मानवी उत्क्रांतीवृक्षावर चार स्वतंत्र शाखा आहेत. सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेल्या व आता फक्त जीवाश्म स्वरूपात आढळत असलेल्या आर्डीपिथेकस या पहिल्या शाखेत दोन प्रजाती (जीनस) आहेत. दुसऱ्या शाखेला ऑस्ट्रॅलोपिथेकस गट असे म्हणतात. यात ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीच्या पाच जाती आहेत. तिसरी शाखा पॅरान्थ्रोपस प्रजातीची. तिच्या दोन जाती आहेत. चौथ्या शाखेत सेपियन मानव (होमो सेपियन्स) म्हणजेच आधुनिक मानव जातीसह मानव (होमो) प्रजातीच्या सर्व मानव जातींचा समावेश होतो.
स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनीअस (१७०७-१७७८; कॅरोलस लिनीअस या नावानेही परिचित) यांनी सुमारे तीन शतकापूर्वी सेपियन मानव जातीसह मानव प्रजातीची व्याख्या केली. तेव्हापासून जीवाश्मांचा अभ्यास आणि रेणवीय जीवविज्ञानाने मानव प्रजातीच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. असे असूनही सखोल अभ्यास करून मानव प्रजाती व इतर मानवपूर्व जातींमधील सीमारेषा अद्याप काहीशा धूसर राहिल्या आहेत. योहान फ्रीड्रिख ब्लुमेनबाख (१७५२-१८४०) या जर्मन निसर्गवैज्ञानिकांनी १७७५ मध्ये मानवांचे इतर सस्तन प्राण्यांपासून वेगळेपण सांगताना हनुवटी असणे, गोलाकार कवटी, पटाशीचे दात छोटे असणे, खालचा जबडा छोटा असणे व ताठ उभे राहणे या वैशिष्ट्यांचा समावेश केला होता. सन १८५६ मध्ये जर्मनीतील ड्यूसेलडॉर्फजवळ निअँडर नदीच्या खोऱ्यात फेल्डहोफर या गुहेत मिळालेल्या मानवसदृश जीवाश्मांना १८६४ मध्ये अँग्लो–आयरिश भूवैज्ञानिक विल्यम किंग (१८०९-१८८६) यांनी निअँडरथल मानव (होमो निअँडरथलेन्सिस) हे नाव दिले; तथापि या शोधानंतर मानव कोणाला म्हणायचे याबद्दल वादविवाद झाले. तसेच जावामध्ये मिळालेल्या मानवसदृश जीवाश्मांचे वर्गीकरण पिथेकँथ्रोपस इरेक्टस (इरेक्टस मानव) असे डच वैज्ञानिक युजीन डुबॉ (१८५८-१९४०) यांनी केले व त्यांना मानवीय दर्जा नाही, असे प्रतिपादन केले. याच्याही पुढे जात अमेरिकन वैज्ञानिक थिओडोसिअस डबझॅनस्की (१९००-१९७५) यांनी अनुकूलनासाठी संस्कृती हे साधन असल्याने मानवांमध्ये जातीचे वर्गीकरण करू नये, अशी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे अर्न्स्ट मेअर (१९०४-२००५) या जर्मन-अमेरिकन जीववैज्ञानिकांनी मानव प्रजातीत फक्त ट्रान्सवालेन्सिस मानव (खरेतर ऑस्ट्रॅलोपिथेकस), इरेक्टस मानव व सेपियन मानव अशा तीनच जाती असल्याचे मत मांडले (१९५०). अर्थातच ही मांडणी मान्य झाली नाही. यानंतर १९६० मध्ये टांझानियातील ओल्डुवायी गॉर्ज येथे ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ लुई लीकी (१९०३-१९७२), दक्षिण आफ्रिकन मानवशास्त्रज्ञ फिलिप टोबियास (१९२५-२०१२) आणि ब्रिटिश प्रायमेट वैज्ञानिक जॉन नेपियर (१९१७-१९८७) यांनी हॅबिलिस मानव (होमो हॅबिलिस) जातीचा शोध जाहीर केल्यावर चित्र बदलले. तथापि नामशेष झालेल्या बहुतेक सर्व मानव जाती आपल्याला ज्ञात आहेत असे वाटत असताना मानवी उत्क्रांतीच्या कहाणीला अचानक जबरदस्त कलाटणी देणारे शोध एकविसाव्या शतकात लागत गेले.
इंडोनेशियातील फ्लोरेस या बेटावर २००३ मध्ये फ्लोरेस मानवाचे (होमो फ्लोरेसिएन्सिस) जीवाश्म मिळाले. २००७ मध्ये फिलिपीन्सच्या लुझोन भागात लुझोन मानव (होमो लुझोनेन्सिस) जातीचे जीवाश्म सापडले. रशियातील अल्ताई पर्वतरांगेत डेनिसोव्हा गुहेत २०१० मध्ये डेनिसोव्हा मानवाचे अवशेष मिळाले आणि २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील रायझिंग स्टार गुहांमधील दिनलेदी या गुहेत नलेदी मानवाचे (होमो नलेदी) जीवाश्म मिळाले. या सर्व शोधांमुळे मानव प्रजातीची व्याप्ती विलक्षण वाढली आहे.
आशिया खंडात मानव प्रजातीचे जीवाश्म अनेक ठिकाणी आढळले असले, तरी भारतीय उपखंडात त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. नर्मदा नदीच्या परिसरात मध्य प्रदेशातील हथनोरा येथे १९८२ मध्ये सर्वप्रथम मानवी कवटीचे जीवाश्म मिळाल्याने मानव प्रजात भारतातही पसरली असल्याचे सिद्ध झाले. १९९०-२००० या दशकात इतर ठिकाणी आणखी काही जीवाश्म मिळाले. भारतीय उपखंडातील मानव प्रजातीचा काळ २,५०,००० ते सु. ७५,००० वर्षपूर्व आहे.
जसेजसे विविध नव्या जातींचे जीवाश्म मिळत गेले तसेतसे मानव प्रजातीची वैशिष्ट्ये ठरवण्याचे निकषही बदलत गेले. मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत शरीररचनेतील अनेक बदलांपैकी एक महत्त्वाचा बदल दोन पायांवर चालू लागणे हा होता. दोन पायांवर चालण्याची क्षमता निश्चितपणे मानवांना इतर प्राण्यांपासून वेगळे करते आणि ही क्षमता फक्त मानवांमध्येच आहे असे काही काळ मानले जात होते. तथापि २००१ मधील शोधांनंतर त्यात फरक पडला. द्विपाद अवस्था हे खास मानवी वैशिष्ट्य नाही, हे सिद्ध झाले. मानवपूर्व जातींपैकी काहींमध्ये ही क्षमता अगोदरच विकसित झाली होती. मानव प्रजातीच्या अगोदरच दोन पायांवर चालण्याच्या तंत्राची उत्क्रांती होऊन गुडघ्याच्या बळकट रचनेचा विकास झालेला होता. त्यामुळे फक्त दोन पायांवर चालणे हा मानवपणाचा निकष असू शकत नाही, हे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे तुलनेने मोठा व अधिक गुंतागुंतीची रचना असलेला, बुद्धिमान मेंदू, काहीसा सपाट व लहान चेहरा, आकाराने छोटे जबडे व छोटे दात ही प्रमुख शारीरिक वैशिष्ट्ये आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संस्कृतीचा वापर (अवजारे बनवण्याची क्षमता, अग्नीचा वापर व भाषा) ही मानवांना इतर प्राण्यांपासून वेगळे करतात.
सुमारे ३० ते २० लक्ष वर्षांपूर्वी मानव प्रजातीचा उदय होत असताना ऑस्ट्रॅलोपिथेकस व पॅरान्थ्रोपस या प्रजातींच्या मानवपूर्व प्रजाती अस्तित्वात होत्या. तथापि त्या नष्ट होऊन गेल्या. हॅबिलिस मानव जातीपासून इरेक्टस मानव जातीची व पुढे त्यातूनच सेपियन मानव जातीची उत्क्रांती झाली असे मानले जात होते; तथापि आता मात्र तसे नसल्याचे दिसून आले आहे. सुमारे २० ते १५ लक्ष वर्षपूर्व या काळात हॅबिलिस मानव, इरेक्टस मानव, रूडॉल्फ मानव आणि मानवपूर्व जात पॅरान्थ्रोपस बॉइसी (Paranthropus boisei) अशा चार जाती अस्तित्वात असल्याचे आढळले आहे. या शिवाय एर्गास्टर मानव (होमो एर्गास्टर) ही वेगळी जात अथवा इरेक्टस मानव ही मानवांची उपजात याच काळात होती, असे मतही प्रचलित आहे. या सर्व जातींमधील कोणापासून कोण उत्क्रांत झाले हे अद्याप नीटसे समजलेले नाही. मानव प्रजातीच्या अनेक जातींचा उदय होऊन मानवपणाकडे आणखी एक पाऊल टाकले जाणे मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्या आधुनिक मानवांच्या म्हणजेच सेपियन मानव जातीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यांतील काही या अगोदरच्या मानव प्रजातींमध्ये विकसित झालेली दिसतात.
मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात १२ लाख ते ३ लाख वर्षपूर्व हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे; कारण आधुनिक मानवांचा म्हणजेच सेपियन मानवासह अनेक प्रकारच्या मानव जातींचा उदय झाला, त्याच्या आधी इरेक्टस मानव या अतिप्राचीन जातीचे मानव जगभर अस्तित्वात होते. गेल्या १२ लाख वर्षांच्या काळात अँटेसेसर मानव, हायडलबर्ग मानव, फ्लोरेस मानव, नलेदी मानव, लुझोन मानव, डेनिसोव्हा मानव (अद्याप जातीचे नामकरण झालेले नाही) आणि निअँडरथल मानव असे आपले अनेक भाईबंद उत्क्रांत झाले. विविध कारणांनी काळाच्या ओघात या सगळ्या इतर मानव जाती नष्ट होऊन गेल्या आणि अखेर फक्त आपली जात अद्याप टिकून राहिली आहे.
संदर्भ :
- Fuentes, Agustín, ‘Distinctively human? Meaning-making and World shaping as core processes of the Human niche’, Zygon, 58 (2): 425-442, 2023.
- Haile-Selassie, Yohannes; Stephanie M. Melillo and Denise, F. Su., ‘The Pliocene Hominin Diversity Conundrum: Do more Fossils mean less clarity?’, Proceedings of the National Academy of Sciences, 113 (23): 6364–6371, 2016.
- Sandrine, Prat, ‘Emergence of the genus Homo: From concept to taxonomy’, L’anthropologie, 126 (4), 2022.
- Schwartz, Jeffrey H. and Tattersall, Ian, ‘Defining the Genus Homo’, Science, 349 (6251): 931-932, 2015.
- Spoor, F.; Gunz, P.; Neubauer, S.; Stelzer, S.; Scott, N.; Kwekason, A. and Dean, M. C., ‘Reconstructed Homo habilis type OH 7 suggests deep-rooted species diversity in early Homo’, Nature, 519 (7541):.83-86, 2015.
समीक्षक : मनीषा पोळ