अपोहन म्हणजे ‘बाहेर घालविणे’ किंवा ‘वेगळा करणे’ होय. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रक्तशुद्धीकरणासाठी अपोहन तंत्र (dialysis) हा पर्याय उत्तम ठरतो. कृत्रिम मूत्रपिंडाचे कार्य अपोहनाच्या तत्त्वावर चालते. या यंत्रातून आठवड्यातून दोन ते तीन वेळा सु. तीन तास रक्ताचे अभिसरण करून रक्तातील उत्सर्जनयोग्य घटक काढून टाकले जातात. उदा., क्रिअटिनीन, यूरिया, यूरिक अम्ल. विषारी औषधांची विषाक्तता कमी करण्यासाठी देखील ते वरदान ठरते. अपोहनाच्या प्रक्रियेमध्ये रक्तजलातील ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम यांसारख्या आवश्यक घटकांचे उत्सर्जन होऊ नये म्हणून विशेष प्रकारचा अपोहन द्रव वापरावा लागतो.

अपोहन प्रक्रिया करण्यासाठी डायलेसिस टेक्निशिअन (dialysis technician) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. तसेच योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलेल्या व्यावसायिक परिचारिका या कार्यात साहाय्य करतात.

अपोहन तंत्राचे रक्तअपोहन प्रक्रिया (Hemodialysis) व उदरच्छदी अपोहन प्रक्रिया (Peritoneal dialysis) असे दोन प्रकार आहेत. रक्त अपोहन प्रक्रियेमध्ये रक्त स्वच्छ करण्यासाठी अपोहन यंत्र आणि विशिष्ट निस्यंदक (कृत्रिम मूत्रपिंड किंवा डायलेझर) वापरले जातात. धमनी व नीला यांमध्ये नालव्रण (Arteriovenous fistula) तयार करून रक्तअपोहन प्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णांना कमी काळापर्यंत अपोहनाची आवश्यकता असते अशा रुग्णांमध्ये ही प्रकिया वापरतात. साधारणत: आठवड्यातून तीन वेळा रक्तअपोहन उपचार दिले जातात.

अपोहन प्रक्रियेतील दुसरा प्रकार म्हणजे उदरच्छदी अपोहन होय. या प्रकारात रक्तशुद्धीकरणासाटी रुग्णाच्या उदर-पोकळीत कायम स्वरूपी नळी टाकली जाते, ज्यामुळे  अपोहन प्रक्रिया त्याच्या सोयीने ‍करता येते. उदरच्छदी अपोहन प्रक्रियेमध्ये डायलेसेट (dialysate) नावाचे एक निर्जंतुकीकरण केलेले  साधन नलिकेद्वारे पर्युदर (peritoneal) पोकळीमध्ये चालू केले जाते, ओटीपोटातील ही पोकळी आतड्यांभोवती असते, जेथे पर्युदर पडदा अंशिक प्रवेश करण्यायोग्य पडदा म्हणून कार्य करतो. ह्या प्रक्रियेची दररोज चार ते पाच वेळा पुनरावृत्ती होते. ही स्वयंचलित प्रणाली असते. ही क्रिया रात्रभर किंवा वारंवार करण्यात येते. उदरच्छदी अपोहन हे रक्त अपोहनापेक्षा कमी कार्यक्षम आहे, परंतु हे जास्त काळासाठी शरीरातील निरुपयोगी/टाकाऊ पदार्थ जसे द्रव आणि मीठ काढून टाकण्यासाठी परिणाम कारक आहे. उदरच्छदी अपोहन बहुतेक वेळेस वैद्यकीय मदतीशिवाय रुग्णाला घरी करता येते.

पेशींमधील अम्ल तत्त्व किंवा शरीरातील अनावश्यक घटक वाढणे; रक्तातील पोटॅशियम, सॅलिसिलिक अम्ल, लिथियम, आयसोप्रोपॅनॉल, मॅग्नेशियमयुक्त रेचक इत्यादींचे प्रमाण जास्त होणे तसेच मूत्रपिंड निकामी होणे (जीएफआर <१५ एमएल / मिनिट) अशा परिस्थितींमध्ये मूत्रपिंड रोगतज्ज्ञ (Nephrologist) अपोहन प्रक्रियेचा सल्ला रुग्णाला देतात.

 

अपोहन प्रक्रियेत परिचारिकेची जबाबदारी :

  • अपोहन प्रक्रियापूर्व परिचर्या : १) रुग्णाचे वजन, रक्तदाब, शारीरिक तापमान, रक्ततातील पोटॅशियमची पातळी तपासणे. २) फॉलिक ॲसिड, पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे यांसारखी औषधे रुग्णाच्या शरीरात जाणार नाही याकडे लक्ष देणे, तसेच उच्च रक्तदाबाची औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद ठेवणे. ३) रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास पेढीमध्ये त्यासंदर्भात मागणी नोंदवून ठेवणे. ४) रुग्णाचा नालव्रण तपासणे, हाताला सलाईन नळी लावू नये, रक्तदाब मोजण्याचा पट्टा बांधू नये, त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
  • अपोहन प्रक्रियेदरम्यान परिचर्या : अपोहन प्रक्रियेदरम्यान परिचारिकेने रुग्णाच्या रक्तदाबातील चढ-उतार, स्नायूंचे दुखणे, मळमळ, वांती होणे, डोके दुखणे, शरीरावर खाज येणे इ. लक्षणांचे निरीक्षण करून नोंद ठेवावी. त्याचबरोबर प्रक्रियेदरम्यान कुठूनही रक्तस्राव होत नाही ना याकडे लक्ष द्यावे.
  • अपोहन प्रक्रियेपश्चात परिचर्या : १) रुग्णाचा रक्तदाब तपासणे, रक्तस्राव तपासणे, प्रक्रियेपूर्वीच्या व नंतरच्या वजनातील फरक नोंदविणे. २) रुग्णाचा नालव्रण व आसपासच्या जागेवरील लालसर त्वचा, सूज, जंतुसंसर्ग किंवा रक्तस्राव यांकडे लक्ष ठेवणे. ३) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोटॅशियम, हिमग्लोबिन इत्यादींच्या काही रक्ताच्या चाचण्या असतील तर त्या करुन घेणे.
  • रुग्णाच्या आहारासंबंधित परिचर्या : १) पाणी आणि द्रव पदार्थ – रुग्णाच्या मूत्राशयाची कार्यक्षमता कमी झाली असल्याने, त्यास पाणी, सरबत इ. द्रव पदार्थ मोजूनच दिले जातात. अन्यथा अंगावर सूज येणे, श्वसनास त्रास होणे असे विकार उद्भवतात. २) सोडियम कमी असलेला आहार : शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखण्यात सोडीयम (मीठ) मदत करते व त्याचे रक्तात योग्य प्रमाण ठेवण्याचे काम मूत्राशय करते. शरीरात सोडियम अधिक झाल्यास तहान लागणे, अंगावर सूज येणे, धाप लागणे असे त्रास होण्यास सुरुवात होते. म्हणून मीठ, खाण्याचा सोडा, चाट मसाला, पापड, लोणचे, कोशिंबीर, चटणी, बेकरी इ. खाण्याचे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. ३) शरीरात हृदय व स्नायूंचे कार्य योग्य रीतीने होण्याकरिता रक्तात पोटॅशियमचे प्रमाण योग्य असावे. त्याकरिता चिकू, आंबा, मोसंबी, द्राक्ष, अननस, आवळा, चेरी, जर्दाळू, रताळे, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर, पालक, गवार, सुका मेवा इ. पदार्थ आहारातून टाळावेत. तर पिष्टमय पदार्थ; गूळ; दूध, डाळी, अंडी, मटन यांसारख्या प्रथिनांचा आहारात काही प्रमणात समावेश असावा.

संदर्भ :

  • Lippincott Williams; Wilkins, Handbook of Diseases.
  • Black J. M.; Hawks, J. H. Medical-Surgical Nursing, Vol-2, Ed.8th.

समीक्षक : राजेंद्र लामखेडे