रक्ताशी संबंधित असलेली एक प्रकारची रासायनिक क्रिया. ॲग्ल्युटिनेशन या शब्दाची उत्पत्ती ॲग्ल्युटिनेर (चिकटणारा किंवा सांधणारा) या लॅटिन शब्दापासून झाली आहे. जर रक्तपेशी व रक्तद्रव्य यांवरील प्रतिजन आणि प्रतिपिंड या एकाच प्रकारच्या असतील, तर रक्तपेशी एकत्र येऊन त्यांच्या गुठळ्या बनण्याची क्रिया सुरू होते; या क्रियेला समूहन असे म्हणतात. रक्तामधील तांबड्या पेशींवर किंवा रक्तपेशींवर किंवा लोहित कणिकांवर प्रतिजन (अँटिजेन) नावाचे द्रव्य असते, तर रक्तातीलच रक्तद्रव्यामध्ये (प्लाझ्मा) प्रतिपिंड (अँटिबॉडी) नावाचे विरुद्ध प्रकारचे द्रव्य असते. प्रतिजन आणि प्रतिपिंड या दोन्ही द्रव्यांमुळे शरिरातील रक्ताच्या गुठळ्या न होता रक्त प्रवाही राहते.

जीवाणू किंवा तांबड्या रक्तपेशीसारख्या पेशींचा समूह प्रतिपिंडाच्या संपर्कात आल्यास त्या पेशींच्या गुठळ्या होण्यास सुरुवात होते. प्रतिपिंडे किंवा इतर तत्सम रेणू एकमेकांबरोबर शृंखला प्रक्रियेने बांधले जाऊन एका मोठ्या आकाराची संरचना निर्माण करतात. या प्रक्रियेमध्ये एकल सूक्ष्मजीव प्रतिजन (सिंगल मायक्रोबायल अँटिजेन) यांचे निर्मूलन करण्यासाठी भक्षिकोशिका (फॅगोसीटोसिस) या प्रक्रियेद्वारे सूक्ष्मजीव निर्मूलन करण्याची क्षमता वाढते. तसेच रक्त संक्रमण प्रक्रियेत जर चुकीच्या गटाचे रक्त एखाद्या व्यक्तीस चढविले गेले, तर रक्तातील रक्तपेशी व रक्तद्रव्य यांवरील प्रतिजन व प्रतिपिंड अशा रक्तपेशी एकत्र येऊन त्यांच्यात गुठळ्या होण्याची प्रक्रिया सुरू होते.

समूहन या प्रक्रियेचा वापर मानवाचे रक्तगट ओळखण्यासाठी आणि ते पटल्यानंतर रक्त देण्यासाठी केला जातो.

समीक्षक : शौनक कुलकर्णी