सहस्रक विकासाची ध्येये ही आंतरराष्ट्रीय विकासाची आठ ध्येये आहे. या ध्येयांची निर्मिती सप्टेंबर २००० मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भरलेल्या शिखर परिषदेतील चर्चेमधून करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९१ सदस्य राष्ट्र आणि २२ आंतरराष्ट्रीय संघटनांनी २०१५ पर्यंत या ध्येयांची पूर्तता साध्य कण्याचे मान्य केले होते. या ध्येयांमध्ये जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन जगातील गरीब देशांच्या सामाजिक व आर्थिक अवस्थांमध्ये सुधारणा करणे हे प्रमुख ध्येय होते. या कार्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी जून २००५ मध्ये जी-८ च्या अर्थमंत्र्यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक (एएफडीबी) यांना पुरेशी निधी पुरविण्याचे ठरविले. त्याच बरोबर ऋणी व गरीब देशांचे आरोग्य व शिक्षण सुधारण्यासाठी आणि दारिद्र्य निर्मूलन करण्याकरिता त्यांना संसाधनांचे पुनरनिर्देशित करण्यासाठी ४० ते ५५ अब्ज डॉलर्स कर्ज रद्द करण्याचे मान्य केले.

ध्येये :

  • (१) देशातील कमालीचे दारिद्र्य व भुकेची समस्या नष्ट करणे.
  • (२) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचे ध्येय प्राप्त करणे.
  • (३) लिंग समानतेला प्रोत्साहन देऊन स्त्रियांचे सशक्तीकरण करणे.
  • (४) बाल मृत्यूच्या दरात मोठ्या प्रमाणात घट घडवून आणणे.
  • (५) मातांच्या आरोग्यात सुधारणा घडविणे.
  • (६) एच. आय. व्ही. एड्स, मलेरिया व इतर आजारांचे उच्चाटन करणे.
  • (७) पर्यावरणाचे संरक्षण/सातत्य करणे.
  • (८) जागतिक पातळीवर आर्थिक विकासासाठी भागीदारी वाढविणे.

उद्दिष्ट्ये प्राप्तीची ध्येये व लक्ष्यांक : सहस्र विकासाच्या प्रत्येक ध्येयाला विशिष्ट असे २१ लक्ष्य आहेत. प्रत्येक लक्ष्यासाठी मोजमाप करण्यायोग्य आरोग्य निर्देशक आणि आर्थिक निर्देशकांची श्रृंखला असून ते लक्ष्य साध्य करण्यासाठी निश्चित कालावधीसुद्धा ठरविण्यात आला होता.

(१) देशातील कमालीचे दारिद्र्य व भुकेची समस्या नष्ट करणे ꞉

लक्ष्य १ : ज्या लोकांचे उत्पन्न प्रतिदिन १.२५ डॉलरपेक्षा कमी आहे, अशा लोकांमधील भीषण दारिद्र्याचे प्रमाण १९९० ते २०१५ या २५ वर्षांच्या कालावधित अर्धे करणे.

निर्देशक : (अ) दारिद्र्य निर्मूलन गुणोत्तर (गरीबीची प्रमाण गहनता). (ब) राष्ट्राच्या उपभोगात सर्वांत गरीब कुटुंबांचा हिस्सा.

लक्ष्य २ : महिला, पुरुष आणि युवा यांच्यासाठी योग्य अशा रोजगाराच्या संधी उत्पन्न करणे.

निर्देशक : (अ) रोजगार प्राप्त व्यक्तीचे राष्ट्रीय उत्पन्न वाढीतला दर. (ब) रोजगारीचे दर. (क) दररोज १.२५ डॉलरपेक्षा कमी रोजगार असलेल्या व्यक्तीचे प्रमाण. (ड) रोजगार प्राप्त लोकसंख्येत कुटुंबाधारित कामगारांचे प्रमाण.

लक्ष्य ३ : भुकेने ग्रस्त लोकांचे प्रमाण १९९० ते २०१५ या कालावधित अर्धे करणे.

निर्देशक : (अ) पाच वर्षांखालील मुलांमध्ये कमी वजनेचे प्रमाण थांबविणे. (ब) आहारातील ऊर्जेचा वापर किमान प्रमाणापेक्षा कमी प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण.

ध्येय २ : सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचे ध्येय प्राप्त करणे :

लक्ष्य : सर्व मुली आणि मुले २०१५ पर्यंत प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात हे बघणे.

निर्देशक : (अ) प्राथमिक शिक्षणात नोंदणी. (ब) प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे.

ध्येय ३ : स्त्रियांचे सशक्तीकरण लिंग समानतेला प्रोत्साहन देऊन करणे :

लक्ष्य : प्राधान्याने २००५ पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये आणि २०१५ पर्यंत सर्व स्तरांवरील शिक्षणामध्ये लैंगिक असमानता कमी करणे.

निर्देशक : (अ) प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक शिक्षणातील मुलामुलींच्या शैक्षणिक सहभाग प्रमाण. (ब) गैरकृषी क्षेत्रातील मजुरीमध्ये महिलांचे प्रमाण. (क) राष्ट्रीय संसदेत महिलांनी मिळविलेल्या जागांचे प्रमाण.

ध्येय ४ : बाल मृत्यूच्या दरात मोठ्या प्रमाणात घट घडवून आणणे :

लक्ष्य : पाच वर्षांखालील बाल मृत्यूचा दर १९९० ते २०१५ या कालावधित दोन तृतीयांशने कमी करणे.

निर्देशक : (अ) पाच वर्षांखालील बालमृत्यूचा दर. (ब) एका वर्षाच्या आत (१ वर्षाखालील) बालमृत्यूचा दर १ वर्षाखालील मुलांना देण्यात आलेल्या गोवराचे लसीकरणाचे प्रमाण.

ध्येय ५ : मातांच्या आरोग्यात सुधारणा घडविणे :

लक्ष्य १ : प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या मातृत्व मृत्यूचे दर १९९० ते २०१५ या कालावधित ७५% ने कमी करणे.

निर्देशक : (अ) प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या मातृत्व मृत्यूचे दर. (ब) कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घडलेल्या जन्माचे दर.

लक्ष्य २ : प्रजनन आरोग्यासाठी २०१५ पर्यंत सार्वत्रिक प्रवेश देणे.

निर्देशक : (अ) गर्भनिरोधक व्याप्ती दर. (ब) किशोरवयीन जन्मदर. (क) अनुषंगिक काळजीची व्याप्ती. (ड) कुटुंब नियोजनासाठी आवश्यक गरज.

ध्येय ६ : एच. आय. व्ही. एड्स मलेरिया व इतर आजाराचे उच्चाटन करणे :

लक्ष्य १ : एच. आय. व्ही. एड्सची व्याप्ती २०१५ पर्यंत स्थगित करणे व कमी करण्यास सुरुवात करणे.

निर्देशक : (अ) १५ ते २४ वयोगटांतील लोकसंख्येत होणारा एच. आय. व्ही. एड्सचा फैलाव थांबविणे. (ब) संभोगाच्या वेळी निरोधाचा वापर. (क) एच. आय. व्ही. एड्सची व्यापक माहिती १५ ते २४ वयोगटातील लोकांना असण्याचे प्रमाण.

लक्ष्य २ : एच. आय. व्ही. औषधोपचार २०१० पर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध करून देणे.

निर्देशक : एच. आय. व्ही. संसर्गासह असणाऱ्या लोकसंख्यांपैकी त्यांना मिळणाऱ्या एच. आय. व्ही. विरोधी औषध प्राप्तीचे प्रमाण.

लक्ष्य ३ : मलेरिया आणि इतर प्रमुख आजारांच्या घटनांना २०१५ पर्यंत स्थगित करून मागे टाकण्यास सुरुवात करणे.

निर्देशक : (अ) मलेरियाशी संबंधित मृत्यूदर थांबविणे. (ब) ५ वर्षांखालील मुलांचे किटकनाशके वापरून तयार केले जाणारे शयनसगत वापरण्याचे प्रमाण. (क) ५ वर्षांखालील ताप असलेल्या मुलांचे प्रमाण, जे मलेरिया विरोधी औषधांचा योग्य वापर करतात. (ड) टीबीशी संबंधित घटना, प्रसार, मृत्यूदर इत्यादी डॉट्स (डायरेक्टली ऑब्जर्व्ह्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स) अंतर्गत क्षयरोगाच्या प्रकरणांचे आढळणे व बरे झाल्याचे प्रमाण.

ध्येय ७ : पर्यावरणाचे संरक्षण/सातत्य करणे :

लक्ष्य १ : देशातील धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये शाश्वत विकास तत्त्वांचा समावेश करून पर्यावरण संसाधनांचे संवर्धन करणे.

लक्ष्य २ : जैविक विविधतेला होणाऱ्या नुकसानीच्या दरांमध्ये २०१० पर्यंत लक्षणीय घट करणे.

निर्देशक : (अ) जंगलाने व्यापलेल्या जमीनक्षेत्राचे प्रमाण. (ब) कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनचे एकूण दरडोई आणि प्रति १ डॉलर जीडीपी (पीपीपी) प्रमाण. (क) ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचा वापराचे प्रमाण. (ड) सुरक्षित जैविक मर्यादांमध्ये माशांच्या साठ्याचे प्रमाण. (इ) एकूण जल संसाधनांच्या वापराचे प्रमाण. (ई) स्थलीय आणि सागरी क्षेत्रांस संरक्षणाचे प्रमाण. (फ) विलोपन होणाऱ्या प्रजातींचे प्रमाण.

लक्ष्य ३ : सुरक्षित पिण्याचे पाणी आणि मूलभूत स्वच्छता शाश्वतपणे न मिळविणाऱ्या लोकांची संख्या २०१५ पर्यंत अर्धी करणे.

निर्देशक : (अ) शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये सुधारित पाण्याचा स्रोत शाश्वतपणे मिळविणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण. (ब) सुधारित स्वच्छता मिळविणारी शहरी लोकसंख्येचे प्रमाण.

लक्ष्य ४ : झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी १०० दशलक्ष लोकांचे जीवनमान २०२० पर्यंत सुधारणे.

निर्देशक : झोपडपट्टीत राहणाऱ्या शहरी लोकसंख्येचे प्रमाण.

ध्येय ८ : विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे :

लक्ष्य १ : एक खुली, नियमाधारित व भेदभावपूर्ण नसणारी व्यापारी व आर्थिक प्रणाली विकसित करणे.

निर्देशक : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशासन, विकास आणि दारिद्र्य निर्मूलन ही प्रतिबद्धता निश्चिती.

लक्ष्य २ : अल्प विकसित देशांच्या विशेष गरजांकडे लक्ष्य देणे.

निर्देशक : अल्प विकसित देशांच्या निर्यातीसाठी दरमुक्त आणि कोटामुक्त प्रवेश सुनिश्चित करणे. त्यांच्यासाठी कर्ज सवलतीचा कार्यक्रम राबविणे. अधिकृत द्विपक्षीय कर्ज रद्द करणे आणि गरिबी निर्मूलन करण्यासाठी प्रतिबद्ध देशांना अधिक उदार ‘अधिकृत विकास साहाय्य’ देणे.

लक्ष्य ३ : समुद्री प्रवेश नसणाऱ्या विकसनशील देश आणि लहान बेट स्वरूपीय विकास राज्यांची विशेष गरजांना संबोधित करणे.

निर्देशक : लघु बेट स्वरूपीय विकासशील देशांच्या शाश्वत विकासासाठी कार्यक्रम राबविणे.

लक्ष्य ४ : विकसनशील देशांच्या कर्जाच्या समस्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपायांच्या माध्यमातून सोडविणे (खाली दिलेले काही सूचक/निर्देशक किमान विकसित देश, आफ्रिकन देश, समुद्री प्रवेश नसणाऱ्या विकसनशील देश आणि लहान बेट विकासशील राज्यांकरिता स्वतंत्रपणे परीक्षण करणे).

निर्देशक १ : अधिकृत विकास साहाय्य : (अ) एकूण, निव्वळ व विकसनशील देशांना दिलेल्या अधिकृत विकास साहाय्याचे ‘विकास साहाय्य समितीच्या’ देणगीदारांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण. (ब) ‘विकास साहाय्य समितीच्या’ देणगीदारांची ठरविलेल्या अधिकृत विकास साहाय्यमधून मूलभूत सामाजिक सेवांसाठी (मूलभूत शिक्षण, प्राथमिक आरोग्य सेवा, पोषण, सुरक्षित पाणी आणि स्वच्छता) वाटपाचे प्रमाण. (क) द्विपक्षीय अधिकृत विकास साहाय्याचे प्रमाणबद्ध ‘विकास साहाय्य समितीच्या’ मतांशी असलेला प्रमाण. (ड) समुद्री प्रवेश नसणाऱ्या विकसनशील देशांना मिळालेल्या अधिकृत विकास साहाय्याचे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण. (इ) लघु बेट स्वरूपीय विकसनशील देशांना मिळालेल्या अधिकृत विकास साहाय्याचे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण.

निर्देशक २ : बाजार प्रवेश : (अ) विकसित देशांच्या एकूण आयातीमध्ये विकसनशील व अल्पविकसित देशांमधून मोफत शुल्क आकारून झालेल्या आयातीचे प्रमाण. (ब) विकसित देशांद्वारे विकसनशील व अल्पविकसित देशांच्या कृषी आणि वस्त्रोद्योग उत्पादनांवर घेण्यात आलेल्या जकातीचे सरासरी दर. (क) आर्थिक सहयोग व विकास संघटना असणाऱ्या देशांद्वारे दिल्या जाणाऱ्या कृषी साहाय्याचे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले अंदाजित प्रमाण. (ड) व्यापार क्षमता निर्माण करण्यास मदत म्हणून दिलेल्या अधिकृत विकास साहाय्याचे प्रमाण.

निर्देशक ३ : कर्ज स्थिरता : (अ) उच्च कर्जाचा भार असणाऱ्या देशांपैकी ठरविलेल्या निर्णय बिंदूपर्यंत आणि पूर्णत्व बिंदूपर्यंत पोचल्या आहेत अशा देशांची एकूण संख्या. (ब) उच्च कर्जाचा भार असणाऱ्या देशांना देण्यात आलेल्या अंतर्गत कर्ज सवलतीचे डॉलर स्वरूपात प्रमाण. (क) वस्तू आणि सेवांच्या निर्यातीच्या टक्केवारीनुसार देण्यात आलेल्या कर्ज सेवेचे प्रमाण.

लक्ष्य ५ : औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करून विकसनशील देशांमध्ये परवडणारी अत्यावश्यक औषधे उपलब्ध व्हावीत.

निर्देशक : शाश्वत आधारावर स्वस्त औषधांना प्रवेश असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण.

लक्ष्य ६ : खाजगी क्षेत्रातील सहकार्याने नवीन तंत्रज्ञानाचा फायदा विशेषत: माहिती आणि संप्रेषण उपलब्ध करणे.

निर्देशक : (अ) प्रति १०० लोकसंख्येमागे दूरध्वनी व भ्रमणध्वनी ग्राहकांचे प्रमाण. (ब) प्रति १०० लोकसंख्येमागे वापरात येणाऱ्या वैयक्तिक संगणकांचे प्रमाण. (क) प्रति १०० लोकसंख्येमागे आंतरजालाचे वापरकर्ते.

भारत व सहस्रक विकासाच्या ध्येयांमधील प्रगती : भारताने सप्टेंबर २००० च्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या जाहीरनाम्यात स्वाक्षरी केली असून सातत्याने आठही विकास ध्येय प्राप्त करण्याची बांधिलकी बहाल केली आहे. भारताने या ध्येयांच्या पूर्ततेची लक्षणीय प्रगती करत असून काही लक्ष्य २०१५ च्या मुदतीपूर्वीच पूर्ण केले गेले आहेत; तथापि प्रगती विसंगत आहे. उदा., अधिकृत राष्ट्रीय अंदाजानुसार भारताने अर्धी गरिबी कमी करण्यासाठीचे लक्ष्य साध्य केला आहे; परंतु उपासमारी कमी करण्यासाठीचे लक्ष्य साध्य करू शकलेला नाही. देशाने प्राथमिक शाळांची नाव नोंदणी करताना लिंग समानता गाठली आहे; परंतु प्राथमिक शाळांची नोंदणी आणि पूर्णता या गोष्टींसाठीच हे लक्ष्य साध्य झालेले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी भारताने प्रगती केली आहे; परंतु स्वच्छतेच्या सुविधांमधील लक्ष्य अपुरा आहे. त्याच प्रमाणे भारतात एच. आय. व्ही. एड्स, मलेरिया व क्षयरोगाचे प्रमाण घटले आहे; परंतु माता मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर अपेक्षित स्तरावर ठेवण्यामध्ये भारत मागे पडत आहे.

भारताची २०१५ नंतरची स्थिती : २०१५ मध्ये संपलेल्या सहस्रक विकासाच्या ध्येयांची जागा आता निरंतर / शाश्वत विकास उद्दिष्टे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) यांनी घेतलेली आहे. संयुक्त राष्ट्राने ठरविलेले हे १७ जागतिक उद्दिष्टे आहेत. यात एकूण १६९ लक्ष्ये असून गरिबी, उपासमार, आरोग्य, शिक्षण, हवामानातील बदल, लिंग समानता, पाणी, स्वच्छता, ऊर्जा, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे.

समीक्षक ꞉ अनील पडोशी