हस्तरेखा, बोटांवरील चक्र आणि कमानी यांचा अभ्यास करून मानवसमूहाबद्दल निर्देशांक काढण्याची एक शास्त्रीय पद्धत. त्वचारेखन अथवा हस्तरेखाटन पद्धतीमधील हाताच्या सर्व बोटांवरील एकूण कमानीचे बोटांवरील एकूण चक्रांबरोबर असलेले गुणोत्तर म्हणजे डँकमायजर निर्देशांक होय. प्रत्येक मानवी समूहांमध्ये या निर्देशांकांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. मानवी समूहामधील विविधता अभ्यासासाठी, तसेच मानसिक आजार, विकृती अभ्यासण्यासाठी या निर्देशांकांचा उपयोग होतो. या निर्देशांकाद्वारे चक्र, शंख आणि कमानीचे एकूण प्रमाण समजू शकते. सामान्यत: हातावरील कमानींची संख्या चक्रसंख्येपेक्षा कमी असते, तर शंखांचे प्रमाण जास्त असते. बोटांवरील एकूण कमानीची संख्या × १०० बोटांवरील एकूण चक्रसंख्या याप्रमाणे डँकमायजर निर्देशांक काढला जातो.

त्वचारेखन अथवा हस्तरेखाटन पद्धतीमधील हाताच्या सर्व बोटांवरील एकूण चक्रांचे एकूण शंखाबरोबर असलेले गुणोत्तर म्हणजे फुरुहाट निर्देशांक होय. बोटांवरील एकूण चक्रसंख्या × १०० बोटांवरील एकूण शंखसंख्या याप्रमाणे फुरहाटा निर्देशांक काढला जातो.

मानवाच्या हातांवरील रेषा, चक्र व कमानी हे गर्भातच तयार होतात. व्यक्तिच्या जन्मापासून मरेपर्यंत त्यांच्या रेषा, चक्र व कमानी यांमध्ये कोणताही बदल न होता ते तसेच राहतात. मंतिमंद व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या हातावरील रेषा, चक्र व कमानी यांचा अभ्यास केला असता डँकमायजर निर्देशांकानुसार पहिल्या, चौथ्या व पाचव्या अंकांमध्ये फरक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

संदर्भ :

  • कुलकर्णी, शौनक, आदिम, पुणे, २००२.
  • Cummins, H.; Midlo, C., Finger Prints, Palms & Soles, New York, 1961.

समीक्षक : शौनक कुलकर्णी