सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांत पंचशिखाचार्यांना सारखाच मान दिला जातो. त्यांचा काळ सुमारे इसवी सन पूर्व पाचवे शतक हा मानला जातो. पंचशिखाचार्य हे आसुरीचे शिष्य होते. त्यांच्याविषयी निर्विवाद ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तथापि पंचशिखाचार्य हे सांख्यदर्शनाला सुसंगत स्वरूप देणारे पहिले आचार्य होत या विषयी विद्वानांमध्ये एकमत आढळते. बौद्ध दर्शनाच्या ‘मझ्झिमनिकाय’ ग्रंथात ‘इंद्रियभावना’ सुत्तामध्ये (३.५२) पंचशिखाचार्यांचा निर्देश ‘पारासरिय ब्राह्मण’ (पराशर गोत्राचा ब्राह्मण) असा करण्यात आला आहे. याचे कारण पंचशिखाचार्यांचे गोत्र पाराशर्य होते. राजा जनक स्वत:चा उल्लेख ‘पराशर गोत्र असलेल्या महात्मा पंचशिखाचा प्रिय शिष्य’ असा करतो. महाभारतात भीष्माने त्यांना ‘भिक्षु’ हे विशेषण वापरले आहे, त्यावरून ते संन्यासी होते. राजा जनकाला  त्यांनी सांख्य, योग व राजनीति शिकविली असा उल्लेख जनक व योगाच्या  मार्गातील सुलभा नावाच्या भिक्षुणीच्या संवादात आला आहे. महाभारतात असे म्हटले आहे की, “शम, दम, उपरति, तितिक्षा आणि समाधान हे पाच गुण पंचशिखाचार्यांच्या ठायी होते. त्यांना पाच ज्ञानेंद्रिये आणि मनोव्यापार; पंचरात्र आगम; अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाचही कोशांचे व त्यांच्या उपासनेच्या प्रकारांचे  ज्ञान होते. ब्रह्म या पाच कोशांच्या पलीकडे असते त्यामुळे त्याला पंचशिख म्हणतात. पंचशिखाचार्यांना पंचशिखाचे अर्थात् ब्रह्माचे ज्ञान होते.”

कवि अश्वघोषाच्या बुद्धचरितम् या महाकाव्यात जैगीषव्य, जनक आणि वृद्ध पराशर यांनी ध्यान व ज्ञानाद्वारे मोक्ष मिळविला असे विधान आढळते (बुद्धचरितम् १२.६७). सांख्यसूत्रात अनुमान प्रमाणातील व्याप्तिविषयी पंचशिखाचार्यांचे मत आढळते. तसेच प्रकृति व पुरुष यांमधील संबंधाविषयी “अविवेकाने जीव आपण प्रकृतीचे स्वामी आहोत असे मानतो” असे पंचशिखाचार्यांचे मत नमूद केले  आहे. योगसूत्रावरील व्यासभाष्यात पंचशिखाचार्यांची वचने उद्धृत केली आहेत.  तसेच विज्ञानभिक्षूंच्या सांख्यप्रवचनभाष्य या ग्रंथात पंचशिखाचार्यांची वचने नमूद केली आहेत.

व्यासभाष्यात असे म्हटले आहे की, “आसुरीला सांख्यतत्त्व जाणण्याची उत्कट इच्छा होती; म्हणून सांख्यदर्शनाचे प्रणेते कपिल यांनी त्याच्यावरील करुणेपोटी त्याला सांख्यतत्त्वाचे ज्ञान दिले.” आसुरीने नंतर ते ज्ञान पंचशिखाचार्यांना दिले. सांख्यकारिकेत असे म्हटले आहे की, या शास्त्राचा पंचशिखाचार्यांनी विस्तार केला. या विस्तारासाठी कारिकेत (श्लोकात) ‘बहुधा कृतम्’ हा शब्द वापरला आहे. या उल्लेखाच्या आधारे पंचशिखाचार्यांनी षष्टितन्त्र या ग्रंथाची रचना करून सांख्य तत्त्वज्ञानाचा विस्तार केला असे म्हटले जाते. तर काही विद्वानांच्या मते त्यांनी षष्टितन्त्र या ग्रंथावर साठ अध्यायात व्याख्या लिहिली. षष्टितन्त्र हा ग्रंथ सध्या मूळ स्वरूपात उपलब्ध नाही.

महाभारतात राजा जनक आणि पंचशिखाचार्य तसेच जनक आणि सुलभा यांच्या संवादातून पंचशिखाचार्यांचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे सांगितले आहे – आत्म्याचे अस्तित्त्व तर्काच्या आधारे सिद्ध होऊ शकते. चेतना ही पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या शरीरापासून वेगळी असते. मृत्यूनंतर देह शिल्लक असला तरी त्यामध्ये चेतना आढळून येत नाही. म्हणून आत्मा जड शरीरापासून निराळा आहे. मृत्यूमुळे आत्म्याचा विनाश होतो असे म्हणणे योग्य नाही. शाश्वत आत्म्याचा नाश सर्वथा अशक्य आहे.

जीवाचे शरीर, इंद्रिये आणि मन ही निरनिराळी असूनही ती एकत्र कर्म करतात. प्राणिमात्रांची शरीरे पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या पाच तत्त्वांच्या समुदायापासून बनतात. ती तत्त्वे शरीराच्या उत्त्पत्तिसमयी स्वभावत: एकत्र येतात व शरीराचा नाश होतो तेव्हा स्वभावत:च विलग होतात. ही तत्त्वे प्राणिमात्रांच्या उत्पत्तीचे उपादानकारण आहेत. शरीर हा पाच महाभूतांचा संघात आहे. ते एकरूप नाही. शरीराचे जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज या प्रकारचे  भेद आहेत. शरीरामधील पोकळ भाग म्हणजे आकाश; प्राण म्हणजे वायू, उष्णता म्हणजे अग्नी; रक्त वगैरे द्रव पदार्थ म्हणजे आप (जल) व अस्थि वगैरे कठिण पदार्थ म्हणजे पृथ्वी होय.

मनुष्याचे शरीर, इंद्रिये आणि मन हे एकत्र आले असता त्याच्या हातून कर्म घडते. बुद्धी, शरीरात संचार करणारा वायु व जाठराग्नि हा कर्म करविणारा समूह आहे. पाच तत्त्वांपासून इंद्रिये, इंद्रियांचे विषय, विषयांमधील शक्ती जिच्यामुळे ते मूर्त स्वरूप धारण करतात; इंद्रियांमधील शक्ती जिच्यामुळे ते विषयांचे ग्रहण करतात; मन, प्राण, अपान इत्यादी वायु, रस आणि अस्थि इत्यादी धातु निर्माण होतात. इंद्रिये, इंद्रियांचे विषय, विषयांमधील शक्ती, इंद्रियांमधील शक्ती आणि मन हे बुद्धीचे परिणाम आहेत. प्राण व अपान वायु तत्त्वाचा परिणाम आहे. शरीरातील रस आणि धातु जाठराग्नीचा परिणाम होय.

श्रोत्र, त्वचा, जिह्वा, नेत्र आणि नासिका ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. चित्ताची उपस्थिती असताना शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध हे इंद्रियांचे विषय बनतात. प्रिय विषय हे भोग्य, अप्रिय विषय हे त्याज्य, आणि अन्य विषय उपेक्षा करण्याजोगे असल्यामुळे चित्त चैतन्याशी संबद्ध झाले असता विषयांबाबत सुख, दु:ख आणि उपेक्षा अशा तीन प्रकारच्या जाणीवा उत्पन्न होतात. मनुष्याला जे ज्ञान होते, त्याची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व विषयांची दृश्य (मूर्त) स्वरूपे म्हणजे पदार्थ ही सहा कारणे आहेत. अर्थातच यांच्याशी इंद्रियांचा संयोग झाल्यावरच मनुष्याला भिन्न भिन्न विषयांचे ज्ञान होते. इंद्रियेच स्वर्गप्राप्तीला कारणीभूत कर्म घडवितात. तीच ब्रह्मप्राप्तिसाठी कर्मत्यागाचे कारण ठरतात आणि तीच परमसत्याचे ज्ञान घडवितात. इंद्रियांमध्ये त्यांच्या त्यांच्या विषयांचे विसर्जन केल्यावर अर्थात् त्यांचा त्याग केल्यावरच ब्रह्मपदाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते.

शरीर, इंद्रिये आणि मन म्हणजे आत्मा नव्हे. जे लोक शरीराला आत्मा मानतात त्यांना या मिथ्याज्ञानामुळे अनंत दु:खांची प्राप्ती होते. ते ज्ञानापासून वंचित राहतात म्हणून त्यांच्या दु:खाचा उपशम कधीच होत नाही. याउलट जे दृश्य प्रपंचाला अनात्मा मानून त्याच्या विषयी ममत्व ठेवत नाहीत व ज्यांना अहंकार नसतो त्यांच्या दु:खाचा संपूर्ण वध म्हणजे नाश होतो. दृश्य जग आत्मरूप नाही, ते ‘मी नाही’ आणि ‘माझेही  नाही’ असे ज्ञान ज्याला झाले त्याचे दु:ख नष्ट होते. सांख्यशास्त्राचे ‘सम्यग्वध’ असे नाव आहे, याचे कारण त्यात दु:खांचा संपूर्णपणे नाश होतो. तो नाश करण्यासाठी त्यागाची आवश्यकता आहे. सगळ्या कर्मांविषयीच्या कर्तृत्वभावनेचा, ममत्वाचा, आसक्तीचा आणि कामनेचा त्याग करणे आवश्यक आहे. तो योगामुळे शक्य होतो.

हात हे निरनिराळी कर्मे करणारे इंद्रिय, पाय हे गमन करणारे इंद्रिय, लिंग हे प्रजोत्पत्ती आणि मैथुनाचा आनंद देणारे इंद्रिय, मलोत्सर्ग करणारे गुदेंद्रिय व शब्दाचा उच्चार करणारे ते वाक् इंद्रिय होय. मनासहित अकरा इंद्रियांच्या विषयांचा त्याग बुद्धिद्वारे केला पाहिजे.

कर्ण हे इंद्रिय, शब्द हा विषय व चित्त हा त्याचा भोक्ता होय. त्वचा हे इंद्रिय, स्पर्श हा विषय व चित्त हा त्याचा भोक्ता होय. चक्षु हे इंद्रिय, दर्शन हा विषय व चित्त हा त्याचा भोक्ता होय. जिह्वा हे इंद्रिय, रस हा विषय व चित्त हा त्याचा भोक्ता  होय. घ्राण (नासिका) हे इंद्रिय, गंध हा विषय आणि चित्त हा त्याचा भोक्ता होय. कर्ता, कर्म आणि मन या तिघांचे प्रत्येकी सात्त्विक, राजस व तामस हे प्रकार आहेत. सत्त्वगुणामुळे हर्ष, प्रीती, आनंद, सुख आणि चित्ताची शांती निर्माण होते. असंतोष, पश्चात्ताप, दु:ख, लोभ आणि असहिष्णुता  ही रजोगुणाची लक्षणे आहेत. अविवेक, मोह, प्रमाद, निद्रा आणि आळस ही तमोगुणाची लक्षणे आहेत.

शरीराला  आणि मनाला आनंद देणाऱ्या काही गोष्टी घडल्या म्हणजे सात्त्विक भावाचा उदय झाला असे समजावे. मनाला किंवा शरीराला असंतोष किंवा  द्वेष उत्पन्न करणाऱ्या गोष्टी घडल्या म्हणजे रजोगुणाचा उदय झाला असे समजावे व शरीरात अथवा मनात अतर्क्य, अज्ञेय अशा त्याचप्रमाणे मूढता निर्माण करणाऱ्या गोष्टींचा उदय झाला म्हणजे तमोगुणाचा उदय झाला असे समजावे.

झोपेतून जागे होणाऱ्या मनुष्याला शब्द स्पर्शादि विषयांचे ज्ञान होते. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की इंद्रियांच्या वृत्ति सदासर्वकाळ त्यांच्याच जवळ असतात आणि म्हणूनच जाग्रत् अवस्थेत एकदम कार्यरत होतात. तमोगुणाच्या प्रभावाने सुषुप्ति अवस्थेत दहा इंद्रिये, मन व बुद्धी यांची जाणीव नसते. परंतु, म्हणून सुषुप्तिमध्ये आत्मतत्त्वाचा नाश होतो असे मात्र नाही.

पूर्वी अनुभविलेले जे श्रवण इत्यादी विषय, त्यांचे स्मरण मनुष्याला राहते व म्हणूनच जाग्रत् अवस्थेप्रमाणे विषये व इंद्रिये यांचा संयोग स्वप्नातही होतो. परिणामी माणसाला झोपेत स्वप्ने पडतात. अंत:करणावर तमोगुणाचा अंमल असला म्हणजे विषय व इंद्रिये यांचे साहचर्य राहत नाही. ही सुषुप्ति अवस्था होय. या अवस्थेतील सुख अथवा आनंद हे अज्ञानजन्य असल्यामुळे ते तामस सुख अथवा तो तामस आनंद होय. सुषुप्ति अवस्था व कैवल्यप्राप्ती यात या दृष्टीने साम्य असले, तरी सुषुप्ति अवस्थेतील सुख अथवा आनंद हे अज्ञानजन्य तामससुख असते, तर ब्रह्मानंदाचा आनंद हा सात्त्विक आनंद होय, हा या दोघांमधील मोठा भेद आहे.

मूळ प्रकृति म्हणजे अव्यक्त, महत्, अहंकार, पाच तन्मात्रा, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन यांच्या संघाताला क्षेत्र म्हणतात. या संघाताला जाणारा चैतन्ययुक्त जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. मोक्ष म्हणजे शरीराचा विनाश नव्हे आणि कोणत्याही मूर्त रूपात अस्तित्व नव्हे. ज्याप्रमाणे नद आणि नद्या समुद्राला मिळाल्या असताना आपल्या  नाम व रूपाचा त्याग करतात आणि त्यात विलीन होतात त्याप्रमाणे जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो हाच मोक्ष आहे.

संदर्भ : श्रीमन्महाभारतम्, नाग प्रकाशक, दिल्ली, १९९८.

                                                                                                            समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर