विकसनशील देशांतील रोजगारनिर्मितीची धोरणात्मक प्रक्रिया स्पष्ट करतांना आधुनिक औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या (परंपरागत क्षेत्रातील) रोजगाराचे वर्णन करण्यासाठी उपयोगात आणली होती. कालांतराने या संकल्पनेच्या विविध परिभाषा आल्या आहेत.

भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील उद्योगांसंबंधित समस्यांच्या विविध पैलूंचे अध्ययन करण्यासाठी सप्टेंबर २००४ मध्ये राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली. या आयोगाने असंघटित क्षेत्राची व्याख्या व्यवसाय आणि रोजगार या दोन पैलूंच्या अनुषंगाने केली. व्यवसाय वा उद्योगाच्या दृष्टीने विचार करता, असंघटित क्षेत्रात असे सर्वच उद्योग समाविष्ट केले जातात, ज्यांची मालकी व्यक्ती वा कुटुंबाकडे असते. जे व्यक्ती स्वामित्व किंवा भागीदारीच्या आधारे वस्तू व सेवांचे उत्पादन व विक्रीचे कार्य करतात; तसेच ज्यामध्ये १० पेक्षा कमी व्यक्ती कार्यरत असतात. हाच आयोग असंघटित वा अनौपचारिक रोजगाराची व्याख्या करताना असे म्हणतो की, अनौपचारिक श्रमिकांमध्ये असे सर्वच श्रमिक समाविष्ट केले जातात, जे असंघटित उद्योग व कुटुंबामध्ये कार्यरत आहेत; तथापि या अंतर्गत असे श्रमिक समाविष्ट केले जात नाहीत, ज्यांना सामाजिक सुरक्षिततेचे लाभ प्राप्त होतात. याशिवाय असे श्रमिक समाविष्ट केले जातात, जे औपचारिक वा संघटित क्षेत्रात रोजगार प्राप्त आहेत; परंतु त्यांच्या नियोक्त्याद्वारे त्यांना रोजगार वा सामाजिक सुरक्षिततेपासून वंचित ठेवले जाते. ही परिभाषा प्रासंगिक वा कंत्राटी श्रमिकांना संघटित वा औपचारिक श्रमिकांच्या श्रेणीतून बाहेर करून संघटित क्षेत्रातील रोजगाराला अधिक वास्तविक स्वरूपात प्रस्तुत करते.

अनौपचारिक अर्थव्यवस्था या संकल्पनेचा मागील सुमारे २५ वर्षांमध्ये विविध अंगांनी विकास झाला. अनौपचारिकतेचे विविध पैलू व्यवसायासोबत रोजगाराच्या अनुषंगानेदेखील विचारात घेण्यात आले. विशेषत: संख्याशास्त्रज्ञांनी अधिकृत श्रमशक्ती व अनौपचारिकतेशी संबंधित इतर माहिती सुधारित करण्यासाठी त्याची सांख्यिकीय व्याख्या व मापनावर लक्ष्य केंद्रित केले. आंतरराष्ट्रीय श्रम कार्यालयाच्या अनौपचारिक क्षेत्र सांख्यिकीवरील तज्ज्ञ गटाने (दिल्ली गट) अनौपचारिक संकल्पनेची व्याप्ती विस्तारून त्यात विशिष्ट प्रकारच्या अनौपचारिक रोजगाराचा अंतर्भाव केला. अनौपचारिक क्षेत्राच्या विस्तारित परिभाषेत व्यावसायिक वैशिष्ट्यांसोबतच अनौपचारिक वा असंघटित व्यवसायाच्या आतील व बाहेरील दोन्ही प्रकारच्या अनौपचारिक रोजगाराला समाविष्ट करण्यात आले आहे. ही विस्तारित परिभाषा २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेने आणि २००३ मध्ये श्रम सांख्यिकीशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेने स्वीकारली होती.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या केन्या अहवालानुसार अनौपचारिक क्षेत्राची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत :

  • सहज प्रवेश.
  • देशीय संसाधनांवरील विश्वसनियता.
  • उद्योग वा उपक्रमांची कौटुंबिक मालकी.
  • लहान प्रमाणात क्रियान्वयन.
  • श्रमप्रधान व अंगिकृत तंत्रज्ञान.
  • औपचारिक शालेय व्यवस्थेबाहेर संपादित कौशल्ये.
  • अनियमित आणि स्पर्धात्मक बाजार.

कॅस्टेल व पोर्ट्स यांनी नमुद केल्याप्रमाणे, अनौपचारिक क्षेत्रातील क्रियाकलाप हे सामाजिक, राजकीय आणि संविधानिक संस्थांच्या नियमन चौकटीबाहेर असतात. यावरून अनौपचारिक अर्थव्यवस्था एकंदर अर्थव्यवस्थेचा असा भाग आहे की, ज्यामध्ये संपूर्णत: असंघटित क्षेत्रातील उद्योग, कृषी, स्वयंरोजगार, ग्रामीण श्रमिक, कारागीर, विविध व्यावसायिक कर्मचारी आणि अनियमित स्वरूपाचे कार्य करणारे सर्वच व्यक्ती समाविष्ट होतात. हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र शासकीय करार रोपण नियमन व नियंत्रण कक्षांच्या बाहेर असते. या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थेतील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारातून काळ्या पैशांची निर्मिती होते आणि तेदेखील अनौपचारिक अर्थव्यवस्थेचाच भाग ठरू शकते. याशिवाय औपचारिक क्षेत्रातील नियमित श्रमिकांप्रमाणे मिळणारी नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षिततेचा अनौपचारिक क्षेत्रामध्ये अभाव असतो.

अनौपचारिक अर्थव्यवस्थेसंदर्भात सांख्यिकीय अनुमान : असंघटित क्षेत्राच्या स्वरूपासंदर्भात अचूक सांख्यिकीय अनुमान करणे अशक्यप्राय बाब आहे; तथापि विविध नमुना पाहणीच्या आधारे ढोबळ अनुमान उपलब्ध आहे. एकूण रोजगारामधून संघटित क्षेत्रात कार्यरत श्रमिकांची संख्या वजा करून अवशेषाच्या स्वरूपात असंघटित क्षेत्रातील रोजगार प्राप्त केला जातो. भारतात अनुमानाची ही पद्धत रोजगार प्रशिक्षणाचे महानिदेशक यांद्वारे उपयोगात आणली जाते. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अनुमानानुसार जागतिक स्तरावर, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये, अनौपचारिक क्षेत्राचे प्रमाण खूप मोठे आहे. जसे उत्तर आफ्रिकेमध्ये एकूण रोजगाराच्या ४८ टक्के रोजगार कृषितर अनौपचारिक रोजगाराने व्यापला आहे. हेच प्रमाण लॅटीन अमेरिकेमध्ये ५१ टक्के, आशियामध्ये ६५ टक्के आणि उपसहारा आफ्रिकेमध्ये ७२ टक्के आहे. त्यात कृषिरोजगार समाविष्ट केला, तर भारत व काही उपसाहारा आफ्रिकन देशांमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर जाईल. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये मात्र हे प्रमाण सुमारे १५ टक्के आहे. दक्षिण आशियातील भारत व नेपाळ या देशांमध्ये श्रमिकांची अनौपचारिक प्रमाण सर्वाधिक (९०.७) आहे. त्या तुलनेत बांग्लादेश (४८.९), श्रीलंका (६०.६) आणि पाकिस्तान (७७.६) यांची स्थिती बरी आहे. ‘वुमन अँड मेन इन द इन्फॉर्मल इकॉनॉमी ꞉ ए स्टॅटिस्टिकल पिक्चर’ या अहवालानुसार आशियामधील प्रशांत क्षेत्रातील सुमारे १.३ कोटी लोक (रोजगारप्राप्त एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६८.२ टक्के) अनौपचारिक क्षेत्रात गुंतले होते. शिवाय अनौपचारिक रोजगारामध्ये १५ ते २४ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण ९८.३ टक्के होते, जे २५ पेक्षा अधिक वयोगटातील प्रौढ श्रमिक प्रमाणाच्या तुलनेत ६७.१ टक्के म्हणजे जास्त आहे (२०१८).

उच्च शिक्षण धारकांमध्ये अनौपचारिक रोजगाराचे प्रमाण ३१ टक्के, तर प्राथमिक स्तरीय शिक्षण धारकांमध्ये ९० टक्के दिसून आले. यावरून शिक्षणाचा स्तर उच्च असेल, तर औपचारिक रोजगारासाठी संधीदेखील उच्च असल्याचे आढळते. अहवालानुसार आशियातील प्रशांत क्षेत्रामध्ये अनौपचारिक रोजगाराचे प्रमाण ग्रामीण क्षेत्रात ८५.२ टक्के, तर शहरी क्षेत्रात ४७.४ टक्के होते. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रनिहाय स्थिती विचारात घेता, कृषी क्षेत्रामध्ये एकूण रोजगारांपैकी अनौपचारिक रोजगाराचे प्रमाण ९४.७ टक्के, औद्योगिक क्षेत्रात ६८.८ टक्के आणि सेवाक्षेत्रात ५४.१ टक्के होते (२०१८).

भारतातील अनौपचारिक क्षेत्र आणि अनौपचारिक श्रमिकांचे स्वरूप ꞉ भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे असंघटित क्षेत्रातील श्रमशक्तीला पुढील चार गटांतर्गत वर्गीकृत करण्यात आले आहे ꞉

  • (१) व्यवसाय गट ꞉ या श्रेणीमध्ये सीमांत आणि लघु शेतकरी, भूमीहीन शेतमजुर, बटाईदार, मासे पकडणारे, पशुपालक, विडी कारखान्यातील कामगार, विटभट्टीवरील कामगार, दगड खाणीतील कामगार, लेबलिंग व पॅकिंग करणारे कामगार, बांधकाम व पायाभूत संरचनामध्ये कार्यरत श्रमिक, चामडे कमाविणारे कारागीर, विणकर, तेल घाणीमधील कामगार इत्यादी कामगार येतात.
  • (२) रोजगार गट ꞉ या श्रेणीमध्ये शेतमजुर, वेठबिगार श्रमिक, प्रवाशी श्रमिक, रोजंदारीवरील श्रमिक इत्यादी कामगार येतात.
  • (३) विशेष व्यथित श्रेणी गट ꞉ या श्रेणीमध्ये ताडी बनविणारे, सफाई कामगार, डोक्यावरून ओझे वाहणारे कामगार, पशुचलित वाहन चालविणारे कामगार इत्यादी या गटात मोडतात.
  • (४) सेवा श्रेणी गट ꞉ या श्रेणीमध्ये आया, घरगुती कामगार, मासे पकडणारे, नाव्ही, भाजी व फळ विक्रेते, वार्तापत्र विक्रेते इत्यादी कामगार येतात.

भारतातील अनौपचारिक अर्थव्यवस्थेचे अनुमान १९९९-२००० पर्यंत विविध शासकीय संस्थाद्वारे नोंदविलेल्या संघटित रोजगार माहितीवर आधारित होते. ज्या अंतर्गत एकूण रोजगारीमधून संघटित क्षेत्रातील रोजगार वजा करून अवशेषाच्या स्वरूपात असंघटित क्षेत्राचे अनुमान केले जाते; तथापि १९९९-२००० पासून राष्ट्रीय नमुना पाहणीच्या रोजगार व बेरोजगारीशी संबंधित अहवालाच्या आधारे असंघटित क्षेत्राच्या आकाराचा प्रत्यक्ष अनुमान लावला जातो. भारतातील अनौपचारिक क्षेत्रांतर्गत श्रमिकांचे ग्रामीण व शहरी, तसेच लिंगनिहाय प्रमाण विचारात घेता ग्रामीण क्षेत्रात जास्त, तर शहरी क्षेत्रात कमी श्रमिक असंघटित क्षेत्रात कार्यरत असून दोन्ही क्षेत्रांत पुरुषांपेक्षा स्त्रीयांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. भारतातील बहुतांश श्रमिक अनौपचारिक क्षेत्रात कार्यरत असले, तरी या क्षेत्राची उत्पादकता आणि तेथे श्रमिकांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे.

जागतिकीकरण आणि अनौपचारिक रोजगार ꞉ उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणांमुळे श्रमिकांच्या अनौपचारिकीकरणाच्या प्रक्रियेला बळ मिळत आहे. जागतिकीकरणाच्या युगात भांडवलदार अधिकाधिक लाभाच्या लालसेने उत्पादनाच्या नवनवीन पद्धती व तंत्रे आत्मसात करीत आहेत. अधिकाधिक कंपन्या, निम्न श्रमव्यय असणाऱ्या देशांकडे स्थानांतरीत होऊन तेथे अनौपचारिक रोजगार व्यवस्थांना प्राधान्य देत आहेत. या सर्वांच्या परिणामास्तव अल्प व अकुशल कारागीर, तसेच छोट्या व्यावसायिकांची सौदाशक्ती कमकुवत होऊन त्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटाशी सामना करतांना कामगारांना कामावरून बंद करणे, हे कंपन्यांचे धोरण बनले आहे आणि अशा कामगारांकरिता अनौपचारिक क्षेत्र हे अंतिम वा निर्वानीचे क्षेत्र ठरते. याशिवाय प्रासंगिक आणि कंत्राटी स्वरूपाच्या रोजगार पद्धतीत वाढ होत असल्याने एका बाजूला अनौपचारिक क्षेत्र संकुचन पावत असतांना दुसरीकडे मात्र अनौपचारिक रोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढतांना दिसत आहे.

समीक्षक : मनिषा कर्णे