ऑमन, रॉबर्ट जॉन (Aumann, Robert John) : (८ जून १९३०). सुविख्यात इझ्राएल-अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी. ‘खेळ सिद्धांत’ (गेम थिअरी) विश्लेषणाद्वारे त्यांनी संघर्ष व सहकार यांचे प्रबोधन अधिक सखोलपणे समजावून दिल्याबद्दल त्यांना प्रसिद्ध अर्तज्ज्ञ टॉमस क्राँबी शेलिंग (Schelling, Thomas Crombie) यांच्या बरोबरीने २००५ मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऑमन यांचा जन्म फ्रँकफर्ट ऍम मेन (Germany) शहरात झाला. ऑमन यांनी आपल्या आईवडिलांसमवेत १९३८ मध्ये जर्मनीहून अमेरिकेत स्थलांतर केले. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यांनी १९५० मध्ये न्यूयॉर्क सिटी येथून गणित विषयात बी. एससी. पदवी मिळविली. १९५२ मध्ये मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.)मधून एम. एससी. व १९५५ मध्ये पीएच. डी. या गणित विषयातील पदव्या त्यानी प्राप्त केल्या. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य असलेले ऑमन हे १९५६ पासून इझ्राएलमधील हिब्रू विद्यापीठ येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ रॅशनॅलिटीमध्ये गणित विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. शिवाय १९८९ पासून तेथील स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करीत असून ते विद्यापीठातील ‘गेम थिअरी इन इकॉनॉमिक्सʼचे संस्थापक सदस्य आहेत.

ऑमन हे खेळ सिद्धांत विकसित करण्यात व या सिद्धांताचे आधुनिक अर्थशास्त्रातील महत्त्व विशद करण्यात अग्रणी मानले जातात. या खेळांत अशा अवस्था वा स्थिती येतात, की ज्यांत खेळाडूंना त्याच त्याच अवस्थांशी पुनश्च सामना करावा लागतो. खेळ सिद्धांतामध्ये परस्परसंबद्ध समतोल संकल्पनाची प्रथम मांडणी करण्याचे श्रेय ऑमन यांना देण्यात येते. यांशिवाय त्यांनी खेळ सिद्धांतामधील सामान्यज्ञान संकल्पना ही प्रथमच मांडली. त्यांचे या संदर्भातील काम सुस्पष्ट पायाभूत व आर्थिक समस्यांची उकल करणारे आहे. त्यांचा गणित हा मूळ विषय असल्याने अर्थशास्त्रीय समस्यांची मांडणीही त्याच पद्धतीने केलेली आहे. दीर्घकालीन अशा आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी खेळ किंवा क्रिडा सिद्धांत ही स्वत:चीच गणिती प्रणाली वापरली. समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा दोन किंवा अधिक प्रतिस्पर्धी सहभाग घेतात, तेव्हा वारंवार संधी देवून त्यांच्यात खेळप्रदान स्पर्धा निर्माण केल्यास अधिक परिमाणकारक व उपयुक्त निर्णय अगर पर्याय मिळू शकतात हे सप्रमाण त्यांनी सिद्ध केले. विशेषत: जेव्हा प्रतिस्पर्ध्यामध्ये पारदर्शकतेचा, सुसंवादाचा अभाव असतो, तेव्हा खेळ सिद्धांत अधिक सयुंक्तिक असल्याचे पटवून दिले. ऑमन यांनी आपल्या या सिद्धांताचा, संशोधनाचा बोधनिक पाया (Cognitive Foundation) विस्तारीत केला. प्रतिस्पर्ध्यामध्ये अल्पकालीन परंतु प्रखर परस्परविरोधी हितसंबंध असतात, तेव्हा खेळांची पुनरावृत्ती घडवून आणल्यास अधिक बुद्धीवादी व संतुलित निर्णय होऊ शकतात. त्यांच्यात अधिक सहकार्य वाढीला लागू शकते व त्यासाठी बाह्य शक्तींची गरज लागतेच असे नाही. त्यांच्या या निष्कर्षाला ‘फोक थेरम’ असे संबोधण्यात येते.

ऑमन यांना अर्थकारणाबरोबर समाज व राजकारणात रस होता. इझ्राएलच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या जेष्ठ प्राध्यापकांच्या गटाचे ते वरिष्ठ सदस्य होते. ऑमन यांनी ‘वॉर अँड पीस’ या आपल्या नोबेल पुरस्कारानिमित्त दिलेल्या व्याख्यानात ‘देशांमधील प्रत्येक युद्ध अविवेकी असतेच असे नसून त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झाल्यास ते जिंकण्यासाठी योग्य प्रयत्न शक्य होतात. शांतता प्रक्रिया देशांमधील युद्ध थांबवू शकतेच असे नाही, तर शस्त्रास्त्र स्पर्धा, युद्धविषयक धमक्या, पारस्परिक विनाश करण्याचा जोर व युद्ध पश्चात होणाऱ्या नुकसानाची जाणीव यांमुळे युद्धाला प्रतिबंध होऊ शकतो’ हा विचार मांडला.

ऑमन यांनी ज्यूंच्या वाङ्मयामधील द्विविधा समस्यांचे विश्लेषण करण्याकरिता खेळ सिद्धांताचा वापर केला. ‘विभाजन’ समस्येचे गूढ उलगडण्याच्या कामात त्यांना यश मिळेले. उदा., मृत पतीच्या संपत्तीचा वाटा त्याच्या तीन भार्यांमध्ये कशा पद्धतीने विभक्त करावा, ही प्रदीर्घ काळ प्रलंबित झालेली समस्या त्यांनी उकलून दाखविली.

https://www.youtube.com/watch?v=HUGy8mm2KJs

ऑमन यांनी स्वतंत्रपणे तसेच सहलेखन केलेले पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आस्फीरिसिटी ऑफ आल्टरनेटिंग नॉट्स (१९५६), व्ह्यॅल्यूज ऑफ नॉन-ऍटॉमिक गेम्स (सहलेखक-एस. एस. शेप्ली, १९७४), गेम थिअरी (१९८१), लेक्चर्स ऑन गेम थिअरी (१९८९), हँडबुक ऑफ गेम थिअरी विथ इकॉनॉमिक ॲप्लिकेशन्स (१९९५), रिपीटेड गेम्स विथ इन्कम्प्लीट इन्फर्मेशन ऑफ कलेक्टेड पेपर्स, खंड, १, २, (२०००). शिवाय चौऱ्याण्णव शोधनिबंध व लेख त्यांच्या नावावर आहेत.

ऑमन यांना नोबेल पुरस्कारबरोबर संशोधन व समाजकार्यासाठी पुढील पुरस्कार लाभले : अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्टस ॲण्ड सायन्सेस विदेशी मानद सदस्य (१९७४), हार्वे विज्ञान व तंत्रविद्या पुरस्कार (१९८३), अर्थशास्त्रीय संशोधनार्थ इझ्राएल पुरस्कार (१९९४), नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी – अखीन प्लेन नेमर्स प्राइझ इन इकॉनॉमिक्स (१९९८), एमेट अर्थशास्त्र पुरस्कार (२००२), जेरूसलेम निर्मिती पुरस्कार (२००६), जानोस बोल्याली पुरस्कार, जॉन फॉन न्यूमन सिद्धांत पुरस्कार इत्यादी.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा