मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) अशा फक्त दोन प्रजातींचे जीवाश्म मिळाले आहेत. या दोन्ही प्रजातींचा आजच्या आधुनिक मानवांशी थेट संबंध नसला, तरी त्यांना मानवी उत्क्रांतिवृक्षावर (Evolutionary tree) महत्त्वाचे स्थान आहे.

आर्डीपिथेकस रमिडस ही प्रजात ४४ ते ४२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. इथिओपियात अवाश नदीच्या परिसरात १९९२ ते १९९४ या दरम्यान अमेरिकन पुरामानवशास्त्रज्ञ टिम व्हाइट व त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रजातीचा शोध लागला. अरामिस या ठिकाणी १९९४ मध्ये या प्रजातीच्या एका मादीचे अवशेष (टोपणनाव ‘आर्डीʼ) मिळाले होते. व्हाइट यांनी अगोदर या नवीन जीवाश्मांना ऑस्ट्रॅलोपिथेकसची एक प्रजाती असे मानले होते. परंतु इतर सुमारे १०० जीवाश्म मिळाल्यानंतर सन २००९ मध्ये संशोधकांनी अधिकृतपणे आर्डीपिथेकस रमिडस या प्रजातीच्या शोधाची घोषणा केली. हे नाव स्थानिक अफार भाषेमधील ‘आर्डीʼ (जमीन) व ‘रमिडʼ (मूळ) यांपासून तयार केले आहे.

आर्डीच्या अभ्यासातून असे आढळले की, तिचे वजन ५० किग्रॅ. असावे व उंची सुमारे १२० सेंमी. असावी. आर्डीपिथेकस सर्वभक्षी होते; परंतु ते खूप कठीण कवच असणारे अन्न खात नसावेत. आर्डीपिथेकसची शरीररचना काहीशी कपींप्रमाणे असली, तरी सुळे मात्र मानवांप्रमाणे हिऱ्यांच्या आकाराचे आहेत. या प्रजातीचे प्राणी दोन पायांवर चालत होते किंवा नाही, हे सांगता येत नाही. आर्डीपिथेकस अत्यंत घनदाट जंगल असलेल्या पर्यावरणात राहात होते, हे या जीवाश्मांबरोबर मिळालेल्या इतर प्राण्यांच्या जीवाश्मांवरून दिसते. व्हाइट यांचे एक सहकारी लव्हजॉय यांनी मानवी पूर्वज व आफ्रिकेतील कपी यांच्यामधला शेवटचा दुवा, असे आर्डीपिथेकसचे वर्णन केले आहे.

इथिओपियात अवाश नदीच्या परिसरात आर्डीपिथेकस कडाबा या दुसऱ्या प्रजातीच्या जीवाश्मांचा शोध पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हायली-सेलॅसी यांना १९९७ ते २००० या दरम्यान लागला. त्यावेळी पाच ठिकाणी अकरा जीवाश्म मिळाले होते. त्यानंतर २००२ मध्ये मध्य अवाश भागात असाकोमा या ठिकाणी दातांचे सहा जीवाश्म मिळाले. हायली-सेलॅसी यांनी या प्रजातीचे आर्डीपिथेकस कडाबा असे नामकरण केले. यातील ‘कडाबाʼ हा शब्द स्थानिक अफार भाषेतील असून त्याचा अर्थ ‘सर्वांत प्राचीन पूर्वजʼ असा आहे. ही होमिनिन प्रजात ५१ ते ५८ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि एका ठिकाणी मिळालेल्या पायाच्या चौथ्या बोटाच्या जीवाश्माचे कालमापन ५८ लक्ष वर्षे असे आहे. या बोटाच्या आकारावरून आर्डीपिथेकस कडाबा दोन पायांवर चालत असावेत, असे अनुमान काढण्यात आले असले, तरी ते सर्वमान्य झालेले नाही.

आर्डीपिथेकस कडाबा प्राण्यांचे मागचे दात चिंपँझींपेक्षा आकाराने मोठे होते. चिंपँझींप्रमाणे केवळ फळे व पाने न खाता हे प्रारंभीचे होमिनिन प्राणी अधिक तंतुमय आहार घेत होते, हे त्यांच्या दातांवरून दिसून आले आहे. पर्यावरणीय पुरातत्त्व (Environmental archaeology) अभ्यासातून असे निदर्शनास आले की, गवताळ प्रदेशांप्रमाणेच अधिक दाट झाडी असलेल्या भागांतही हे प्राणी होते.

संदर्भ :

  • Gibbons, Ann, ‘A New kind of Ancestor : Ardipithecus Unveiledʼ, Science 326: 36-50, 2009.
  • Haile-Selassie, Yohannes; Suwa, Gen & White, Tim D. ‘Late Miocene Teeth from Middle Awash, Ethiopia and Early Hominid Dental Evolutionʼ, Science, 303: 1503-1505, 2004.
  • White, Tim D.; Suwa, Gen & Asfaw, Berhane ‘Australopithecus ramidus, a new species of early hominid from Aramis, Ethiopiaʼ, Nature 371: 306-312, 1994.

समीक्षक – शौनक कुलकर्णी