आंत्रपुच्छ हा मोठ्या आतड्यांचा एक भाग असून पोटाच्या उजव्या बाजूला असतो. सर्वसाधारणपणे हा शरीरातील निरुपयोगी अवयव आहे, परंतु जंतुसंसर्ग झाल्यास हा त्रासदायक अवयव आहे. अन्न वाहून नेणारा मार्ग म्हणजे अन्ननलिका → जठर → लहान आतडे → मोठे आतडे हे सर्व एक नळीसारखे आतून पोकळ असणारे अवयव आहेत. लहान आतडे संपून मोठ्या अतड्याची सुरुवात होते तिथे सुरुवातीला मोठ्या अतड्याचा फुगीर पिशवी सारखा भाग असतो त्याला अंधनाल (caecum) असे म्हणतात, यालाच जोडून शेपटी सारखे आंत्रपुच्छ असते ते आतून पोकळ असते व त्याचे दुसरे टोक बंद असते. याला जंतुसंसर्ग झाल्यास त्याला आंत्रपुच्छ दाह असे म्हणतात. त्याला जास्त सूज आल्यास फुटूही शकते व जंतुसंसर्ग पूर्ण पोटात पसरू शकतो आणि रुग्ण गंभीर होऊ शकतो.
बद्धकोष्ठता, पूर्णपणे अंथरुणावर असणे, जड किंवा तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, पोटात जंतांचा (worms) प्रादुर्भाव इ. कारणांमुळे आतड्यातील अन्न पुढे सरकण्यास वेळ लागतो, तसेच आतड्यांची हालचाल मंदावते. यामुळे आंत्रपुच्छ दाह उद्भवू शकतो.
नाभीच्या भोवती अचानक दुखणे सुरू होऊन ते ओटीपोटाच्या उजव्या भागात सरकणे; खोकणे, चालणे किंवा इतर त्रासदायक हालचालींमुळे वेदना वाढणे; मळमळ व उलट्या होणे; भूक मंदावणे इ. लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. ध्वनिलेखन (sonography) किंवा संगणकीय छेदलेखन-क्रमवीक्षण (C T scan) यांच्या साहाय्याने निदान करून जंतुसंसर्गाचे प्रमाण पाहिले जाते. ते कमी असल्यास प्रतिजैविकांद्वारे उपचार केले जातात. परंतु जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात असल्यास आंत्रपुच्छ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. ही शस्त्रक्रिया विवृत (Open) व उदरपोकळी-छेदन शस्त्रक्रिया (laparoscopic; उदरपोकळीतील दूर्बीणीने घेतलेला छेद) अशा दोन प्रकारे केली जाते. विवृत शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या पोटाला उजव्या बाजूस चीर देऊन आंत्रपुच्छ बाहेर काढले जाते, तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या पोटावर दोन छोटी छिद्रे पाडून त्यामधून दूर्बीण टाकून आंत्रपुच्छ काढले जाते.
परिचारिकेची जबाबदारी व कर्तव्ये :
- शस्त्रक्रियेपूर्वीची परिचर्या : १) रुग्णाच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेविषया संपूर्ण माहिती व मानसिक आधार देणे, रुग्णाजवळील सर्व मौल्यवान वस्तू त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यासंदर्भातील पोहोच घेणे. २) जंतुसंसर्ग असल्याने ताप व उलट्यांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन हृदयाचे ठोके व रक्तदाब वाढू शकतो. म्हणून रुग्णाचा ताप, नाडी, श्वास व रक्तदाब वारंवार तपासणे व नोंदी ठेवणे. ३) शस्त्रक्रियेपूर्वी किमान सहा तास उपाशीपोटी ठेवणे, आवश्यकतेनुसार प्रतिजैविके, उलटी विरोधी औषधे (antiemetics), वेदना शमन औषधे (analgesics, opioids), तसेच रुग्णाला रक्तदाब किंवा मधुमेह असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे द्यावीत. ४) हिमग्लोबिन, यकृत कार्यक्षमता, मूत्रपिंड कार्यक्षमता, एच्.आय्.व्ही., कावीळ इ. चाचण्या आणि पोटाचा ध्वनिलेखन अहवाल, क्ष-किरण (x-ray) अहवाल इत्यादी सर्व कागदपत्रे रुग्णाच्या फाइलला जोडून ठेवावीत. ५) भूल देण्याच्या औषधांचा काही दुष्परिणाम होत नाही ना ते तपासणे, धनुर्वाताचे इंजेक्शन देणे, पोटावरील शस्त्रक्रियेची जागा निर्जंतुक करून ठेवणे व शस्त्रक्रियेकरिता शस्त्रक्रिया विभागात घेऊन जाणे.
- शस्त्रक्रियेदरम्यानची परिचर्या : १) वॉर्डमधील परिचारिकेकडून रुग्णाविषयीची सर्व माहिती घेऊन रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे. २) शस्त्रक्रियेसाठीची सर्व उपकरणे निर्जंतुक करून मोजून घेणे. ३) रुग्णाच्या मूत्राशयात नळी टाकणे, केवळ शस्त्रक्रियेचा भाग उघडा राहील असे कापड टाकून इतर शरीर झाकून ठेवणे. ४) शस्त्रक्रिया करत असताना लागणारी सर्व उपकरणे डॉक्टरांच्या हातात देणे, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुनर्प्राप्ती विभागात (recovery room) ठेऊन शस्त्रक्रियेचा रुग्णावर काही दुष्परिणाम होत नाही ना याकडे लक्ष देणे. ५) शस्त्रक्रिया विभागातून रुग्णाला बाहेर पाठवण्यापूर्वी विभागातील नोंदणी वहीत विहित नमुन्यात रुग्णाविषयीची सर्व माहिती नोंदवून ठेवणे. उदा., रुग्णाचे नाव, लिंग, वय, पत्ता, आजाराचे निदान, शस्त्रक्रियेचा प्रकार, डॉक्टरचे नाव, भुलीचा प्रकार, भूल तज्ज्ञाचे नाव, मदतनीस परिचारिका व इतर कर्मचारी यांची नावे आणि शस्त्रक्रिया सुरुवात व संपल्याची तारीख आणि वेळ इ. ६) रुग्णाच्या फाइलमध्ये भूल देण्यात आलेल्या औषधाचे नाव; शस्त्रक्रियेपूर्वीची, दरम्यानची व शस्त्रक्रियेनंतरची रुग्णाची शारीरिक स्थिती; पुढील औषधोपचाराच्या सूचना याप्रकारची सर्व माहिती नोंदवली जाते.
- पुनर्प्राप्ती विभागातील परिचर्या : १) रुग्णाविषयी सर्व माहिती घेऊन त्याला वॉर्ड बॉयच्या मदतीने बिछाण्यावर झोपवले जाते. २) ऑक्सिजन मास्क, कार्डियाक मॉनिटर यांची आवश्यकतेनुसार जोडणी करून रुग्णाची नाडी, श्वसन, रक्तदाब, ताप यांची वारंवार तपासणी करून नोंदी ठेवल्या जातात. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी रक्तस्राव, लालसरपणा, सूज किंवा पाणी येणे या सारखी लक्षणे तपासतात. ३) उलटी, मळमळ होत असल्यास तज्ज्ञांना विचारून औषधे दिली जातात आणि मूत्राचे प्रमाण व रंग यांचे सतत निरीक्षण केले जाते (प्रमाण ५० मिली./तास). औषधे, सलाईन व इतर सर्व गोष्टींची नोंद रुग्णाच्या फाइलमध्ये केली जाते.
- शस्त्रक्रियेपश्चात परिचर्या : १) पुनर्प्राप्ती विभागातून रुग्णाला वॉर्डमध्ये परिचारिकेच्या बसण्याच्या ठिकाणाच्या जवळचा बेड दिला जातो. रुग्णाला मणक्यात भूल दिली असेल्यास, पलंग पायच्या बाजूने उंच केला जातो मूत्राकरिता पिशवी पायच्या बाजूने बेडला अडकवली जाते. २) नाडी, श्वसन, रक्तदाब, ताप, आतड्यांची हालचाल इ. सर्व निरीक्षणे दर अर्ध्या तासाने करून फाइलमध्ये नोंद करून ठेवली जाते. ३) शस्त्रक्रियेनंतर किमान १२ तास रुग्णास पाणी व अन्न देऊ नये. रुग्णाच्या तब्बेतीत अस्वाभाविकता असल्यास हा वेळ वाढू शकतो. २४ तासानंतर प्रथम थोडे पाणी व त्यानंतर नारळ पाणी, ज्यूस, चहा, डाळ-भात, फळे असा सौम्य आहार देतात. ४) शस्त्रक्रियेनंतर घरी पाठवताना आरोग्य शिक्षण, आहारातील पथ्य, पुढील भेटीचे नियोजन, तसेच घरी घ्यावयाची काळजी या सर्वांचा समावेश शस्त्रक्रियेपश्चात करण्यात येणाऱ्या परिचर्येत होतो.
संदर्भ :
- Black, J. M.; Hawks, J. H. Text book of medical surgical nursing, 8th vol-1, India, 2009.
- Lippincott Williams; Wilkins, Handbook of Diseases, 9th, 2003.
समीक्षक : राजेंद्र लामखेडे