नेपिअर, जॉन रसेल (Napier, John Russel) : (११ मार्च १९१७ – २ ऑगस्ट १९८७). प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ आणि शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ओल्ड विंडसॉर येथे झाला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक अस्थीशल्यविशारद म्हणून झाली होती. असे असले तरी शरीररचनाशास्त्र आणि प्रायमेटोलॉजीमधील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचा प्रुडेंस नीरो यांच्याशी विवाह झाला. त्याही प्रसिद्ध प्रायमेटोलॉजिस्ट होत्या. नेपिअर यांचे बार्ट्स अँड लंडन स्कूल ऑफ मेडिसीन आणि डेंटिस्ट्री या शाळेतून सुरुवातीचे शिक्षण झाले. इ. स. १९४३ मध्ये लंडन विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस ही वैद्यकशास्त्राची पदवी मिळविली. नंतर त्यांनी डी. एससी. ही प्रतिष्ठित पदवी मिळविली. ‘मानव आणि नरवानर गण’ तसेच ‘हात आणि पाय यांची रचना’ यांवर त्यांचा विशेष अभ्यास होता.
नेपिअर यांनी प्रोकॅन्सूल आफ्रिकानसचा सविस्तर अभ्यास केला. होमो हॅबिलिसची एक नवीन प्रजात म्हणून अभ्यास करण्यासाठी लिकी आणि फिलीप टोबिअस यांना त्यांनी सहकार्य केले. या तिघांनी त्यांच्या नवीन शोधाला ऑस्ट्रॅलोपिथिकस (दक्षिणेकडील कपी) असे म्हणण्यापेक्षा त्याचे नामकरण होमो असेच केले; कारण त्यांच्या मते, या अवशेषाच्या कवटीची क्षमता काहीशी वाढलेली होती; दाढा व उपदाढा काहीशा लहान आकाराच्या होत्या आणि हातापायांची हाडे माणसाप्रमाणे होती. त्यामुळे हाताने वस्तू हाताळण्याची क्षमता त्याला असावी. याशिवाय या जीवाश्माच्या अवशेषांबरोबरच काही दगडी हत्यारेही मिळाली होती. त्यामुळे त्याला होमो म्हणणेच उचित होते. लंडन विद्यापीठात अस्थिशल्यविशारद म्हणून काम करत असताना सर ली ग्रॉस क्लार्क यांनी त्यांना पुरामानवशास्त्रातील सहयोगासाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर प्रायमेटोलॉजी विषयासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. प्रायमेट सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
नेपिअर यांच्या कार्याचा व्याप खूप मोठा होता. इ. स. १९३४ ते १९४६ या काळात सेंट बार्थोलोम्युज हॉस्पिटलमध्ये सिनिअर हाऊस सर्जन, अस्थिविज्ञान विभागात साहाय्यक आणि मज्जासंस्था शाखेत रजिस्ट्रार म्हणून ते काम केले. इ. स. १९४४ ते १९४९ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मेडिकल स्कूलमध्ये शरीररचनाशास्त्र विभागात ते डेमॉनस्ट्रेटर होते. इ. स. १९४९ ते १९६७ या काळात किंग्स कॉलेज ऑफ लंडन स्कूल ऑफ मेडिसीन अँड डेंटिस्ट्रीमध्ये शरीररचनाशास्त्राचे ते व्याख्याते होते. तेथेच १९५२ ते १९६७ या काळामध्ये प्रायमेटोलॉजी आणि ह्यूमन इव्होल्युशन या शाखेचे ते संचालक होते. १९६७ ते १९६९ या काळात स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटच्या सस्तन प्राणी विभागात ते संचालक होते. त्यानंतर १९६९ ते १९७३ मध्ये क्विन्स एलिजाबेथ कॉलेजमध्ये प्रोग्रॅम इन प्रायमेट बायोलॉजीमध्ये ते संचालक होते. लंडनच्या बर्कबेक कॉलेजमध्ये प्रायमेट बायोलॉजीचे अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते.
नेपिअर यांनी अ हँडबुक ऑफ लिव्हिंग प्रायमेट्स (१९६७), द रूट्स ऑफ मॅनकाइंड (१९७१), द नॅचरल हिस्टोरी ऑफ प्रायमेट्स (१९८५) या विषेश पुस्तकांचे लेखन केले. रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ख्रिसमसमध्ये ‘मंकीज विदाऊट टेल्स : अ जिराफ्स आय-व्यूव्ह ऑफ मॅन’ या विषयावर विशेष व्याख्यान देण्यासाठी त्यांना १९७० मध्ये आमंत्रित करण्यात आले होते.
नेपिअर यांचे इंग्लंडमधील इस्ले ऑफ मूल येथे निधन झाले.
संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : सुभाष वाळिंबे