प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑर्सन वेल्स यांनी केले आहे. तर प्रकाशचित्रण ग्रेग टोलंड यांचे आहे. या चित्रपटाची पटकथा वेल्स यांनी स्वतः हर्मन मॅन्कीविझ यांच्या सहकार्याने लिहिली. वेगळी वाट चोखाळणारा महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून आजही या चित्रपटाकडे आदराने पाहिले जाते. जगभरातल्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत सिटीझन केन सातत्याने वरच्या क्रमांकावर राहिलेला दिसून येतो. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने २००७ साली १०० उत्कृष्ट चित्रपटांची यादी अद्ययावत केली होती. त्यात या चित्रपटाला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला.
सामान्य परिस्थितीतून असामान्य उंचीवर पोहोचलेल्या अहंमन्य, हेकेखोर चार्ल्स फॉस्टर केनची ही कथा आहे. प्रत्येक गोष्टीवर त्याला मालकी हक्क प्रस्थापित करायचा असतो. मग त्या जगभरातील संग्रहालयातील कलात्मक वस्तू असोत वा आयुष्यातील हाडामासाची माणसे. त्याच्या या स्वभावामुळे जवळची माणसे त्याच्यापासून हळूहळू दुरावत जातात आणि आयुष्याच्या अखेरीस तो एकाकी पडतो. ४९ हजार एकरात टेकडीवर बांधलेल्या भव्य प्रासादतुल्य ‘झनाडू’ या बंगल्यात चार्ल्स फॉस्टर केनचा मृत्यू होतो. चित्रपटाची ही सुरुवातच कुतूहल निर्माण करते. हा गर्भश्रीमंत उद्योगपती मरणसमयी एक शब्द उच्चारतो. ‘रोझबड’.
अमेरिकाभर पसरलेल्या वर्तमानपत्रांच्या साखळीच्या या मालकाचा मृत्यू ही जगभरात खळबळजनक बातमी होते. ‘रोझबड’ शब्दाचा अर्थ कळला, तर त्याच्या आयुष्याचे योग्य मूल्यमापन होऊ शकेल असे त्याच्या आयुष्यावर चित्रफीत करणाऱ्या संपादकांना वाटते आणि त्या गूढ शब्दाचा अर्थ उकलण्याची जबाबदारी थॉम्सन नावाच्या बातमीदारावर येते. यासाठी तो केनच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधतो. या मुलाखतीतून पूर्वावलोकनाच्या तंत्राने चित्रपटाची कथा उलगडत जाते. यातून थॉम्सनला “रोझबड” विषयी माहिती मिळाली नाही, तरी केनचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उभा राहतो. थॉम्सनसाठी आणि जगासाठी “रोझबड” हा शब्द कायम रहस्य राहणार असे वाटत असताना दिग्दर्शक प्रेक्षकांना विश्वासात घेऊन ते रहस्य उलगडून दाखवतो. सुख आणि समाधान कशात असते? यशस्वी जीवन म्हणजे काय? अशासारख्या चिरंतन प्रश्नांचा शोध वेल्स यांनी या चित्रपटात घेतला आहे.
हा चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा दिग्दर्शक ऑर्सन वेल्स पंचवीस वर्षांचे होते. प्रत्यक्ष चित्रपट दिग्दर्शनाचा कोणताच अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता; परंतु त्यांनी ‘मर्क्युरी थिएटर’ या स्वतःच्या नाट्यसंस्थेसाठी ब्रॉडवेवर सादर केलेल्या नाटकांबरोबरच रेडिओसाठी निर्माण केलेल्या लक्षणीय नाटकांमुळे त्यांच्यातील चमक हॉलिवूड निर्मात्यांच्या लक्षात आली. चाकोरीबाहेरचे करण्याच्या ध्यासातून वेल्स यांनी ‘आरकेओ पिक्चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेकडून कराराद्वारे या चित्रपटाच्या निर्मितीचे सर्वाधिकार घेतले होते. त्यानुसार त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांबरोबरच कलात्मक बाबतीतही संस्थेला ढवळाढवळ करू दिली नाही. त्याकाळी असा करार करणे नाविन्यपूर्ण होते.
सिटीझन केन प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सुरुवातीला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याला चित्रपटबाह्य कारणेही होती. चित्रपटातील घटना आणि तत्कालीन वृत्तपत्र व्यवसायातील बडी असामी विलियम्स रेनडॉल्फ हर्स्ट याच्या जीवनातील काही घटना यात धूसर साधर्म्य होत. या चित्रपटात आपली बदनामी झाली असेल असे गृहीत धरून, हर्स्ट यांच्या मालकीच्या वृत्तपत्रात सिटीझन केनच्या जाहिराती नाकारण्यात आल्या. चित्रपटाच्या प्रती नष्ट करण्यासाठी खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्याचा परिणाम तिकीटबारीवर झाला; परंतु समीक्षकांनी आणि जाणकारांनी चित्रपटाचे भरघोस स्वागत केले. विशेषतः १९५६ साली आंद्रे बाझँ या प्रसिद्ध फ्रेंच समीक्षकाने सिटीझन केनचे योग्य मूल्यमापन करून त्याला जागतिक पातळीवर नेले.
ऑर्सन वेल्स यांनी या चित्रपटासाठी चार आघाड्या सांभाळल्या. चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच, त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच पण तारुण्यापासून वार्धक्यापर्यंत विकसित होत जाणारी केनची व्यक्तिरेखाही समर्थपणे उभी केली. लेखनातही त्यांचा सहभाग होता. रंगभूमीवर आणि रेडियोच्या नाटकात वेल्स यांच्याबरोबर पूर्वीपासून काम करणाऱ्या नटांना त्यांनी या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटात ऑर्सन वेल्स यांनी प्रचलित संकेत धुडकावून काही धाडसी प्रयोग केले. पारंपरिक हॉलिवुड चित्रपटात कथा साधेपणाने आणि एकरेषीय पद्धतीने सांगितली जात असे. पण या चित्रपटाची कथा सुरवातीला येणारे वार्तापट (न्यूजरील), विविध पात्रांच्या मुलाखती आणि पूर्वावलोकन यांच्या तुकड्या-तुकड्यांतून अरेषीय पद्धतीने पुढे जाते.
पारंपरिक नेपथ्यात प्रकाशयोजनेसाठी आणि कॅमेऱ्यासाठी नेपथ्यरचनेची वरची बाजू उघडी असे; परंतु केनचे प्रभावी व्यक्तिमत्त्व ठसवण्यासाठी त्याची बरीच दृश्ये लो-अँगल (कॅमेरा अशाप्रकारे खालून वरच्या दिशेने आणणे की ज्यामुळे प्रतिमा उंच व प्रभावी भासतात) घेतलेली आहेत. त्यासाठी हेतुपुरस्सर छताची उभारणी केली गेली. हे छत आपल्याला वास्तवतेची जाणीव करून देते. कॅमेऱ्याचे नाविन्यपूर्ण कोन आणि प्रसंगी चेहरा अंधारात असतानासुद्धा बोलणारी पात्रे यामुळे तत्कालीन चित्रपटात हा चित्रपट वेगळा उठून दिसला.
या चित्रपटासाठी ग्रेग टोलंड यांनी ‘डीप फोकस’ (यात चित्रचौकटीत अग्रभागी असलेल्या मुख्य व्यक्तिरेखेपासून पार्श्वभूमीवर असलेल्या तपशीलापर्यंत सर्वकाही स्पष्ट दिसते) या तंत्राने केलेले प्रकाशचित्रण वाखाणले गेले. चित्रपटातील काही उदाहरणादाखल दृश्ये म्हणजे, लहानग्या केनला बोर्डिंगमधून घेऊन जाण्यासाठी आलेल्या थॅचरसाहेबांबरोबर केनचे आई-वडील चर्चा करत असताना दाराच्या चौकटीतून दूरवर बर्फात खेळणारा केन स्पष्ट दिसतो. त्यांच्यातले प्रत्यक्ष अंतर प्रेक्षकांना त्यांच्या भावस्थितीतल्या अंतराचीही कल्पना देऊन जाते; राजकीय मेळाव्यात खोल रंगमंचकावर तावातावाने भाषण देत असलेल्या केनला वरच्या बाल्कनीतून पाहणारा त्याचा राजकीय स्पर्धक इत्यादी दृश्ये.
या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम नट यांसहित एकूण ९ विभागात ऑस्करसाठी नामांकने मिळाली. पैकी सर्वोत्तम लेखनाचा एक ऑस्कर पुरस्कार सिटीझन केनला मिळाला. त्यानंतर ऑर्सन वेल्स यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले; मात्र निर्मात्यांनी दिलेले मर्यादित स्वातंत्र्य यामुळे त्यांच्या दिग्दर्शनालाही मर्यादा पडल्या आणि सिटीझन केननंतरचे त्यांचे चित्रपट फारसे गाजले नाहीत. पुढच्या काळात ते मोठे दिग्दर्शक मानले गेले आणि त्यांच्या अनेक चित्रपटांना आज योग्य तो मान दिला जातो. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या आणि एकंदर कारकीर्दीतील अत्युच्च समजल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने ऑर्सन वेल्स यांना १९७५ साली गौरविण्यात आले.
समीक्षक : गणेश मतकरी