लुबेस्की, एमान्वेल : (३० नोव्हेंबर १९६४). प्रसिद्ध मेक्सिकन चलचित्रणकार (प्रकाशचित्रणकार), चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता. त्यांचा जन्म मेक्सिको सिटी येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील मूनी लुबेस्की हे ही अभिनेता आणि निर्माता म्हणून चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको’ येथे शिकत असताना लुबेस्की यांना छायाचित्रणाची आवड निर्माण झाली. मेक्सिकोमधील ‘नॅशनल स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स’मधून त्यांनी प्रकाशचित्रणाविषयीचे शिक्षण घेतले. तेथेच त्यांची ओळख प्रसिद्ध मेक्सिकन चित्रपट निर्माता अल्फान्सो कोरॉन यांच्याशी झाली. पुढे त्यांच्यासोबत लुबेस्की यांनी अनेक चित्रपट प्रकल्पांवर काम केले.

सुरुवातीला लुबेस्की यांनी अनेक लघुपट चित्रीत केले. सोबत इतिहास विषयाचा अभ्यासही केला. ८० च्या दशकामध्ये त्यांनी मेक्सिकन दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे प्रकाशचित्रण करण्यास सुरुवात केली.  १९८९ मध्ये लुबेस्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन कमिनो लार्गो आ तिहुवाना या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी इतर चित्रपटांची निर्मिती करणे सुरू केले. १९९१ मध्ये ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको’ मध्ये शिकत असताना लुईस इस्रादासोबत त्यांनी प्रकाशचित्रणकार म्हणून पहिल्यांदा बंदीदोस या चित्रपटासाठी काम केले. त्याचवर्षी अल्फान्सो कोरॉनसोबत त्यांनी सोलो कॉन तू परेखा या चित्रपटासाठी काम केले. १९९२ मध्ये प्रकाशचित्रण केलेल्या लाईक वॉटर फॉर चॉकलेट या चित्रपटासाठी लुबेस्कींना टोरोंटो चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम प्रकाशचित्रणाचा ‘मेक्सिकन एरियल पुरस्कार’ मिळाला. १९९४ मध्ये लुबेस्कींनी बेन स्टीलरसोबत रिऍलिटी बाईट्स हा पहिला इंग्रजी चित्रपट केला. १९९५ मध्ये कोरॉनसोबत हिरव्या रंगाच्या छटेचा जास्त वापर करून अ वॉक इन द क्लाऊड्स या चित्रपटाचे छायाचित्रण केले.

नैसर्गिक प्रकाशाचा वापर, प्रदीर्घ दृश्यचित्रण, विलोभनीय दृश्ये, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसाठी लुबेस्की यांचे चित्रपट नेहमीच वेगळे ठरत आले आहेत. एमान्वेल लुबेस्की हे आजच्या घडीतील सर्वोत्तम प्रकाशचित्रणकारांपैकी एक मानले जातात.

१९९५ मध्ये लुबेस्की यांनी टीम बर्टन यांच्यासोबत स्लीपी हॉलो हा चित्रपट केला. हा भयपट असल्याने प्रकाशचित्रणामध्ये एकरंगी प्रकाशयोजना (monochromatic light scheme), आद्यैतिहासिक (primeval) पार्श्वभूमी यांचा वापर करण्यात आला होता. मोहम्मद अली या मुष्टियोद्ध्यावर आधारित अली या चित्रपटासाठी लुबेस्कींनी मोहम्मद अलींचे प्रकाशचित्रण वास्तवदर्शी वाटावे म्हणून मुक्त हस्त चित्रण (Hand held camera) आणि स्थिरचित्रण (Steady camera) या दोन्ही टोकाच्या पद्धतींचा वापर केला. द कॅट इन द हॅट (२००३) या चित्रपटात त्यांनी गडद गुलाबी, जांभळा, हिरवा या रंगाच्या छटा अधिक असणारे आभासी, आत्तापर्यंतच्या कामांपेक्षा संपूर्णतः वेगळे दृश्यविश्व उभारले.

लुबेस्कींचा अल्फान्सो कोरॉनसोबतचा आणखी एक चित्रपट चिल्ड्रन ऑफ मेन (२००६) हा होय. या थरारपटातील सलगपणे चित्रित केलेला ‘रोडसाईड एम्बश’ हा प्रदीर्घ दृश्याचा प्रसंग प्रसिद्ध आहे. २०१३ मधील कोरॉनसोबत केलेला ग्रॅव्हीटी हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड मानला जातो. अवकाशात घडणारा संघर्ष हे या थरारपटाचे मुख्य आकर्षण होते. अंतराळामध्ये असलेला प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण यांचा अभाव, सर्व वस्तूंची अनाकलनीय हालचाल, अंतराळयानाचे अवशेष, समस्या याचे अचूक प्रकाशचित्रण यामध्ये दिसून येते. यासाठी त्यांनी रंगीत पडद्याऐवजी एलईडी पडद्याचा वापर केला आहे. एलईडी पडद्यातून प्रकाश प्रक्षेपित करून अभिनेत्यांच्या संभाव्य हालचाली चित्रित करून घेण्यात आल्या आणि त्यानुसार इतर सर्व वस्तूंची हालचाल ठरवली गेली. अंतराळाचा अवकाश लक्षात यावा म्हणून या चित्रपटासाठी २२ इंची विस्तृतकोन भिंगाचा वापर केला गेला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून अंतराळातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला.

२०१४ मध्ये अलेक्सांद्रो इनारीत्यूसोबत बर्डमॅन : द अनएक्सपेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नोरन्स हा चित्रपट लुबेस्कींनी केला. या चित्रपटाचे चित्रीकरण हे बहुतांशी एका नाट्यगृहात झालेले आहे. चित्रपट एकसलग घडतो आहे, अशा प्रकारचा आभास निर्माण करणारी कॅमेऱ्याची विशिष्ट मांडणी, अभ्यासपूर्ण प्रकाश संयोजन यात दिसून येते. तसेच यात प्रदीर्घ दृश्ये चित्रित केली आहेत, तर काही प्रसंगांमध्ये पात्राची दृष्टी प्रेक्षकाला प्राप्त व्हावी यासाठी प्रथमपुरुषी दृष्टीकोनातून चित्रीकरणाचा प्रयोग करण्यात आला आहे. २०१५ मध्ये पुन्हा अलेक्सांद्रो इनारीत्यूसोबत मुलाच्या हत्येचा बदला घेणाऱ्या वाटाड्याची कथा सांगणारा द रिव्हेनंट हा साहसी थरारपट त्यांच्या कारकीर्दीतील सर्वांत धाडसी प्रकल्प मानला जातो. या थरारपटाचे चित्रीकरण कॅनडा आणि अर्जेंटिना या देशांतील बर्फाच्छादित प्रदेशात केले गेले. नैसर्गिक आपत्ती, पाण्याचे असंगत आचरण, बर्फाच्छादित प्रदेश, अतिशय कमी तापमान अशा अनेक समस्यांतून मार्ग काढत याचे चित्रीकरण करण्यात आले. सूर्यप्रकाशाची कमतरता, प्रतिकूल हवामान आणि दिवसातील फक्त काही तासच वेळ चित्रीकरणासाठी मिळत असताना त्यांनी चित्रीकरणासाठी फक्त नैसर्गिक प्रकाशाचा वापर केला. चित्रित होणाऱ्या घटनांची फार दुरून, विशिष्ट उंचीवरून आणि कलाकार, घटनांच्या मागून दृश्य टिपणे हे त्यांचे कसब यातून दिसून आले. त्यामुळे या चित्रपटातून निसर्गाची भव्यता प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

२००६ मध्ये चिल्ड्रन ऑफ मेनसाठी बाफ्टाचा सर्वोत्तम प्रकाशचित्रणाचा पुरस्कार लुबेस्कींना देण्यात आला. ग्रॅव्हीटी, बर्डमॅन : द अनएक्स्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नोरन्स,द रिव्हेनंट या तीन चित्रपटांसाठी सलग तीन वर्षे सर्वोत्तम प्रकाशचित्रणाचा ऑस्कर पुरस्कार मिळवण्याचा जागतिक विक्रम लुबेस्कींनी केला. त्याचबरोबर या तीन चित्रपटांना बाफ्टाचा सर्वोत्तम प्रकाशचित्रणाचा पुरस्कारही मिळाला आहे.

समीक्षक : निखिलेश चित्रे