एखाद्या नैसर्गिक वा कृत्रिम व्यक्तीच्या नावे कायदेशीरपणे नोंदल्या गेलेल्या कलाकृतीचा, उत्पादनाचा वा संकल्पनेचा अनधिकृतपणे केलेला वापर किंवा पुनर्निर्मिती म्हणजे पायरसी. चित्र, पुस्तक, तंत्रज्ञान, संकल्पना या गोष्टींच्या बाबतीत पायरसीचे तंत्र त्यात्या गोष्टींनुसार निरनिराळे असते. चित्रपटाच्या बाबतीत, चित्रकर्त्यांना आणि संबंधित कलाकारांना व तंत्रज्ञांना कोणताही मोबदला न देता चित्रपटाची अवैध प्रत काढून प्रसारित करणे, तिचा उपभोग घेणे किंवा तिचा विक्रय करणे असे पायरसीचे स्वरूप आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत पायरसीचे प्रकारही वाढत आणि बदलत गेलेले दिसतात. पहिला प्रकार म्हणजे चित्रपट पाहत असताना चित्रपटगृहामध्ये चोरून चित्रीकरण करून चित्रपट मुद्रित करून घेणे. या प्रकारात चित्रीकरणाचा दर्जा सुमार असतो. कॅमेरा हलत असतो. दृश्ये धूसर असतात. दुसरा प्रकार म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच्या खेळामध्ये चोरून चित्रीकरण करून चित्रपट मुद्रित करून घेणे. यातही चित्रीकरणाचा दर्जा सुमारच असतो; मात्र प्रदर्शनापूर्वीच चौर्यप्रत उपलब्ध झाल्यामुळे चित्रकर्त्यांच्या आर्थिक नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. तिसरा आणि अलीकडे वाढलेला प्रकार म्हणजे थेट चित्रनिर्मात्यांच्या संगणकप्रणालींमध्ये बेकायदेशीर रीत्या घुसून (हॅकिंग) तेथून चित्रपटाची प्रत लांबविणे. या डिजिटल चोरीचा फायदा असा, की चित्रपटाची अंतिम आणि अधिकृत प्रत हाती आल्यामुळे तिचा दर्जा तोडीस तोड असतो. या तिन्ही प्रकारे उपलब्ध झालेल्या चित्रपटाची प्रत महाजालकावर (इंटरनेटवर) सहज उपलब्ध असू शकते. ती उतरवून घेणे आणि पाहणे, प्रसारित करणे किंवा डीव्हीडीसारख्या माध्यमांत भरून तिची बेकायदेशीर विक्री करणे हा पायरसीचा चौथा, अंतिम आणि सर्वांत घातक प्रकार होय.

या चौर्यप्रकारांना सतत अद्ययावत होणार्‍या तंत्रज्ञानाची जोड असते. टॉरेन्ट या प्रकारामध्ये एकाच चित्रपटाची प्रत अनेक ठिकाणच्या एकमेकांना जोडलेल्या जाळ्यातील संगणकांवर उपलब्ध असते व त्या चित्रपटाची टॉरेन्ट फाइल मिळाल्यावर या जाळ्यातील त्यात्या वेळी चालू असलेल्या संगणकांतील चित्रपटाचे तुकडेतुकडे उतरवून घेता येतात. तुकड्यातुकड्यांनीच संपूर्ण चित्रपट उतरवून घेतला जातो. या तंत्रात कोणत्याही एका संगणकाकडून पूर्ण फाइल हस्तांतरण होत नाही. चित्रफिती चढविण्यासाठी, पाहण्यासाठी व उतरवून घेण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे यू ट्यूबसारखे संकेतस्थळ, निरनिराळ्या फाइल्सचे सामायिकरण (शेअरिंग) करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारी अन्य संकेतस्थळे, ‘शेअर इटʼ ‍उपयोजकसारखे (ॲप) चुटकीसरशी एका भ्रमणध्वनीमधून (मोबाइल) दुसऱ्या अनेक भ्रमणध्वनींमध्ये बिनतारी चित्रपट देवघेव करू देणारे अनेक पर्याय प्रत्येक वेळी उपलब्ध होत असतात.

पायरसी ही सकृद्दर्शनी कोणत्याही समूर्त वस्तूच्या अनुपस्थितीमुळे जरी थेट वस्तूच्या चोरीइतकी ढळढळीत चोरी वाटत नसली, तरी चित्रपटनिर्मात्यांच्या व कलावंतांच्या प्रताधिकारांवर घातलेला तो घालाच असतो आणि त्यामुळे इतर कोणत्याही चोरीइतकी तीही गंभीर चोरीच असते. ती थांबवणे हे कायदा आणि व्यवसाय यांच्यासमोर मोठे आव्हान ठरले आहे. त्यामुळे अशा चौर्यव्यवहारांना कायद्याची अंमलबजावणी करून आळा घालणे गरजेचे आहे.

उपभोक्त्याला जरी आपली एकेका चौर्यप्रतीची चोरी नगण्य आणि निरुपद्रवी वाटत असली, तरीही तिचा चित्रपट उद्योगावर होणारा परिणाम मोठाच असतो. चित्रपट पाहायला लोक चित्रपटगृहांत न फिरकल्यामुळे निर्मात्यांचे व वितरकांचे थेट नुकसान तर होतेच; पण अशा प्रकारचा व्यवहार बोकाळल्यामुळे व गृहीत धरला गेल्यामुळे चित्रपटांमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार कचरतात. एकूण चित्रपटव्यवसायात खेळणारे भांडवल, पर्यायाने अनेक कलावंत-तंत्रज्ञांना मिळू शकणारा व्यवसाय आणि उत्पन्न यांतही निश्चित घट होत जाते. मोठ्या गुंतवणूकदारांचे पाठबळ नसलेल्या प्रायोगिक आणि चाकोरीबाहेरच्या चित्रकर्त्यांनाही या वाढत्या जोखमीचा फटका बसू शकतो आणि पर्यायाने चित्रपटकलेचे व प्रेक्षकांचेही नुकसान होऊ शकते.

पायरसीला एक सकारात्मक बाजूही आहे. लोकांना एरवी उपलब्ध नसणारे, देशविदेशांच्या सीमा ओलांडून जाणारे, बाजाराच्या मर्यादांमुळे चित्रपटगृहांतून पाहायला न मिळणारे, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या बंधनांमुळे प्रदर्शित न होऊ शकलेले असे अनेक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात आणि प्रेक्षकांची दृश्यात्मक समज उंचावण्यात या अपप्रकाराचा मोठाच हातभार आहे, असे काही चित्रपटजाणकारांचे मत आहे. चित्रपटगृहाच्या बाहेर चित्रपट येऊन तो भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप, टॅब यांसारख्या साधनांवर पोहोचला आणि तो पुन्हापुन्हा पाहण्याचे व त्याबद्दलची जाण वाढवण्याचे मार्ग खुले झाले, यालाही अप्रत्यक्षपणे पायरसी कारणीभूत ठरल्याचे मतही मांडले जाते.

समीक्षक – गणेश मतकरी

प्रतिक्रिया व्यक्त करा