ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ ‘दक्षिणेकडील कपीʼ (Southern Ape) असा आहे. हे नाव विख्यात वैज्ञानिक रेमंड डार्ट (१८९३–१९८८) यांनी दिले. हे मानवसदृश प्राणी सुमारे ४० लक्षपूर्व ते १० लक्षपूर्व एवढ्या काळात अस्तित्वात होते. आता फक्त त्यांचे जीवाश्म मिळतात.

मानवाचा समावेश असलेल्या होमो पराजातीपेक्षा वेगळे, परंतु मानवी उत्क्रांतीशी संबंधित असे इतर प्राणी होते, हे सर्वप्रथम १९२४ मध्ये लक्षात आले. रेमंड डार्ट यांना दक्षिण आफ्रिकेत त्वांग (Taung) या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्मांमुळे मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधनाला संपूर्ण कलाटणी मिळाली. विज्ञानाच्या क्षेत्रातील सायन्स या अग्रगण्य नियतकालिकाने विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाच्या वीस शोधांमध्ये या शोधाचा समावेश केला आहे.

ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातीच्या प्राण्यांच्या मानवी उत्क्रांतीशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये खूप फरक पडला आहे. कारण अनेक नवीन जीवाश्म सतत मिळतात. नवीन जीवाश्मांवर झालेल्या संशोधनातून ऑस्ट्रॅलोपिथेकस गटाचे वर्गीकरण व नामकरणाच्या बाबतीत समस्या व वाद निर्माण झाले आहेत. काही काळापर्यंत होमो पराजातीपेक्षा निराळ्या परंतु मानवाप्रमाणे काही शारीरिक वैशिष्ट्ये असलेल्या जीवाश्मप्रजातींचा समावेश ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातीत केला जात असे. ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या प्रजातींचे प्राचीन नाजूक (Gracile) आणि दणकट ऑस्ट्रॅलोपिथेकस (Robust) असे वर्गीकरण केले जात असे. तथापि ऑस्ट्रॅलोपिथेकस जीवाश्मांची संख्या वाढल्यानंतर दोन्ही प्रकारांच्या प्राण्यांच्या शरीरयष्टीत काहीही फरक नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणून आता नाजूक आणि दणकट ऑस्ट्रॅलोपिथेकस हे वर्गीकरण रद्द झाले आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकसमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वांत प्राचीन दोन प्रजाती (आर्डीपिथेकस) आणि दणकट ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या तीन प्रजाती (पॅरान्थ्रोपस) आता वेगळ्या काढण्यात आल्या आहेत. असे असले, तरी काही पुरामानवशास्त्रज्ञ पॅरान्थ्रोपस हा वेगळा पराजाती गट मानत नाहीत. त्यामुळे पॅरान्थ्रोपसच्या तीन (रोबस्टस, बॅाइसी आणि इथिओपिकस) प्रजातींचा समावेश ते ऑस्ट्रॅलोपिथेकस याच पराजातीत करतात. केनियात लेक तुर्कानाच्या पश्चिमेला लोमेक्वी येथे मिळालेल्या जीवाश्मांचा समावेश ऑस्ट्रॅलोपिथेकस प्लॅटिओप्स (Australopithecus platyops) असा ऑस्ट्रॅलोपिथेकस गटात केला गेला होता. तथापि आता त्यांच्यासाठी केनिॲन्थ्रोपस असा नवा पराजाती गट तयार करण्यात आला आहे.

सन २०१७ मध्ये प्रचलित असलेल्या वर्गीकरणानुसार ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या सात  प्रजाती आहेत. त्या ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis), ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis), ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus africanus), ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही (Australopithecus garhi), ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेल्घझाली (Australopithecus bahrelghazali), ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा (Australopithecus deyiremeda) आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा (Australopithecus sediba) अशा आहेत. यांमधील ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही प्रजात सर्वांत अगोदरची (४० लक्षपूर्व) होती, तर ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस ही प्रजात दीर्घकाळ (३८.५ ते२९.८ लक्षपूर्व) अस्तित्वात होती. ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही तुलनेने सर्वांत अलीकडची प्रजात आहे.

ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या सर्व  प्रजातींचे शेकडो जीवाश्म आफ्रिकेत अनेक ठिकाणी मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. या गटातील प्राणी दोन पायांवर चालणारे असून त्यांच्या कवटीचे आकारमान ३५० ते ६०० घन सेंमी. एवढे होते. त्यांची उंची १२० ते १५० सेंमी. दरम्यान होती. वजन अंदाजे ३० ते ५५ किग्रॅ. होते. त्यांच्या आहाराबद्दल अनेक मते असून ते वनस्पतिजन्य अन्नाबरोबरच काही प्रमाणात शिकार करून प्रथिने मिळवत होते, असे दिसते.

संदर्भ :

  •  Haile-Selassie Yohannes; Gibert, L.;  Melillo, S.M.; Ryan, T.M.; Alene M.; Deino, A.;  Levin, N.E.; Scott, G. & Saylor, B. Z. ‘New Species from Ethiopia further expands Middle Pliocene Hominin Diversityʼ, Nature, 521(7553): 483-488, 2015.
  • Larsen, C.S. Our Origins, New York, W.W. Norton and Co., 2017.

समीक्षक – शौनक कुलकर्णी