प्राचीन ईजिप्शियन पृथ्वी देवता. ईजिप्शियन देवतांच्या पूर्वजांचा पूर्वज मानला गेलेल्या रा देवतेचा एकटेपणा घालवून त्याला मनोरंजनाचे साधन आणि विश्रामासाठी जागा मिळावी म्हणून शू आणि तेफ्नूट यांच्या संयोगातून गेब (पृथ्वी) आणि नट (आकाश) देवतांची निर्मिती झाली, असे मानले जाते. गेब आणि नटच्या संयोगातून पुढे पृथ्वी, आकाश आणि पातळातील इतर सर्व देवता निर्माण झाल्या. गेबला सर्व देवतांचा पिता व नट देवतेचा पती अथवा भाऊ मानले जाते. गेब नऊ प्रमुख देवतांपैकी (The Great Ennead) एक होता. ज्यांची पूजा हीलिऑपोलीस किंवा दक्षिण ईजिप्तमधल्या सूर्यनगरीत केली जात असे.
पृथ्वीचे मानवी मूर्त स्वरूप असल्याने गेबला सुपीकतेची देवता म्हटले आहे. काही ठिकाणी गेब देवतेचे स्वरूप हिरव्या रंगाचे असून तिच्यातून झाडे बाहेर येताना दाखवले आहे. गेबची मानवाकृती कधी ताठरलेले शिश्न असलेला, कधी लाल मुकुट धारण केलेला, तर कधी मस्तकावर शुभ्रसफेद हंस धारण केलेला, दाढी असलेला पुरुष अशी असते. काही ठिकाणी गेब नटच्या शरीराखाली पहुडलेला, तर कधी शू देवतेच्या पायाखाली पडलेला पुरुष, असा चित्रित केलेला दिसतो. काही ठिकाणी तो बैलाच्या स्वरूपातही चित्रित केलेला दिसून येतो.
गेब देवतेची मुलगी मानल्या जाणाऱ्या इसिस देवतेचे वर्णन ‘हंसाचे अंडे’ असे केले जाते. गेब ही मानवतेला धान्य पुरवणारी आणि आजारी व्यक्तीला रोगमुक्त करणारी हितकारक देवता मानली गेली आहे. गेब पृथ्वीची देवता असल्याने पृथ्वीला ‘The House of Geb’ म्हटले जायचे. पृथ्वीवरचे वनस्पती-जीवन आणि पृथ्वीच्या खालची मृतांना पुरलेली थडगी यांची जबाबदारी गेबची मानले जात असे.
मृत व्यक्तीला त्याच्या शरीरात बंदी बनवून त्याला अधोलोकात जाण्यापासून रोखण्याचे सामर्थ्य गेब देवतेत असल्याने तिचा दरारा होता. अनुबिस आणि थॉथ देवतांच्या उपस्थितीत जेव्हा मृत व्यक्तीचे हृदय तराजूत तोलले जाते, तेव्हा गेबचीही उपस्थिती तिथे, असते असे अनेक ठिकाणी पपायरसच्या पानांवर चित्रित केले आहे.
गेबविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एका आख्यायिकेनुसार गेब आणि नट यांना त्यांचे पिता शू यांनी जबरदस्तीने वेगळे केले. ह्या विरहामुळे गेबला सतत सहन करावा लागणारा उद्वेग म्हणजेच पृथ्वीवर होणारे धरणीकंप; तर काहींच्या मते धरणीकंप म्हणजे गेबचे हास्य. दुसऱ्या आख्यायिकेनुसार एकदा रा देवतेने गेबला बोलावून पृथ्वीवरील सर्पांचा आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केली. पृथ्वी हे गेबचे क्षेत्र असल्याने सर्पांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. या कामासाठी राने गेबला काही मंत्र दिले. जे वापरून सर्पांना त्यांच्या बिळाबाहेर काढणे शक्य होते. आणखी एका पुराणकथेनुसार आपला पुत्र ओसायरिस ह्याला पुढे गेबने जल, वायू, वाळवंट, हिरवळ, जीवजंतू, पशू-पक्षी यांनी युक्त अशा समस्त पृथ्वीची जबाबदारी दिली. पिरॅमिडवरील अभिलेखानुसार ओसायरिस जेव्हा शत्रूच्या कचाट्यात सापडला, तेव्हा गेबने त्याच्या‒शत्रूच्या‒मस्तकावर पाय ठेवून त्याला हरवले.
एका हस्तलिखितानुसार एकदा गेबचा आपल्या नातू होरस आणि मुलांसोबत संघर्ष झाला असता गेबने युद्ध करणाऱ्या आपल्या सर्व वारसदारांना वेगळे करून उत्तर ईजिप्तचा प्रदेश आपला पुत्र सेथ आणि दक्षिण ईजिप्तचा प्रदेश नातू होरस याला दिला; पण त्याच वेळी सर्वांसमोर गेबने हे विशद केले की, सर्वांत चांगला प्रदेश त्याने आपल्या सर्वांत प्रिय नातू होरसला दिला आहे; कारण होरस गेबच्या पहिल्या पुत्राचा पुत्र होता.
गेब देवतेचे स्वतःचे कोणतेही मंदिर नाही; पण देन्डेरासारख्या मुख्य मंदिरात त्याचा वेगळा विभाग होता. गेब देवतेची पूजा हीलिऑपोलीसमध्ये केली जायची. जिथे गेब देवतेवर (जमिनीवर) रा देवतेचे मंदिर बांधले होते. ईजिप्तचे राजे स्वतःला गेबचे वंशज मानत असत. ईजिप्त म्यूझियममधील तुतांखामेनच्या संग्रहित वस्तूंमध्ये त्याच्या थडग्यात रक्षणार्थ ठेवण्यात आलेला गेब देवतेचा सोनेरी पुतळा आहे.
संदर्भ :
- Armour, A. Robert, Gods and Myths of Ancient Egypt, New York, 2003.
- Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
- Spence, Lewis, Myths and Legends of Ancient Egypt, UK, 1998.
- Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
समीक्षक : शकुंतला गावडे