एक ईजिप्शियन प्राचीन स्त्री-देवता. सामान्यत: मांजर, सुपीकता, प्रजनन, संगीत, युद्ध, संरक्षण, शुश्रूषा इत्यादींशी तिचा संबंध जोडला जातो. मांजरीचे तोंड असलेली, उजव्या हातात आंख किंवा सिसट्रम नावाचे आघातवाद्य आणि डाव्या हातात एजिस आणि काहीवेळा एक छोटी झोळी धरलेली असे तिचे स्वरूप आढळते.
बास्टेट ही ईजिप्शियन सूर्यदेवता रा आणि इसिस (आयसिस) यांची मुलगी आणि प्ताह या देवतेची पत्नी मानली जाते. त्यांना माहेस आणि नेफरतूम ही मुले आहेत.
इसवीसन पूर्व ३००० च्या सुमारास बास्टेटला सिंहिणीच्या स्वरूपात चित्रित केले जाई. कालांतराने सिंहिणीच्या ऐवजी मांजराचे मस्तक असलेली स्त्री असे तिचे स्वरूप सौम्य होत गेलेले आढळते. प्राचीन ग्रीसमध्येदेखील तिला ‘आईलूरोस’ (ग्रीक भाषेत मांजर) या नावाने ओळखले जाई.
काही अभ्यासक युबासटे (Ubaste) या शब्दावरून बास्टेट हे नाव रूढ झाले असावे, असे मानतात. तर काही अभ्यासक ‘बास्ट बाआसेट’ (Bast ba’Aset) या शब्दाचा अर्थ ‘इसिसची मुलगी’ असा असल्याने या शब्दावरून बास्टेट शब्द रूढ झाला असावा, असे मानतात. तिला ‘चंद्राचा डोळा’ असेही म्हटले जाते.
बास्टेटबद्दल पुढील अन्य काही समजुती प्रचलित होत्या : ती ईजिप्शियन फेअरोंचे युद्धात रक्षण करते. ती रोज रा देवाच्या नौकेतून विहार करते. तिने ॲपेप (ॲपॉफिस) नावाच्या सर्पाला आपल्या पंज्यातील सुऱ्याने मारून राचे रक्षण केले. तिच्या या कार्यामुळे तिला ‘द लेडी ऑफ द फ्लेम’ हे नामाभिधान मिळाले. मृत्यूनंतरच्या प्रवासात ती मृतात्म्याचे रक्षण करते.
ईजिप्शियन दुसऱ्या घराण्याच्या काळात (इ.स.पू. २९००) प्रामुख्याने दक्षिण ईजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यातील बूबासटीस येथे बास्टेटची उपासना होत असे. तिथल्या जागेचे ती रक्षण करते अशी तिथल्या राहिवाशांची श्रद्धा होती. बूबासटीस हे प्राचीन ईजिप्तमधील सर्वांत संपन्न आणि श्रीमंत उपासनास्थळ असून याच ठिकाणी तिचा पंथ टॉलेमिक काळात भरभराटीस आला. एप्रिल आणि मे महिन्यांत या ठिकाणी बास्ट उत्सव किंवा बास्ट मिरवणूक नावाचा बास्टेटचा उत्सव साजरा केला जाई. ह्या उत्सवात सात लाखांपेक्षा जास्त पर्यटक येत असत. उत्सवात सहभागी लोक बास्टेटला प्रसन्न करण्यासाठी नृत्य-गान करून बळी देणे व इतर अनेक अमूल्य भेटी समर्पित करत असत. तिच्या सन्मानार्थ बूबासटीस परिसरातील प्राचीन ईजिप्शियन आपल्या मृत मांजरांचे ममीकरण करून त्यांना आपल्या मालकाच्या मृतदेहाशेजारी पुरत असत. उत्खननांच्या वेळी पुराणवस्तुसंशोधकांना तीन लाखांपेक्षा जास्त मांजरांच्या ममी सापडल्या आहेत. बूबासटीसव्यतिरिक्त मेंफिस, हीलिऑपोलिस आणि हेराक्लिऑपोलिस येथेदेखील बास्टेट पंथ होते. या पंथियांमध्ये मांजरीचे ताईत वापरण्याची प्रथा होती.
प्राचीन ईजिप्तमध्ये मांजरींना खूप महत्त्व होते. प्रत्येक घरात बास्टेटच्या सन्मानार्थ आणि पूजेसाठी खास जागा असे. ईजिप्शियन फेअरोंच्या दरबारात मांजरींना उत्कृष्ट दागिने घातले जायचे. मांजरींसोबत एकाच ताटातून खाल्ले जायचे. मांजरांना नुकसान पोहोचवणे किंवा त्यांना त्रास देणे हा गंभीर गुन्हा मानला जायचा आणि आरोपीला कठोर शिक्षा केली जायची.
संदर्भ :
- https://www.britannica.com/topic/Bastet
- https://mythologysource.com/bastet-egyptian-goddess/
- https://www.worldhistoryedu.com/bastet-goddess-birth-story-powers-symbols-meanings/
- https://secure.img2-fg.wfcdn.com/im/a541358e/resize-h600-w600%5Ecompr-r85/7112/7112207/Egyptian+Cat+Goddess+Bastet+with+Royal+Ankh+Statue.jpg
समीक्षक : शकुंतला गावडे