वैद्यकीय सेवा-शुश्रूषा या क्षेत्रात मोलाची कामगिरी राजा अशोकाने भारतात सर्व प्रथम केली. पूर्वीच्या काळात परिचारिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागे. वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या या क्षेत्रात गेल्या तीन शतकांत अत्यंत सुधारणा झालेली आढळते. या सर्व बाबतीत आधुनिक परिचर्येवर फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा प्रभाव आढळतो. आजच्या घडीला प्रशिक्षत परिचारिकांमार्फत रुग्णांना व आरोग्यदायी व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सेवा-शुश्रूषा देण्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांना आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. वैद्यकीय-शल्यक्रिया आरोग्य सेवा ही महत्त्वाची असून तिला सर्व आरोग्य सेवेतील पाठीचा कणा असे संबोधले जाते.
वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्येची सर्वसाधारण व्याख्या म्हणजे, “अशा रुग्णांची शुश्रूषा ज्यांच्या शरीराची स्वाभाविक कार्ये करण्याच्या क्षमतेत बिघाड झाला आहे किंवा बिघाड होण्याची शक्यता आहे (Pathophysiological changes)”. वैद्यकीय आजार किंवा त्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया यावर आधारित परिचारिकांनी विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले असते. परिचारिकेने वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्येमध्ये एम. एस्सी. केलेले असावे.
१९६० मध्ये परिचर्येचा पदव्युत्तर अभ्यासक्रम दिल्ली येथे सर्व प्रथम सुरू करण्यात आला. सद्य:स्थितीत सर्व प्रकारच्या परिचर्या प्रशिक्षणात (पदविका, पदवी, पदव्युत्तर इ.) वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या हा विषय समाविष्ट असून ह्या परिचारिका वैद्यकीय-शल्यक्रिया रुग्ण विभागात तसेच शस्त्रक्रिया विभागात काम करण्यासाठी पात्र असतात. या विभागात सर्वसाधारण वयस्क (१८ वर्षे वयाच्या पुढील) व्यक्तीस सेवा दिली जाते. ज्या रुग्णांना स्वाभाविक शारीरिक प्रक्रियेत बदल किंवा बिघाड झालेला असतो किंवा शारीरिक इजा झाल्यामुळे दुर्बलता आलेली असते अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल केल्यानंतरची संपूर्ण सेवा परिचारिका देतात. पूर्वी वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या ही स्वतंत्र शाखा अस्तित्वात नव्हती. हृदयरोग, मज्जासंस्था, स्त्री-रोग, जंतुसंसर्ग नियंत्रण (Infection Control), तात्काळ सेवा विभाग (emergency ward), भाजलेल्या रुग्णाची परिचर्या इ. काही ठराविक रुग्णांनाच ही सेवा दिली जात असे.
वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलांप्रमाणे परिचारिकांना त्याप्रमाणे विशिष्ट शिक्षण घेऊन विविध विषयात प्राविण्य मिळविता येते. वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्येमध्ये कौशल्य प्राप्त असलेल्या परिचारिका रुग्णालयातील पुढील विविध विभागांत कार्यरत असतात : आपत्कालीन विभाग, बाह्य-रुग्ण विभाग, परिचर्या प्रशासन, शल्यक्रियागार, लष्कर परिचर्या, रुग्णवाहिका विभाग, इ.
रुग्ण तपासणी : वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्येत साधारणपणे चार प्रकारे रुग्णाची तपासणी केली जाते.
- सर्व समावेशक सेवा (Comprehensive initial) : या प्रकारात परिचारिका रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्याबरोबर त्याची तपासणी करते आणि रुग्णाकडून किंवा नातेवाइकांकडून अथवा सोबत आलेल्या व्यक्तीकडून आजाराविषयी माहिती मिळवून परिचारिका विभागातील डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्ण शुश्रूषेचे नियोजन करते. त्याचबरोबर रुग्णाच्या आरोग्य सवयी व आवडी-नावडी यांची माहिती घेते.
- आजाराच्या निदानावर आधारित सेवा (Focused Care) : यामध्ये परिचारिका रुग्णाच्या सुरुवातीच्या तपासणीनंतर दाखल असे पर्यंत रुग्णात रोज अढळणाऱ्या लक्षणांनुसार आरोग्यसेवा देताना रुग्णाचे एखाद्या लक्षणाकडे चुकून दुर्लक्ष झाल्यास अथवा नवीन आरोग्य समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी सेवा नियोजन करते.
- आपत्कालीन सेवा (Emergency Care) : ज्यावेळी रुग्णांच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यात अचानक बिघाड होतो व जीविताला धोका उद्भवू शकतो, अशा वेळेस विभागातील डॉक्टर व परिचारिका त्याची नोंद करून रुग्णास आपत्कालीन सेवा देतात.
- मधल्या वेळातील सेवा (Time Lapsed Care) : या प्रकारात रुग्णांच्या आजराविषयी सुरुवातीची निरीक्षणे व उपचारानंतरची निरीक्षणे यांची तुलना केली जाते व त्यानुसार परिचर्येमध्ये अपेक्षित बदल करून मूल्यमापन केले जाते.
सारांश : आजच्या घडीला प्रशिक्षत परिचारिकांमार्फत रुग्णांना व आरोग्यदायी व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सेवा शुश्रूषा देण्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांना आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
संदर्भ :
- BT Handbook of Medical Surgical Nursing, 2016.
- Jose, Greesha, Text book of Medical Surgical Nursing, 2017.