एंजिनात डीझेल या इंधनाचे ज्वलन होण्यास जो विलंब लागतो तो मोजण्यासाठी सिटेन क्रमांक उपयोगी ठरतो. तो मोजण्यासाठी सामायिक इंधन संशोधक एंजिन (Cooperative fuel research, CFR) वापरले जाते. जितका सिटेन क्रमांक जास्त, तितका इंधनाचे ज्वलन होण्यास कमी वेळ लागतो आणि एंजिन कार्यरत होते. साधारणपणे हा क्रमांक ४० ते ५५ दरम्यान असतो.
सिटेनचे रासायनिक सूत्र n -C16H34 असे आहे. त्याला एन-हेक्झाडेकेन असेही म्हणतात. हे संयुग दाबाखाली सहज पेट घेते, त्यामुळे त्याचा सिटेन क्रमांक १०० मानला जातो. आल्फा-मिथिल नॅप्थॅलीन याचा सिटेन क्रमांक शून्य असतो. सामायिक इंधन संशोधक एंजिनात (Cooperative fuel research, CFR) या दोन रसायनांचे मिश्रण घेऊन त्यांच्या सिटेन निर्देशांकाची तुलना करून नमुना डीझेल इंधनाचा क्रमांक तपासला जातो.
डीझेल इंधनात असलेल्या विविध हायड्रोकार्बन संयुगांचे सिटेन निर्देशांक वेगवेगळे असतात आणि त्यांची सरासरी घेऊन येणारा क्रमांक त्या विशिष्ट इंधनाला प्राप्त होतो. अशाप्रकारे दाबाखाली इंधन किती कमी कालावधीत पेटून कार्यरत होते याची कल्पना हा निर्देशांक देत असतो.
सिटेन निर्देशांक चाचणी : यासाठी इंधनाची घनता आणि त्याचे विशिष्ट प्रमाणात होणाऱ्या ऊर्ध्वपातनाचे (१०%,५०% व ९०%) तापमान विचारात घेतले जाते. हा निर्देशांक फक्त इंधनाचा असतो, त्यामध्ये मिसळलेल्या रासायनिक पूरक इंधनाचा नसतो.
रासायनिक पुरके : डीझेलचा सिटेन निर्देशांक वाढवा म्हणून त्यात अल्किल नायट्रेटे (मुख्यत: २-एथिलएक्सिल नायट्रेट) आणि डायटर्शरीब्युटिल पेरॉक्साइड ही रासायनिक पुरके म्हणून वापरतात.
वेगवान वाहनात जास्त सिटेन निर्देशांक असलेले डीझेल भरणे अगत्याचे ठरते. अन्यथा एंजिन सुरू होण्यास विलंब होतो आणि वाहन गतिमान होण्यास वेळ लागतो. विकसनशील देशांमध्ये डीझेलचा सिटेन निर्देशांक ४६ राखला जातो. अधिस्तरीय (Premium) प्रकारातील काही डीझेलचा सिटेन निर्देशांक ६० पर्यंत असतो. वनस्पतिजन्य जैविक डीझेलचा सिटेन निर्देशांक ४६ — ५२ यांदरम्यान असतो तर प्राणिज जैविक इंधनाचा सिटेन निर्देशांक ५६ — ६० इतका असू शकतो.
पहा : डीझेल, हायड्रोडीसल्फरीकरण.